संघटनेतील सर्व सदस्यांच्या आग्रही मागणीनंतर माथेरानमध्ये भरलेल्या राज्यभरातील नगरप्रमुखांच्या एकदिवसीय संमेलनाचे सायंकाळी सूप वाजले. शहरांचा विकास कसा करावा यावर दिवसभर चांगली चर्चा झाली. सारे प्रमुख एका आलिशान रिसॉर्टमध्ये रात्री जमले. संमेलनाचे आयोजक व स्थानिक पालिकेचे प्रमुख कितीही थकले असतील तरी त्यांना येथे बोलवा असा धोशा सर्वांकडून सुरू झाला. निरोप मिळताच विजयीवीराच्या थाटात ते हजर झाले.

एकाने थेटच विचारले ‘भ्रष्टाचाराचा गाळ लपवण्यासाठी तुम्ही शार्लोट तलावातले पाणी सोडण्याची जी कृती केली त्याने आम्ही भारावून गेलो आहोत. न रहेगा बास, न बजेगी बांसुरी सारखे कृत्य करण्याचे जे धाडस तुम्ही दाखवले ते नेमके कसे सुचले, हे कळले तर आम्हालाही तुमच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करता येईल.’

प्रमुख उत्साहाने बोलू लागले. ‘तर झाले असे की तो गाळ आमच्यासाठी खूपच डोकेदुखी ठरू लागला होता. हे लहानसे शहर असल्याने आमचे व ठेकेदारांचे हितसंबंध स्थानिकांच्या पटकन लक्षात येतात. त्यामुळे आरोप होऊ लागले. काहीही झाले तरी आमच्या हिताची काळजी घेणार्‍या ठेकेदाराला वाचवायचेच असे मी ठरवले होते. खूप विचार केल्यानंतर मला पाणी सोडण्याची कल्पना सुचली. पालिकेचे अधिकारी तयार होईनात. मग त्यांना सुट्टीवर पाठवले व दिले पाणी सोडून. आता कारणे दाखवा नोटिसा येत आहेत, पण आमच्या पक्षाचे नेते ते सांभाळून घ्यायला समर्थ आहेत. आधी पुरावाच नष्ट करून टाकायचा हे लक्षात ठेवा.

भ्रष्टाचारावरून गदारोळ झाला की अनेक जण कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकतात. असे अजिबात करायचे नाही. आपले अर्थकारण सांभाळणार्‍याला वार्‍यावर सोडून द्यायचे नसते. उगाच संबंधात अविश्वास निर्माण होतो. मग पुढे आपली काळजी घ्यायच्या वेळी तो मागेपुढे बघतो. यात नुकसान होते ते आपलेच. आम्ही तर ठेकेदाराला आधीच पाच कोटीचे पेमेंट करून टाकले होते. कारवाई केली असती तर पैसेही अडकले असते व घेतलेले परत द्यावे लागले असते. आता पाणी सोडल्याने सारेच सुटले.

तलाव पुन्हा भरला नाही तर लोकांना बाटलीबंद पाणी पाजू. कमावले ते गमावण्याची तयारी ठेवा, तेही जनतेच्या भल्यासाठी अशीच आमच्या पक्षप्रमुखांची शिकवण आहे. काही गरज पडली तर ते मदतही करतील. त्यामुळे काळजी अशी नाहीच. ठेकेदार हेच आपले भाग्यविधाते आहेत हे कायम ध्यानात असू द्या.’ ऐकून हजर असलेले सारेच भारावले. त्यातल्या काहींनी विचारले. ‘आम्ही कधी अशा अडचणीत सापडलो तर उपाय सुचवाल का?’ यावर प्रमुख हसत हसत म्हणाले. ‘जरूर सुचवेन.

फक्त मला तुमच्या ‘त्या’ कंत्राटातल्या कमाईतील दोन टक्के रक्कम शुल्क म्हणून द्या.’ यावर सार्‍यांनी टाळ्या वाजवून सकारात्मक प्रतिसाद दिला. मेजवानीचा समारोप झाल्यावर निघताना खिशातला एक कागद दाखवत प्रमुख म्हणाले. ‘हे इंग्लंडहून शार्लोटच्या कुटुंबाकडून आलेले पत्र. तलावाला दीडशे वर्षे होत आली तेव्हा आता पाणी सोडलेच आहे तर नव्याने त्याची बांधणी करून टाका. हा सल्ला मी तात्काळ आमच्या पक्षप्रमुखांच्या कानावर टाकला. त्यांनी लगेच दीडशे कोटी मंजूर केले. आता ठेकेदारासकट आम्ही सारेच खूश.’