‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन २०२६’ची दीर्घयादी बुधवारी जाहीर करण्यात आली. १४ लेखिकांच्या या यादीत भारतीय वंशाच्या दोन लेखिका- न्यू यॉर्कस्थित मेघा मजुमदार आणि मँचेस्टरस्थित शीना कलायिल यांचा समावेश आहे. यादीत समाविष्ट असलेले मेघा मजुमदार यांचे ‘अ गार्डियन अँड अ थीफ’ पुस्तक कोलकाता शहराचे भविष्य कसे असेल, याचे कल्पनाचित्र मांडते. पूर आणि दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या या शहराच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी घडते. यात एका आईची कथा सांगण्यात आली आहे. तिचे नाव आहे- मा. आपली दोन वर्षांची मुलगी आणि वृद्ध वडिलांबरोबर राहणार्‍या माने खूप आटापिटा करून अमेरिकेला स्थलांतर करण्यासाठी ‘क्लायमेट व्हिसा’ मिळवला आहे. प्रयाणास अवघे काही दिवस शिल्लक असताना हा व्हिसा असलेली पर्स चोरीला जाते. चोर आहे याच पर्यावरणीय संकटांमुळे विस्थापित झालेली आणि किनारपट्टीच्या ग्रामीण भागात राहणारी किशोरी बूंबा. किशोरीला तिच्या कुटुंबाचे पोट भरण्याची भ्रांत भेडसावत आहे. त्यासाठी थोडा हातभार लागेल या आशेने तिने पर्स चोरली आहे. अमेरिकी सत्ताधार्‍यांचा लहरीपणा, एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांत सामावलेली शक्ती आणि अनिवासी भारतीयांची द्विधा ही कादंबरी चित्रित करते.

कोलकातामध्ये वाढलेल्या मेघा मजुमदार २००६ मध्ये शिक्षणानिमित्त अमेरिकेत गेल्या. हार्वर्ड विद्यापीठात सामाजिक मानववंशशास्त्राचा अभ्यास केला. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांची पहिली कादंबरी ‘अ बर्निंग’ २०२० मध्ये प्रकाशित झाली. ती ‘न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर’ ठरली. २०२१ मध्ये त्यांना ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कारा’ने आणि २०२२ मध्ये ‘व्हाइटिंग पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. ‘अ गार्डियन अँड अ थीफ’ ही त्यांची दुसरी कादंबरी असून तिचा ‘नॅशनल बुक अवॉर्ड’च्या दीर्घयादीतही समावेश करण्यात आला आहे.

शीना कलायिल यांच्या ‘द अदर्स’ या कादंबरीचा या दीर्घयादीत समावेश आहे. बर्लिनची भिंत पाडली जाण्याआधीच्या अखेरच्या काही दिवसांची पार्श्वभूमी यातील कथानकाला आहे. राजकीय क्षेत्रातील हादरवणार्‍या घडामोडींचा तीन मित्रांच्या आयुष्यावर आणि नात्यावर कसा परिणाम होतो, याचे वर्णन या कादंबरीत आहे. कलायिल यांचा जन्म १९७० मध्ये झांबियात झाला. मूळचे केरळमधील असलेले त्यांचे पालक झांबियामध्ये शिक्षक होते. शीना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनला गेल्या. २००२ मध्ये एडिनबरामध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी मोझांबिक, झिम्बाब्वे, ट्युनिशिया, इक्वेटोरियल गिनी, स्लोव्हेनिया आणि स्पेनमध्ये काम केले होते. सध्या त्या मँचेस्टर विद्यापीठात अध्यापन करत असून लँकेस्टर विद्यापीठातून भाषाशास्त्रात डॉक्टरेटसाठी संशोधन करत आहेत. ‘द ब्युरो ऑफ सेकंड चान्सेस’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीला २०१८ मध्ये ‘रायटर्स गिल्ड बेस्ट फर्स्ट नॉव्हेल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. या कादंबरीत ३० वर्षांहून अधिक काळ लंडनमध्ये राहून केरळला परतलेल्या एका विधुराचे आयुष्य चित्रित केले आहे. ‘द अदर्स’ हे त्यांचे चौथे पुस्तक आहे.

दीर्घयादीत सात नवोदित कादंबरीकारांनाही नामांकन मिळाले आहे. २०२५ च्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत समावेश असलेल्या सुजॅन चोई आणि केटी किटामुरा यांच्यासह किट डी वाल आणि लिली किंग यांचाही ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन २०२६’च्या दीर्घयादीत समावेश आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या साहित्य क्षेत्रातील महिलांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन प्रशस्तीची पावती देण्याच्या उद्देशाने नाटककार केट मूस यांनी १९९६ पासून हा पुरस्कार देण्यात सुरुवात केली. याआधीच्या विजेत्यांत झादी स्मिथ, कॅरोल शिल्ड्स, अली स्मिथ आणि चिमामांडा आदिची यांचा समावेश आहे.