रसिका मुळ्ये
भारतीय वनसेवेतील निवृत्त अधिकाऱ्याला मेळघाटातील जंगलाशी एकरूप होताना आलेले लहानमोठे अनुभव मांडणारे हे प्रवाही गोष्टीरूप पुस्तक वाचकाला अलगद हात धरून जंगलवाटांवर नेते.
‘द मेळघाट ट्रेल : वॉकिंग द वाइल्ड्स विथ अ फॉरेस्टर’ या पुस्तकातून लेखक प्रकाश ठोसरे वाचकाला अशाच एका जिवंत, श्वास घेणाऱ्या, संवाद साधणाऱ्या जंगलात घेऊन जातात. हा प्रवास केवळ जंगलातल्या पायवाटांचा नाही. अनुभव, आठवणी आणि जंगलाशी विविध मार्गांनी जोडलेल्या माणसांचाही आहे. महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे भारतातले जुने आणि समृद्ध असे जंगल क्षेत्र आहे. त्याचा क्षेत्रीय आवाका २ हजार ७६८ चौरस किलोमीटरचा. प्रोजेक्ट टायगरअंतर्गत साकारण्यात आलेल्या अगदी पहिल्या टप्प्यातील अभयारण्यांपैकी मेळघाट एक आहे.
कोरडे पानझडी जंगल, खोल दऱ्या, नद्या आणि समृद्ध जैवविविधता यामुळे मेळघाट केवळ वाघांसाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसंस्थेचा विचार करता वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरते. ठोसरे यांनी या जंगलाचा अनेक वर्षे अनुभव घेतला. त्यांचे त्या जंगलाशी घट्ट नाते असल्याची साक्ष ‘द मेळघाट ट्रेल’ देते. ठोसरे हे भारतीय वनसेवेतील निवृत्त अधिकारी. प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून ते निवृत्त झाले. घरातून वनसेवेचा वारसा त्यांना मिळाला. वनसेवेतील सुरुवातीच्या काळात ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून कार्यरत होते. ‘द मेळघाट ट्रेल’ हे पुस्तक त्यांच्या सेवाकाळातील अनुभवांवर आधारित आहे. वनसेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्तीच मेळघाट येथे झाली. त्यानंतरही दोनदा मेळघाट येथे नियुक्ती झाली.
एकूण सहा वर्षांच्या कार्यकाळात तेथील जवळपास दीड लाख किलोमीटर परिसर त्यांनी पिंजून काढला. त्यातला बहुतेक प्रवास पायी होता. मात्र हे पुस्तक आत्मचरित्र किंवा प्रशासकीय नोंदींचे संकलन, प्रवास वर्णन, पर्यटन मार्गदर्शिकाही नाही. मात्र, तरीही हे सर्व असलेले, जंगलाशी संवाद साधणारे, अनुभवातून उमललेले आणि वाचकाला संवेदनशील बनवणारे लेखन आहे. जंगलाशी एकरूप होताना आलेले लहान-मोठे अनुभव, निरीक्षणे त्यात आहेत. त्याचे प्रवाही गोष्टीरूप वाचकाला अलगद हात धरून जंगलवाटांवर नेते. झाडावर एका फांदीवर बसलेला वाघ, एका फांदीवर माणूस आणि झाडाखाली घिरट्या घालणारी रानकुत्री, कधी गाडीमागे दोन पायांवर वेगाने पळणारी अस्वले, अवचित गाठणारा बिबट्या हे सगळे या वाटांवर भेटतात.
‘सावलीत वाघ उभा होता. मी थांबलो, श्वास रोखला. पण त्याक्षणी जाणवलं की निसर्गाने आपल्याला फक्त अनुभवण्याची, पाहण्याची मुभा दिली आहे. हस्तक्षेप करण्याची नाही’ अशा आशयाचा उल्लेख पुस्तकातील एका गोष्टीत आहे. दुसऱ्या एका गोष्टीत जंगलाच्या कठोर नियमांची जाणीव होते. ‘गव्यांचा धावत आलेला समूह पाहून माझ्या हृदयाचा ठोका चुकला. पण मी शांतपणे निरीक्षण करत राहिलो. त्या वेळी जंगल सुंदर आहे तितकेच ते कठोरही आहे याची जाणीव झाली,’ असे लेखकाने म्हटले आहे. विविध प्रसंगांतील थरार अनुभवल्यानंतर उमटणारा प्रतिसाद शांतवला की हळूहळू जंगलाचे तत्त्वज्ञान कळू लागते आणि आपसूक जगण्याची शिकवणी सुरू होते. प्राणीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, फिरस्ते यांपासून अगदी तत्त्वज्ञान अभ्यासू इच्छिणाऱ्यालाही जंगल भरभरून देते, तसेच हे पुस्तकही. प्राण्यांमधला शहाणपणा, वेळप्रसंगी मुत्सद्दीपणा माणसाला शिकवणारा. शब्दांच्या माध्यमातून जंगलातल्या अव्यक्त संवादाचा भाग होण्याचा अनुभव ‘द मेळघाट ट्रेल्स’मधून मिळतो. ‘हॅबिटॅट’, ‘द विली लेपर्ड’, ‘द रॉयल टायगर’, ‘द लेसर मॉर्टल्स’, ‘द ब्रेव्ह हार्ट्स’, ‘द साहिब्स’, ‘युनिक’ अशा सात प्रकरणांत पुस्तकातील कथन विभागलेले आहे.
भारतीय आणि परदेशी साहित्यात भारतीय जंगलाला नेहमीच विशेष स्थान मिळत आले आहे. रुडयार्ड किपलिंगचे ‘द जंगल बुक’, जिम कॉर्बेट यांचे साहित्य, तसेच अलीकडच्या काळातील अमिताव घोष यांचे ‘जंगलनामा’ तर मराठीत मारुती चित्तमपल्ली यांसह अनेकांचे साहित्य या सगळ्यातून जंगल विविध रूपांत समोर येते. मात्र अपवाद वगळता शिकारी किंवा वन्यजीवांशी झालेल्या संघर्षाचा थरार, जंगलांचे अस्तित्व राखताना उभ्या असलेल्या समस्या, जंगलाच्या भोवतालीच उभे राहिलेले कल्पित वाटावे असे कथानक किंवा शास्त्रीय नोंदी अशा साच्यात बहुतेक साहित्य दिसते.
‘द मेळघाट ट्रेल’ हे या परंपरेशी फारकत घेणारे म्हणावे लागेल. कल्पनाविलास किंवा फक्त नाट्यप्रधान प्रसंग न मांडता, प्रत्यक्ष अनुभवांतून उभ्या राहिलेल्या वास्तव जंगलाचे चित्रण या पुस्तकात आहे. यात थरार आहे, भानावर आणणारी वास्तवाची जाणीव आहे, प्राण्यांच्या, झाडा झुडपांच्या अभ्यासपूर्ण नोंदीही आहेत. पुस्तकातील वर्णने, किस्से, कधी फजिती, विनोदाची झालर हे सारे वाचकाला तटस्थपणे गोष्टी वाचण्यापलीकडे सहज नेते. साध्या, सोप्या पण प्रवाही इंग्रजी भाषेतील ही मांडणी हे पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य. वाघ, बिबटे, रानडुक्कर, हरणे यांचे दर्शन हे थरारक क्षण असले तरी लेखक त्याकडे केवळ साहस म्हणून पाहत नाहीत. त्यांच्या सवयी, हालचाली आणि जंगलातील भूमिका ठोसरे यांनी समजावून सांगितल्या आहेत. आकर्षक आणि पूरक छायाचित्रे, गोष्टीतील नेमकी स्थिती समजावून देणारी रेखाटने, नकाशे हे घटक आशयात आणि पुस्तक आकर्षक होण्यातही भर घालणारे आहेत. निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांची प्रस्तावना पुस्तकाला आहे. ‘जंगल बुक ऑफ रिसेंट टाइम्स’ म्हणजे सद्या काळातील जंगलबुक असे वर्णन त्यांनी केले आहे.
जंगल ही एक संतुलित, संवेदनशील, परिपूर्ण व्यवस्था आहे, हे पुस्तकातून वारंवार अधोरेखित होते. प्राणी हे या पुस्तकांतील बहुतेक कथांचे नायक आहेत. मात्र, या कथनात माणसांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. नकाशावर, कायद्याने या जंगलाला संरक्षण आहे. मात्र जंगल राखतात ते तेथील स्थानिक, आदिवासी, वनकर्मचारी. वनरक्षक, स्थानिक कर्मचारी आणि आदिवासी समाज यांच्याशिवाय जंगलाचे संरक्षण शक्य नाही, हे ठामपणे मांडण्यात आले आहे. त्यांच्या कष्टांची, धोक्यांची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची झलक पुस्तकाला मानवी स्पर्श देते. आदिवासी मार्गदर्शकांच्या तपशिलातील सूक्ष्म गोष्टी, सावधपणा, जंगलाचे आपापसातले संभाषण उमजण्याची हातोटी, प्राणी-पक्षी यांचे एकमेकांना होणारे इशारे अशा अनेक बाबींतून जंगलाइतकीच त्याच्याशी तादात्म्य पावलेल्या तेथील माणसांचीही ओळख होते. वेळप्रसंगी वाघासमोर उभे राहून अधिकाऱ्यांना वाचवणारे, प्राण्यांना वाचवण्यासाठी धडपडणारे कर्मचारी असे जंगल जपण्याच्या प्रक्रियेत प्रकाशझोतात न आलेले अनेक ‘हिरो’ही या पुस्तकातून भेटतात. स्थानिक आदिवासी, त्यांची संस्कृती, लढा हेही अनेक गोष्टींतून डोकावते. त्यामुळे पुस्तक २०१९ साली प्रकाशित झाले असले तरी सध्या वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अधिक महत्त्वाचे ठरते. हवामान बदलाचे परिणाम, पर्यटनाचा वाढता दबाव आणि जंगल संवर्धनाच्या गुंतागुंतीच्या समस्या या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘द मेळघाट ट्रेल’ विचार करण्यास भाग पाडते. जंगल जपणे म्हणजे केवळ प्राणी वाचवणे किंवा जागा दिसेल तिथे झाडे लावत सुटणे नाही. तर निसर्गाचा, संपूर्ण परिसंस्थेचा समतोल राखणे आहे, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे.
जंगल अजूनही जिवंत आहे, ते माणसाला काही सांगू पाहाते. त्याचा आवाज ऐकण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. गेल्या काही वर्षांत आवाज, गोंगाट, टिपेचे सूर, जीवघेणा वेग, उन्मादी उत्सव याचा सोस माणसाच्या ठायी वाढत असताना जंगलातला हा प्रवास पुन्हा एकदा शांततेशी, निसर्गाशी माणसाची नाळ जोडू पाहतो.
rasika. mulye@expressindia. com
