प्रवीण मोते (पर्यावरण अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाचे अभ्यासक)
भारताच्या औद्योगिक, ऊर्जा आणि तंत्रज्ञानविषयक भवितव्यात खनिजांचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. लोखंड, कोळसा, मँगनीज, बॉक्साइट यांसारख्या पारंपरिक खनिजांबरोबरच लिथियम, कोबाल्ट, निकेल, ग्रेफाइट आणि इतर महत्त्वाच्या खनिजांचा प्रश्न आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेला आहे. या पार्श्वभूमीवर खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम, १९५७ अर्थात खान व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम कायद्यात २०२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या बदलांनी केवळ खाण उद्योगाची दिशा बदलत नाही, तर केंद्र-राज्य आर्थिक संबंधांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
२०२६ मधील प्रस्तावित बदलांचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की खनिज हक्क किंवा खनिजयुक्त जमिनीवर राज्यांनी लावलेल्या कर, उपकर किंवा इतर आकारण्यांवर केंद्रीय पातळीवर अधिक स्पष्ट मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की अनेक कर आणि उपकरांमुळे खाण प्रकल्पांचा खर्च वाढतो, गुंतवणूक कमी होते आणि खनिज उत्पादनाला अडथळा येतो. दुसरीकडे खनिजसमृद्ध राज्यांचा प्रश्न वेगळा आहे. खनिजांचा पर्यावरणीय व सामाजिक खर्च राज्यांनी आणि स्थानिक समुदायांनी सहन करायचा, पण त्या संसाधनातून मिळणार्या अतिरिक्त महसुलाच्या साधनांवर मर्यादा आल्या तर राज्यांच्या वित्तीय स्वायत्ततेचे काय?
२०२६ मधील बदल कोणत्या दिशेने?
२०२६ मध्ये खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम कायद्यातील सुधारणांचा एक भाग आधीच नियमांच्या पातळीवर पुढे गेला आहे. केंद्राने खनिज पट्ट्यात संबंधित किंवा अतिरिक्त खनिजांचा समावेश, सलग क्षेत्रांचा समावेश आणि खोलवर आढळणार्या खनिजांच्या शोधाला चालना देण्यासाठी नियमांत बदल केले आहेत. खनिज व्यवहार अधिक संघटित करण्यासाठी खनिज आदान प्रदानाची संकल्पनाही पुढे आली आहे. दुसरीकडे जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा प्रस्तावांत खनिज क्षेत्रातील परवाना-क्षेत्राच्या मर्यादा आणि अन्वेषणाशी संबंधित प्रक्रियांमध्ये बदल सुचवण्यात आले होते. २०२६ चे बदल या व्यापक सुधारणा-क्रमाचा पुढील टप्पा मानता येतील. त्याच वेळी, १ ऑगस्ट २०२६ पासून जन विश्वास विधेयक दुरुस्तीमुळे खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियममधील काही उल्लंघनांचे गुन्हेगारीकरण कमी करून नागरी दंडाची व्यवस्था लागू झाली आहे. उद्योगांसाठी ही व्यवसाय सुलभतेची (इझ ऑप डुईंग बिझनेस) बाब असली तरी नियमन सैल होताना अनुपालन, पर्यावरणीय संरक्षण आणि स्थानिक हितसंबंध यांची अंमलबजावणी कमकुवत होऊ नये, ही मोठी अडचण असणार आहे.
केंद्र सरकारच्या दृष्टीने संभाव्य फायदे
दुसरा फायदा म्हणजे दुर्मीळ संयुगां (critical minerals) च्या पुरवठ्याला चालना. इले्ट्रिरक वाहने, बॅटरी, अक्षय ऊर्जा, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांसाठी काही खनिजांचे महत्त्व वाढले आहे. देशांतर्गत शोध आणि उत्पादन वाढले तर आयात जोखीम कमी होऊ शकते. राष्ट्रीय पातळीवर हा उद्देश आर्थिक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.
खनिजांचे मालकी हक्क आणि खनिजांवरील कराधिकार यांचा प्रश्न भारतीय संविधानातील संघराज्यीय रचनेशी जोडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०२४ मधील निर्णयानंतर खनिज हक्कांवरील कराधिकाराबाबत राज्यांची भूमिका अधिक ठळकपणे पुढे आली. त्यानंतर केंद्राकडून एकसंघ आणि अंदाजनीय खनिज कररचना आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे २०२६ मधील बदल हा केवळ उद्योगधोरण नसून केंद्र-राज्य वित्तीय संतुलनाचा विषय आहे.
खनिजसमृद्ध राज्यांच्या बाजूने सर्वात मोठा युक्तिवाद असा आहे की खाणकामाचा खर्च केवळ महसूल खात्यात दिसत नाही. रस्ते, पाणी, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण, जंगलांचे नुकसान, शेतीवरील परिणाम, विस्थापन आणि स्थानिक पायाभूत सुविधांवरील दबाव यांचा भार राज्य आणि स्थानिक प्रशासनावर पडतो. त्यामुळे राज्यांना अतिरिक्त महसूल साधने वापरण्याची क्षमता नसेल तर संसाधन दोहन (resource extraction) आणि संसाधन न्यायपूर्ण (resource justice) यांच्यातील दरी वाढू शकते.
याशिवाय खनिजसमृद्ध जिल्ह्यांना मिळणार्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान (District Mineral Foundation ( DMF)) निधीचा उपयोग स्थानिक प्रभावित लोकांसाठी केला जातो. महाराष्ट्राच्या खनिज पट्ट्यातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर विभागातील काही भागांसाठी खाणकामाचा प्रश्न रोजगाराइतकाच जमीन, जंगल, पाणी आणि स्थानिक उपजीविकेशी संबंधित आहे. म्हणून राज्याच्या महसुली स्वायत्ततेसोबत जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि स्थानिक सहभागाची रचना मजबूत करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र : संधी मोठी, पण धोकाही मोठा
महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे खनिज उत्पादक राज्य आहे. विशेषत: चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर आणि कोकण क्षेत्र या पट्ट्यात कोळसा, लोखंड खनिज आणि मँगनीज यांसारख्या संसाधनांमुळे खाण आणि त्यावर आधारित उद्योगांचे महत्त्व आहे. परंतु महसुली अधिकार कमी झाले आणि खनिज उत्खननाचा वेग वाढला तर महाराष्ट्रासाठी दुहेरी आव्हान निर्माण होईल. एकीकडे राज्याच्या स्वत:च्या महसुली साधनांवर परिणाम होऊ शकतो; दुसरीकडे पर्यावरण, पाणी, वन आणि स्थानिक पायाभूत सुविधांवरील खर्च वाढू शकतो. खाणपट्ट्यांतील जिल्ह्यांना मिळणार्या लाभांचा मोठा हिस्सा प्रत्यक्ष स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचला नाही तर विकासाऐवजी असमानता वाढण्याची शक्यता आहे.
पर्यावरण आणि आदिवासी हक्क : ‘वेग’ पुरेसा नाही
खनिज उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट महत्त्वाचे असले तरी भारतातील अनेक खनिज पट्टे वनक्षेत्र, आदिवासी क्षेत्र आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशात आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली याचे ठळक उदाहरण आहे. येथे खाणकामाचा प्रश्न केवळ परवानगी आणि रॉयल्टीचा नसून वनाधिकार, ग्रामसभा, पेसा कायदा, जैवविविधता आणि स्थानिक उपजीविकेचा आहे.
कायद्यातील प्रक्रिया सुलभ करणे म्हणजे पर्यावरणीय मंजुरी किंवा स्थानिक सहभाग कमी करणे असा अर्थ होऊ नये. उलट, जलद पण पारदर्शक मंजुरीसाठी पायाभूत पर्यावरणीय माहिती, संचयी परिणाम मूल्यांकन, खाण बंद करण्याचे नियोजन, भूजल निरीक्षण आणि सार्वजनिक माहितीची सक्ती अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.
एखाद्या जिल्ह्याला रॉयल्टी किंवा जिल्हा खनिज विकास निधीमधून निधी मिळतो, पण त्याच वेळी पाणी, जंगल, आरोग्य आणि शेतीवरील दीर्घकालीन नुकसान वाढते, तर केवळ महसूल वाढला म्हणून विकास झाला असे म्हणता येणार नाही.
महाराष्ट्राने कोणती भूमिका घ्यावी?
महाराष्ट्राने सुधारणा पूर्णपणे नाकारण्याऐवजी तीन मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडावी. पहिला मुद्दा म्हणजे ‘न्याय्य महसूल वाटप’. केंद्राने खनिजांवरील अतिरिक्त राज्य आकारण्यांवर मर्यादा आणल्यास त्याची भरपाई किंवा पर्यायी महसूल यंत्रणा स्पष्ट असावी. दुसरा मुद्दा म्हणजे ‘स्थानिक लाभ’. जिल्हा खनिज न्यास निधीचा परिणाम मोजण्यासाठी स्वतंत्र सामाजिक लेखापरीक्षण, जिल्हानिहाय परिणाम निर्देशक आणि सार्वजनिक माहिती उपयुक्त ठरतील. तिसरा मुद्दा म्हणजे ‘मूल्यवर्धन’. महाराष्ट्रातून खनिज बाहेर पाठविण्याऐवजी राज्यात प्रक्रिया, पुनर्वापर आणि उत्पादन वाढविण्यावर भर असावा.
विशेषत: गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांसाठी खनिज ते उत्पादन मॉडेलचा विचार करता येईल. खाणपट्ट्यातील रोजगार, कौशल्यविकास, स्थानिक उद्योजकता, आरोग्य, पाणी आणि रस्ते यांना खनिज अर्थव्यवस्थेशी जोडले तर संसाधनांचा लाभ अधिक व्यापक होऊ शकतो.
राज्याने केंद्राशी संवाद साधताना एक महत्त्वाचे तत्त्व मांडले पाहिजे : राष्ट्रीय खनिज सुरक्षा ही सामायिक जबाबदारी आहे, पण तिचा खर्चही सामायिक असला पाहिजे. राष्ट्रीय गरजेसाठी खनिज उत्पादन वाढविले जात असेल तर त्यातून निर्माण होणार्या पर्यावरणीय आणि सामाजिक दायित्वांसाठी केंद्र-राज्य-उद्योग अशी त्रिपक्षीय जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
खरा कस महसुलात नव्हे, परिणामात
खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम कायद्यातील २०२६ च्या सुधारणा भारताच्या खनिज अर्थव्यवस्थेला अधिक वेग देण्याचा प्रयत्न करतात. त्या दिशेने पाहिले तर अन्वेषण, महत्त्वपूर्ण खनिज, बाजारातील पारदर्शकता आणि गुंतवणूक यांसाठी या बदलांत संधी आहे. पण खनिजसमृद्ध राज्यांसाठी हा प्रश्न केवळ ‘किती उत्पादन वाढले’ इतकाच नाही. ‘किती महसूल राज्याला मिळाला’, ‘स्थानिकांना किती फायदा झाला’, ‘पर्यावरणीय नुकसान किती झाले’ आणि ‘भविष्यातील पिढ्यांसाठी काय उरले’ हे प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी योग्य मार्ग म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्टांना विरोध नव्हे, तर सहकारी संघराज्यवादाच्या चौकटीत अधिक न्याय्य भागीदारीची मागणी. खनिज संपत्ती ही जमिनीखाली असली तरी तिचे परिणाम जमिनीवरच दिसतात. त्यामुळे केंद्राने धोरणात्मक नेतृत्व करावे, राज्यांना वित्तीय आणि प्रशासकीय भागीदारी मिळावी, उद्योगाने पर्यावरणीय व सामाजिक जबाबदारी स्वीकारावी आणि स्थानिक समुदायांना निर्णयप्रक्रियेत अर्थपूर्ण स्थान मिळावे.
खनिज उत्खननाचा वेग वाढविणे सोपे आहे; पण खनिजातून शाश्वत आणि न्याय्य विकास घडविणे हेच खरी कसोटी आहे. २०२६ च्या खाण व खनिजे (विकास व नियमन) अधिनियम सुधारणांचे अंतिम यश या कसोटीवरच ठरेल.
