‘अक्षरलेखनाची एक नवी पद्धत महाराष्ट्रात हेमाडपंताने सुरू केली, त्यावरून ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की, महाराष्ट्रातील विचारी पुढारी लोक परदेशस्थांची एखादी चांगली रीती उपयोगी असल्यास स्वीकारण्यास फार पुरातन कालापासून तयार असतात’, असा आपला प्रांताभिमान दर्शवणारा शेरा मारून राजवाड्यांनी पुढे थोडक्यात इतर प्रांतांशी तुलना करीत म्हटले, ‘इ. स. १२५० पूर्वीच म्हणजे हेमाद्रीच्याही पूर्वी शंभरदीडशे वर्षे महाराष्ट्राच्या उत्तरेस मुसुलमान आले असता त्यांच्या शिकस्ता लिहिण्याच्या तर्हेवरून ब्रज भाषा मोडीने लिहिण्याची पद्धत तिकडील विचारी पुरुषांनी पाडलेली दिसत नाही. महाराष्ट्रात मोडी लिहिण्याचा प्रघात आज साडेसहाशे वर्षे चालू असता भरतखंडातील इतर कोणत्याहि भाषेला हा प्रघात उचलण्याची आवश्यकता दिसली नाही. गुजराथी वगैरे इतर भाषांत पत्रे वगैरे रोजच्या व्यवहारातील लिखाण किसबीड अशा मूळ बिनओळीच्या बाळबोध अक्षरांनीच करतात… फारशी अक्षरे लिहिण्याची पद्धत ज्याने एकदा पाहिली, त्याला देवनागरी बाळबोध अक्षरे एका झटक्याने लिहिण्याची क्लृप्ति सुचण्याचा संभव आहे. कागदावर लिहिण्याचा प्रघात पडल्याबरोबर मोडी लिहिण्याचाही प्रघात महाराष्ट्रात लवकरच पडला आणि त्याचे प्रथम श्रेय जाधवांचा दफ्तरदार जो हेमाद्रि त्यास विद्वत्तेच्या व अधिकाराच्या वजनावर सहजासहजी घेता आले.’
ही वस्तुस्थिती सांगून झाल्यावर राजवाड्यांनी मोडी व हेमाद्रि या दोघांशीही संबंधित असणार्या या पर्यायी कथेचाही मुद्दा धसाला लावला. ‘हेमाद्रीने मोडी लिहिण्याची चाल लंकेहून आणिली, अशी जी कथा आहे, तीत कितपत अर्थ आहे, ते पाहिले पाहिजे. देवगिरीच्या जाधवांचे साम्राज्य सर्व दक्षिणभर कन्याकुमारीपर्यंत होते, हे प्रसिद्ध आहे. साम्राज्यातील दफ्तरे तपासण्यास कन्याकुमारी वा रामेश्वर ह्या दक्षिणेकडील प्रांतांत जाऊन व कदाचित लंकेची यात्रा करून परतल्यावर सर्व दफ्तर मोडीत लिहिण्याचा वटहुकूम हेमाद्रीने काढिला असावा, असे दिसते. लंकेहून परत येण्याला व हा नवा वटहुकूम काढण्याला एकच गाठ पडल्यामुळे, लंकेचा व मोडी अक्षराचा लोकांनी विनोदाने संबंध जोडून दिला असेलसे वाटते. बाकी लंकेतील त्यावेळच्या सिंहली भाषेचा व मोडीचा काही संबंध असल्याचे बिलकुल प्रमाण नाही. सिंहली भाषेत मोडीचा प्रचार आजही नाही व पूर्वीही नव्हता. अर्थात मोडीचा प्रघात फारशी लिपी व फारशी कागद यांच्या आगमनाने पडला, ह्यात फारसा संशय नाही. तशात मोडी म्हणजे देवनागरी लिपीहून भिन्न अशा तामीळ, तेलगु, कानडी किंवा सिंहली अक्षरमालिकेपासून घेतलेली आहे, असाही प्रकार नाही.’
‘मोडी अक्षर देवनागरी अक्षरे मोडून तयार केलेले आहे, हे चारपाचशे वर्षांची जुनी पत्रे पाहिली म्हणजे स्पष्ट दिसून येते’, असे राजवाड्यांनी पुढे म्हटले आणि लगेच सांगितले की, ‘मजजवळ इ. स. १४१६ पासून आतापर्यंतचे अनेक जुने मोडी लेख आहेत. इ. स. १२५० पासून १४१६ पर्यंतचा मात्र एकहि मोडी लेख अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाही. १४२६ च्या पुढील कागदत्रांवरील मोडी अक्षर देवनागरी अक्षराशी ताडून पाहता, देवनागरी बाळबोध अक्षरे एका झटक्यासरशी लिहिल्याने मोडी अक्षर सिद्ध होते, हे नामी कळते. प्राय: प्रत्येक देवनागरी बाळबोध अक्षर दोनतीनदा हात थांबल्यावाचून लिहिताच येत नाही. उदाहरणार्थ – अ, इ. उ, क वगैरे पाहिजे ते अक्षर घ्या. अला चारदा, इला दोनदा, उला दोनदा, कला तीनदा किंवा चारदा हात थांबवावा लागतो. हीच अक्षरे हात न थांबवता लिहिली म्हणजे त्यांची मोडी रूपे सिद्ध झाली. ज्यांनी मोडी अक्षराच्या ऐतिहासिक परंपरेकडे लक्ष दिले नाही, त्यांना मोडीतील कित्येक अक्षरे देवनागरी अक्षरांपासून निघाली, हे विधान बराच विचार केल्यावाचून व माहिती मिळवल्यावाचून खरेही वाटणार नाही, इतका मूळ देवनागरी अक्षरांत व त्यांच्या डौलदार व भपकेदार मोडींत फरक झालेला आहे… हे शेवटले रूप बनवायला सहाशे वर्षांचा अवधी व अनेक कलमबहाद्दरांची हातचलाखी लागलेली आहे!’
अशी सगळी रंजक माहिती पुरवून राजवाड्यांनी एका बाबीबद्दलचे विवेचन संपवले.
