नारी शक्तीला वंदन केल्याचे ढोलनगारे पिटले जात नसण्याच्या काळात- १९५४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन संयुक्त प्रांताचे (आता उत्तर प्रदेश) एक आमदार जमीलुर रहमान किडवाई यांना प्रश्न केला- ‘तुमच्या नवपरिणीत सूनबाईंची ओळख माझ्याशी तुम्ही करून दिलीत; पण राजकारणात त्या कधी येणार’? ती नवी सून सहाच वर्षांनी राजकारणात आली. जमीलुर रहमान यांनी पुन्हा न लढण्याचा निर्णय घेऊन सुनेला निवडणूक लढवण्याची संधी दिली.

मोहसिना किडवाई विजयी झाल्या आणि पाच वर्षे आमदार राहून नंतरच्या निवडणुकीत हरल्यासुद्धा. तेव्हा मात्र ‘घराणेशाहीच्या लाभार्थी’ न ठरण्याचा कानमंत्र त्यांना इंदिरा गांधी यांनी दिला. ‘महिला म्हणून राजकारणात वावरताना कोणत्याही अपमानाचे दु:ख वाटून घ्यायचे नाही. काम करायचे.’ हा कोरडा उपदेश नसल्याचे खुद्द इंदिरा गांधी यांनीच सिद्ध केले होते हे सर्वज्ञात आहे. लोकशाहीचा काळाकुट्ट अध्याय ठरणारी आणीबाणी उठल्यावर १९७७ पासून आलेले जनता सरकार पडल्यानंतर पुन्हा १९८० च्या जानेवारीत लोकांचा पाठिंबा मिळवून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या.

मात्र त्याआधीच, ऐन १९७८ मध्ये म्हणजे जनता पार्टीचे सरकार केंद्रात आणि उत्तर प्रदेशातही सत्तेवर असताना, जनता पार्टीचे रामनरेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आझमगढची खासदारकी सोडल्यामुळे झालेली लोकसभा पोटनिवडणूक मोहसिना किडवाई यांनी जिंकली होती. आझमगढशी त्यांचा तर संबंध नव्हता. त्यांचे माहेर व सासरही बाराबंकीचे. बरे, ‘काँग्रेसने दगड उभा केला तरी निवडणूक जिंकतो’ ही तत्कालीन म्हण तर आदल्याच वर्षी (१९७७)  इतिहासजमा झाली होती, मोहसिनांनाही तेव्हा मेरठमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तरीही आझमगढहून मोहसिना लोकसभेत गेल्या.

उत्तर प्रदेशाच्या ‘गंगाजमनी तहज़ीब’ला आवाहन करत पुन्हा १९८० मध्येही जिंकल्याच, पण उत्तर प्रदेशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्याचे श्रेय काँग्रेस संघटनेतील त्यांच्या नेतृत्वाला दिले गेले. थोडक्यात, ज्या ‘लढाऊ बाण्याच्या नेत्यां’ची  काँग्रेसला आज कधी नव्हे इतकी गरज आहे, तशा त्या त्यांच्या उमेदीच्या काळात होत्या. अगदी वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत संसद सदस्य आणि काँग्रेसच्या पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतरच्या दहा वर्षांपैकी पहिली पाच वर्षे त्यांनी आठवणी लिहून काढल्या. 

या लिखाणाला पत्रकार रशीद किडवाई यांनी आकार दिला आणि ‘माय लाइफ इन पॉलिटिक्स’ हे आत्मचरित्र (२०२२) प्रकाशित झाले. राजकारणात सहा दशके काढल्यानंतरचे हे आत्मचरित्र, भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेल्या मोहसिना काँग्रेसनिष्ठच का होत्या याचीही उकल करते. सासर-माहेरचे काँग्रेसशी संबंध हे एक कारण, हल्लीची मोजपट्टी वापरायची तर मुस्लीम असणे हे दुसरे कारणही एकवेळ मान्य करता येईल. पण ६० वर्षे? तेही राज्यपाल वगैरे नव्हे; संसदेत काम. हे मोहसिनांकडून होऊ शकले कारण, काँग्रेसचे खरे स्वरूप ‘देशातल्या सर्वांना समान संधी देऊन, कोणताही भेदभाव न करता देश एकसंध ठेवण्याची चळवळ’ हेच आहे याची त्यांना कायम असलेली जाणीव आणि त्यांना असलेले भोवतालाचे भान. त्यांना आदरांजली वाहू इच्छिणार्‍यांनी ही जाण आणि हे भान कायम ठेवण्याचा प्रयत्न जरूर करावा.