शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणार्‍या गिर्यारोहकांनो, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी! तुम्ही सर्व जाणताच की यंदा म्हणजे २२ मे रोजी तब्बल २७४ गिर्यारोहकांनी एकाच वेळी एव्हरेस्ट शिखर सर केले. हा विक्रम आहे. आता दरवर्षी असेच नवनवे विक्रम या शिखरावरील चढाईच्या बाबतीत नोंदवले जाणार याविषयी आमच्या मनात कसलीही शंका नाही. कुठल्याही यशाच्या बाबतीत कायम नाक मुरडणार्‍या काहींनी यंदा शिखरावर झालेल्या गर्दीवर टीका केली असून याचेही बस स्थानक वा विमानतळ करून टाकले असा टोमणा मारला आहे. या टीका-टोमण्यांकडे दुर्लक्ष करून ध्येयप्राप्तीसाठी झटणार्‍या गिर्यारोहकांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे. या वेळी शिखर गाठण्याच्या अंतिम टप्प्यात झालेल्या गर्दीमुळे ‘थोडी’ चेंगराचेंगरी झाली व त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यातले दोघे भारतीय होते.

हे शिखर सर करताना आठ हजार मीटर उंचीवर ‘डेथ झोन’ सुरू होतो. प्राणवायूच्या कमतरतेमुळे इथे जास्त काळ राहणे कठीण असते. त्यामुळे या झोनपासूनचा पुढचा ८४९ मीटरचा टप्पा लवकर पूर्ण करून खाली येणे गरजेचे असते. अरुंद वाट, त्यात गर्दी व प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेकांना हे अंतर लवकर पार करता आले नाही. त्यामुळे काहींचा श्वास कोंडला तर दोघांचा मूत्यू झाला. या मृतांबद्दल पूर्णपणे संवेदना व्यक्त करून नव्यानेच स्थापन झालेल्या आमच्या संस्थेने ‘गर्दीत शिखर कसे गाठायचे’ असा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. दर नाममात्र आहेत. इच्छुकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही या माध्यमातून करत आहोत. गिर्यारोहणाचा सराव केलेल्यांनी यात सहभागी व्हावे अशी संस्थेची इच्छा आहे. सहभागींना देशातील गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येईल. मुंबईची लोकल, बस स्थानक, विमानतळावरील गर्दीची वेळ बघून त्यात कसे शिरायचे, इतरांना धक्के देत समोर कसे जायचे, इच्छित ठिकाण सर्वांत आधी कसे गाठायचे, असे या प्रशिक्षणाचे स्वरूप असेल. अशा ठिकाणी प्राणवायू मिळतो पण कमी प्रमाणात. त्यामुळे इच्छुकांना त्याचीही सवय होईल. एव्हरेस्टवरील चढाईची वाट कमालीची अरुंद आहे. अशा वाटेवर कधी खांद्याने धक्का देत तर कधी पाय अडकवत इतरांना मागे ढकलून समोर कसे जायचे हेही यात शिकवले जाईल. महाभारतातील पांडव व द्रौपदी राजसंन्यास घेतल्यावर हिमालयाच्या मार्गाने स्वर्गाकडे प्रस्थान करते झाले. ते जसे वर जाऊ लागले तसे मृत्युमुखी पडू लागले. टिकले फक्त युधिष्ठिर! या माध्यमातून प्रत्येक गिर्यारोहकाला आधुनिक युधिष्ठिर बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. हिमालयात तेव्हाही प्राणवायूची कमतरता असावी व आताही आहे. फक्त वाढली ती गर्दी! त्यावर कशी मात करायची हेच आम्ही या माध्यमातून शिकवणार आहोत. शेर्पांनासुद्धा आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. त्यासाठी नेपाळमधून नोंदणीसुद्धा करून घेतलेली आहे.

गर्दीतून वाट काढत इच्छित ध्येय गाठणे हे किमान भारतात तरी अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे शिखर सर केल्यावरही नंतरच्या आयुष्यात तुम्हाला याचा फायदाच होईल याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. एकाच दगडात अनेक एव्हरेस्ट गाठण्याच्या या संधींचा सर्व गिर्यारोहकांनी लाभ घ्यावा व पुढील वर्षीच्या मे महिन्यात एव्हरेस्टवर मोठ्या संख्येने गर्दी करून नवा विक्रम नोंदवावा, असे आवाहन संस्थेतर्फे सर्वांना करण्यात येत आहे.