दिल्लीवाला
सध्या लोकसभेत एकमेव खासदार आहेत ज्यांचा प्रवास तिहार तुरुंग ते संसद आणि पुन्हा तिहार असा होतो. हे खासदार म्हणजे काश्मीर खोर्यातील बारामुल्ला मतदारसंघात ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करणारे इंजिनीअर रशीद. हे लोकसभेतील अपक्ष खासदार आहेत. ते तिहार तुरुंगात असतात. इंजिनीअर जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी-जहाल नेते मानले जातात. त्यांनी लोकसभेची निवडणूकदेखील तुरुंगातून लढवली होती. त्यांनी ओमर यांना पराभूत कसं केलं याची एक वेगळीच कहाणी आहे.
सध्या ते कैदेत आहेत आणि त्यांचा नियमित जामीनही दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही त्यांचा प्रवास तुरुंगातून संसदेत होईल. ते सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तिहारमधून संसदेत येतात, दिवसभर तिथंच असतात. त्यांना कॅन्टिनमध्ये जाता येतं. आतल्या लॉबीमध्ये खासदारांशी गप्पा मारता येतात. पण, अन्य कोणाशी बोलण्याची परवानगी नाही. त्यांना फार तर मंत्र्यांच्या दालनात कामानिमित्त जाता येऊ शकतं. त्यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत संसदेत आणलं जातं आणि परत नेलं जातं. कधी कधी लोकसभा रात्री उशिरा एक-दीड वाजेपर्यंतही चालते. इंजिनीअर रशीद बसून असतात. पुन्हा सकाळी साडेदहापर्यंत संसदेत येतात.
गेल्या दोन अधिवेशनांमध्ये त्यांना सहभागी होण्याची सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. त्याआधी ते फक्त खासदारकीची शपथ घेण्यासाठी आले होते. त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानही करता आलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इंजिनीअर यांनी मानेनेच नकार दिला होता. अपक्ष म्हणून ते लोकसभेत प्रश्न विचारत असतात. काश्मीर हा आता भाजपसाठी गुलदस्त्यात गेलेला विषय आहे. पण, ओमर यांचा पराभव करणारे नेते अशी त्यांची ओळख असल्याने त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातं. त्यांच्यामुळं काश्मीर पुन्हा चर्चेत येतं. खासदार म्हणून त्यांना ल्युटन्स दिल्लीत सदनिका दिलेली आहे. तिथं त्यांचं कुटुंब क्वचित कधीतरी येतं. त्यांच्या दोन मुलांपैकी लहान मुलगा दिल्लीत तर मोठा काश्मीर खोर्यात असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही इंजिनीअर तिहार ते संसद ते तिहार असा प्रवास करतील.
माकडासाठी धावाधाव
दिल्ली हे एक मजेशीर शहर आहे. इथं सुरक्षेचं मोठं प्रस्थ आहे. या सुरक्षा व्यवस्थेचीही वेगळीच गंमत आहे. ल्युटन्स दिल्लीमध्ये ठिकठिकाणी दिवसाही नाकाबंदी केलेली असते. संसदेचं अधिवेशन सुरू असेल त्या दिवसांत तर या नाकाबंदीमुळं सामान्य दिल्लीकरांना जीव नकोसा होतो. तसा तो हवेच्या प्रदूषणामुळंही होतो हा भाग वेगळा. पण, जिथं जाईल तिथं सुरक्षा यातून अनेकदा विनोदी प्रसंगही घडतात. अशा प्रसंगांमध्ये कोणाची ना कोणाची तरी तारांबळ उडत असते. मग, चीडचीड होते, आरडा-ओरडा होतो. असं सगळं सुरू असतं. गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत प्रचंड घडामोडी होत होत्या. एका बाजूला युरोपियन युनियनचं (ईयू) शिष्टमंडळ आलेलं होतं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं.
एकूणच ल्युटन्स दिल्लीत गडबड सुरू होती. दिल्लीत आलेल्या ईयूवाल्यांशी ऐतिहासिक करार झालेला होता. ही मंडळी दोन दिवस राहिली. त्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात भोजन समारंभही आयोजित केलेला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. दक्षिण दिल्लीतील कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. तिथून या शिष्टमंडळातील सदस्य अत्यंत कडेकोट बंदोबस्तात नियोजित कार्यक्रमाला जाणार होते. इतर वेळीही मंत्रीसंत्री जाणार असेल तर ल्युटन्स दिल्लीत नाकाबंदी केली जाते, लोकांना अडवलं जातं. वाहतूक ठप्प होते. तर मग, परदेशी पाहुणे आल्यावर तर हे सगळं होणारच. संध्याकाळची वेळ होती. साऊथ एव्हेन्यू भागातून या शिष्टमंडळाच्या मोटारगाड्यांचं पथक निघालं होतं. थोड्या थोड्या अंतरानं जवळजवळ अर्धा तास त्यांच्या मोटारगाड्या भरधाव वेगानं जात होत्या. त्यांना सुरक्षा कवच असल्यामुळं परिसरातली रहदारी वगैरे बंद करण्यात आली होती. इथे दुतर्फा खासदारांची निवासस्थानं आहेत. त्यासमोर स्व्हिहस रोडही आहे.
या रस्त्यावरही कोणाला येऊ दिलं जात नाही. तिथं सीआरपीएफचे बंदुकधारी जवान तैनात केलेले होते. मोठ्या अडथळ्यांच्या अलीकडे-पलीकडे एक-एक असे हे जवान उभे होते. कोणालाही छोट्या गल्लीतून बाहेर येऊ न देणं हे त्यांचं काम होतं. सगळ्या दुचाकी-चारचाकी गाड्या आसपासच्या गल्ल्यांमध्ये अडून राहिल्या होत्या. एखादा माणूस पायी पुढं जात होता. त्यालाही हे जवान थांबवत होते. नम्रपणे समजावून सांगत होते. एखाद्या न ऐकणार्याला तब्येतीत समजावून सांगत होते. हे सगळं सुरू असताना गल्लीच्या तोंडावर असलेल्या खासदार बंगल्यातून एक कर्मचारी बाहेर आला आणि त्याने समोरच्या बगिच्यात खाद्यान्नाचा मोठा डबा उलटा केला. जवानाने त्याला हटकलं, पण या कर्मचार्यानं जवानाला भीकच घातली नाही.
जवानाने दोन-चार शब्द सुनावले पण, त्याचा काही परिणाम झालेला दिसला नाही. पण खरी गंमत तर पुढेच सुरू झाली. अख्खी ल्युटन्स दिल्ली माकडांची आहे. इथं माकडं मालक आहेत, त्यांना कोणी धक्का लावू शकत नाही. समोरच्या बागेत खायला मिळणार या आशेनं ती पटापट उड्या मारून आली. त्यांनी बागेत गलका केला. आत्तापर्यंत माणसांना आवरायचं कसं हा प्रश्न होता, आता माकडांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. अचानक आलेल्या संकटामुळं दोन जवान प्रचंड तणावाखाली आले. हुश्श… हुश्श करून त्यांनी माकडांना घालवण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक माकड आगाऊ निघालं. त्यानं अचानक बागेतून बाहेर उडी मारली.
मोकळा रस्ता बघून त्यानं तिकडे धाव घेतली. हे पाहून एक जवान त्याच्या मागं धावला. जवानाचा आक्रमकपणा बघून माकडानं माघार घेतली आणि ते पुन्हा बागेत आलं. या प्रकारामुळं दोन्ही जवानांनी माणसांकडे बघणं सोडूनच दिलं. आता त्यांना चिंता माकडं काय करतील याचीच वाटू लागली. त्यांनी माकडांवरच लक्ष केंद्रित केलं. दहा-पंधरा मिनिटं मोकळ्या रस्त्यांवरून परदेशी पाहुण्यांच्या कारचा ताफा जात होता आणि जवानांना ही माकडं त्यांच्या वाटेत येऊ नये याची काळजी पडली होती. अखेर पाहुणे गेले, रस्ते रहदारीने भरले, मग माकडंही निघून गेली… ही माकडं सगळीकडे आहेत. संसदेत कडेकोट बंदोबस्त असतो, पण तिथंही माकडं भिंतींवर बिनधास्त येऊन बसतात. संसदेत माकडं आली… हा संसदेच्या परिसरातील नेहमीचा विनोद आहे.
मार्क टलींची आठवण
अनपेक्षित ठिकाणी मार्क टलींची आठवण काढली गेली. पत्रकारितेच्या क्षेत्रात मार्क टलींचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी ‘बीबीसी’साठी ३० वर्षांहून अधिक काळ काम केलं. त्यातील २० वर्षं ते ब्युरो चीफ होते. बीबीसीचा राजीनामा दिल्यानंतरही ते दिल्लीतच राहिले. त्यांनी भारताला आपलं घर मानलं. त्यांच्या जीवनाची अखेर गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीत झाली. भारताबद्दल मार्क टलींचं एक विधान प्रसिद्ध आहे. ते म्हणत की, मी एक आशावादी माणूस आहे, कारण मी भारतीय लोकांना दररोज अशक्यप्राय गोष्टी करताना पाहिलं आहे… त्यांचं हे वाक्य उद्धृत केलं ते पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी. आर्थिक पाहणी अहवालावरील (२०२५-२६) सादरीकरणाचा शेवट नागेश्वरन यांनी मार्क टलींच्या या विधानाने केला. ही एकप्रकारे टलींना आदरांजली होती, शिवाय, त्यातून पुढील २५ वर्षांत भारत विकसित देश बनू शकतो हा आशावादही होता. दररोज प्रत्येक भारतीय अशक्यप्राय गोष्ट करत असेल तर विकसित भारत घडवण्याची अशक्यप्राय मानली गेलेली गोष्टही साकार करू शकतो, असा संदेश नागेश्वरन यांनी दिला. त्यांचा हा आशावाद ठीकच मानला पाहिजे. पण, त्यात अनेक किंतू-परंतु आहेत. त्याचा ऊहापोह त्यांच्या सादरीकरणानंतर झालाच. तुम्ही सगळा आशावाद दाखवलात खरा पण, प्रदूषणावर तुम्ही काहीच बोलला नाहीत, या टिप्पणीवर नागेश्वरन चीत झाल्याचे दिसले. त्यांच्या सहकार्याने त्यावर काम चालू आहे, असं सांगून वेळ मारून नेली. आर्थिक पाहणी अहवालात प्रदूषणावर टिप्पणी केलेली आहे, असं नागेश्वरन यांनी सांगून विषय संपवला!
धनखड दिसले!
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अधूनमधून दिसू लागले आहेत. मध्ये ते एकदमच गायब झाले होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये धनखडांनी हजेरी लावली होती. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांच्या शेजारी ते स्थानापन्न झाले होते. काही दिवसांपूर्वी ते ‘एम्स’ रुग्णालयात दाखल झाले होते. पण त्यांच्या कर्तव्य पथावरील उपस्थितीने प्रकृती ठीक असावी असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या अंत्यविधीनंतर दुसर्या दिवशी शुक्रवारी धनखडांनी बारामतीला जाऊन पवारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यानंतर धनखडांचा सार्वजनिक वावर अगदीच कमी झालेला आहे. भोपाळमध्ये संघाच्या एका कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले होते, तिथं त्यांनी भाषण केलं होतं. ते त्यांचं एकमेव जाहीर भाषण. त्यांनी अजून राजीनामा प्रकरणावर मौन सोडलेलं नाही. खरंतर त्यांना ल्युटन्स दिल्लीमध्ये निवासस्थान दिलं जाणार होतं, पण तेही अजून मिळालेलं नाही. त्यामुळं ल्युटन्स दिल्लीपासून कोसो लांब दक्षिण दिल्लीच्या टोकावर असलेल्या फार्म हाऊसवर ते वास्तव्य करून आहेत.

