डॉ. विवेक बी. कोरडे
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ११ दिवसांच्या संघर्षानंतर स्थगिती मिळाली असली तरी त्यामागील प्रश्न संपलेले नाहीत. हे आंदोलन केवळ काही मागण्यांसाठीचा संघर्ष उरलेला नाही; तर तो एका पिढीच्या अपेक्षांचा, अस्वस्थतेचा आणि भविष्याबद्दलच्या चिंतेचा आरसा ठरला आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुण्यात झालेल्या आंदोलनाकडे बातमी म्हणून पाहिले, तर आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, पारदर्शक चौकशी आणि भरती प्रक्रियेतील शिस्त अशा मागण्या दिसतात. पण या मागण्यांमागे आहे, घरापासून शेकडो किलोमीटर दूर येऊन मर्यादित साधनांत भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाईचा संघर्ष. या विद्यार्थ्यांच्या हातातील पुस्तक हे केवळ परीक्षेच्या तयारीचे साधन नाही; त्यामागे वडिलांनी घेतलेले कर्ज, आईने केलेली काटकसर आणि मुलगा किंवा मुलगी अधिकारी झाल्यावर घरची परिस्थिती बदलेल, ही आशा आहे. त्यामुळे परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होतात, तेव्हा ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांना स्पर्श करतात.
या तरुणांकडे कदाचित राजकीय ओळख किंवा आर्थिक पाठबळ नसेल; पण मेहनत आणि परीक्षेवरील विश्वास हेच त्यांचे भांडवल असते. हा विश्वास डळमळीत झाला, तर कष्टांच्या बळावर आयुष्य बदलण्याच्या स्वप्नालाही तडा जातो. आंदोलन स्थगित झाल्यानंतरही या तरुणांच्या आयुष्यातील आर्थिक मर्यादा, स्पर्धेचा ताण आणि भविष्याची अनिश्चितता एका रात्रीत संपणार नाही.
आश्वासनांपासून निर्णयापर्यंत
२ ऑक्टोबरला सुरू झालेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने पुढील अकरा दिवसांत राज्याचे लक्ष वेधून घेतले. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, परीक्षा व भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, कथित पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी आणि रिक्त पदांची भरती या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या. आंदोलनादरम्यान सरकारकडून चर्चा आणि चौकशीची आश्वासने देण्यात आली; मात्र विद्यार्थ्यांना केवळ आश्वासनांवर समाधान मानायचे नव्हते. त्यांच्या मते, चौकशीची घोषणा होणे आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर येणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अखेर ११ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत तुकाराम मुंढे यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश करण्यात आला. चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
ही घडामोड विद्यार्थ्यांच्या संघर्षातील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, आंदोलन स्थगित झालं म्हणजे प्रत्येक मागणीची अंमलबजावणी पूर्ण झाली, असा अर्थ काढता येणार नाही. चौकशीचा निष्कर्ष काय निघतो, कथित गैरप्रकारांबाबत कोणती कारवाई होते आणि परीक्षा व भरती प्रक्रियेत कोणत्या सुधारणा केल्या जातात, हे पुढील काळात स्पष्ट होईल. या आंदोलनातून आणखी एक गोष्ट पुढे आली. विद्यार्थ्यांना केवळ कोणीतरी त्यांच्याशी चर्चा करावी, एवढीच अपेक्षा नव्हती; तर त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली जावी, ही त्यांची मागणी होती. वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा आणि भरती प्रक्रियेबाबत अनिश्चितता निर्माण झाली, तर विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता वाढते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षं, कुटुंबाने केलेला त्याग आणि भविष्यासाठी पाहिलेली स्वप्नं पणाला लागलेली असतात. त्यामुळे या आंदोलनाकडे केवळ मागण्यांची यादी किंवा रस्त्यावरील गर्दी म्हणून पाहून चालणार नाही.
संतापापलीकडची चार कारणं
विद्यार्थ्यांच्या मनातली खदखद केवळ संतापातून निर्माण झालेली नाही. तिच्यामागे फसवणूक झाल्याची भावना, भविष्याबद्दलची अनिश्चितता, कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे आणि आपले म्हणणे ऐकले जात नसल्याची वेदना आहे. रात्रंदिवस अभ्यास करणार्या विद्याथ्र्याला परीक्षेतील गैरप्रकाराचा संशयही अस्वस्थ करतो. परीक्षा पुढे ढकलली जाते, निकाल रखडतात आणि पदभरतीला विलंब होतो, तेव्हा वय वाढत असताना संधी हातातून निसटण्याची भीती त्याला सतावत राहते. यश मिळाले नाही, तर गावाकडे आई-वडिलांना काय सांगायचे, त्यांच्या अपेक्षांना कसे सामोरे जायचे, हा प्रश्नही मनात घर करतो. निवेदने, पत्रे आणि चर्चांनंतरही ठोस निर्णय दिसत नसेल, तर आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते. या भावनेला केवळ आंदोलनखोर वृत्ती म्हणून नाकारता येणार नाही. त्यामागे वर्षानुवर्षं केलेल्या मेहनतीचे मोल मिळावे, ही अपेक्षा आहे. आता आंदोलन स्थगित झाल्यानंतर या चारही प्रश्नांकडे पुन्हा गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे उत्तर मिळाले पाहिजे, परीक्षेच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता आली पाहिजे आणि भरतीच्या संधींबद्दल अनिश्चितता कमी झाली पाहिजे. अन्यथा, आजचा संघर्ष थांबला तरी उद्या पुन्हा अशीच अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आंदोलन, प्रशासन आणि नागरिकांची कोंडी
आंदोलन जसजसे पुढे गेले, तसतसे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या नोटिसा आणि कारवाईचाही सामना करावा लागला. आंदोलनासाठी परवानगी नसल्याच्या कारणावरून काही आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होते, नागरिकांची गैरसोय होते, हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. सार्वजनिक जागेचा वापर आणि नागरिकांची सुरक्षितता यांचाही विचार व्हायला हवा. मात्र, वाहतुकीचा प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रस्ता मोकळा करणे ही प्रशासनाची तातडीची गरज असू शकते; पण विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणे ही त्याहून महत्त्वाची जबाबदारी आहे. भरती परीक्षांची निष्पक्षता, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय्य संधी मिळणे हे सार्वजनिक विश्वासाशी जोडलेले प्रश्न आहेत. कथित गैरप्रकारांबाबत संशय निर्माण झाल्यास त्याची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणणे आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. आंदोलनामुळे निर्माण होणारी गैरसोय आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य या दोन्ही बाबी परस्परविरोधी मानण्याची गरज नाही. संवाद, पारदर्शक निर्णय आणि वेळेत होणारी कृती यांच्या माध्यमातून या दोन्ही प्रश्नांवर मार्ग काढता येऊ शकतो. आंदोलनस्थळ रिकामे करणे ही केवळ तातडीची प्रशासकीय कृती ठरू शकते; पण विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये, अशी विश्वासार्ह परिस्थिती निर्माण करणे हेच प्रशासनासमोरचे खरे आव्हान आहे.
आत्मसन्मानाचा प्रश्न
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे नेते भेट देत असल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर होत असल्याची टीका केली जात होती. मात्र, नेत्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा त्यांची वेदना आपोआप निरर्थक ठरत नाही. आंदोलनाला राजकीय रंग मिळतो आहे का, यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये तथ्य काय आहे आणि त्यावर सरकारने काय पावले उचलली, हे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहिले, तर मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतील. विद्यार्थ्यांनी कोणत्या राजकीय नेत्याला पाठिंबा दिला किंवा कोणत्या नेत्याने आंदोलनस्थळी भेट दिली, यापेक्षा चौकशी किती निष्पक्ष होते, तक्रारींचे निराकरण कसे होते आणि परीक्षा प्रक्रियेत सुधारणा कशा केल्या जातात, याला अधिक महत्त्व आहे. आत्मसन्मानाचा प्रश्न इथेच निर्माण होतो. स्वत:च्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या बळावर यश मिळवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना व्यवस्थेकडून न्याय्य वागणूक मिळावी, ही अपेक्षा रास्त आहे. त्यांना प्रत्येक वेळी आपले म्हणणे ऐकवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असेल, तर परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जात राहील. त्यामुळे या आंदोलनाकडे राजकीय संघर्ष म्हणून नव्हे, तर तरुणाईच्या विश्वासाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
आता विश्वासाची परीक्षा
आंदोलनाला आता स्थगिती मिळाली आहे. चौकशी समिती स्थापन झाली आहे आणि आयोगाचे अध्यक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर राहणार आहेत. हे निर्णय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहेत. मात्र, आंदोलन स्थगित होणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली घटना घडली आहे; दुसरी प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आता सरकार आणि संबंधित यंत्रणांवर आहे. चौकशी समितीने कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांची निष्पक्ष तपासणी करावी, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वस्तुस्थिती समोर आणावी आणि आवश्यक सुधारणांची शिफारस करावी. चौकशीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आणि तिचे निष्कर्ष पारदर्शकपणे जनतेसमोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ समिती स्थापन केल्याने प्रश्न सुटत नाहीत; तिच्या कामातून विश्वासार्ह उत्तरे मिळाली पाहिजेत. यासोबतच परीक्षा आणि भरती प्रक्रियेचे निश्चित वेळापत्रक, निकालांची वेळेत घोषणा, रिक्त पदांची पारदर्शक भरती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांचीही पुढील कार्यवाहीत स्पष्टता असायला हवी. या बाबींवर ठोस प्रगती झाली, तरच आंदोलनातून निर्माण झालेला दबाव सकारात्मक बदलात रूपांतरित होईल.
आंदोलन थांबले आहे; पण या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी संपलेली नाही. हे उत्तर आश्वासनांतून नव्हे, तर निष्पक्ष चौकशी, पारदर्शक निर्णय आणि वेळेत होणार्या कृतीतून मिळाले, तरच विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास पुन्हा निर्माण होईल. पुलाखाली पेटलेली ही अस्वस्थता भविष्यातील सुधारणांची सुरुवात ठरली, तरच या अकरा दिवसांच्या संघर्षाला खरा अर्थ प्राप्त होईल.
शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक
vivekkorde0605@gmail.com
