पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याने निर्माण केलेली आर्थिक अनिश्चितता यातून शेअर बाजार आपटणे गेल्या काही महिन्यांत नवीन राहिलेले नाही. परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या बाजाराला सोडून पळ काढणेही सध्या तसे नेहमीचेच. तरी, या पळापळीची तीव्रता मागील काही दिवसांत वाढण्याचे कारण अधिक गंभीर आणि चिरंतन आहे. मॉर्गन स्टॅन्ली कॅपिटल इंडेक्स अर्थात एमएससीआय हा एक या जागतिक स्तरावर जोखला जाणारा महत्त्वाचा निर्देशांक. याच ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स (ईएम) इंडेक्स’ निर्देशांकातील पहिल्या १० कंपन्यांमध्ये सध्या एकाही भारतीय कंपनीचा समावेश नाही. हे असे २००० सालानंतर पहिल्यांदाच घडले आहे. पहिल्या दहांमध्ये यापूर्वी स्थान असलेल्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्या आता अनुक्रमे ११ व्या आणि १२ व्या स्थानावर घसरल्याने, निर्देशांकांतील त्यांचे वजन आता टक्काभरही राहिलेले नाही.
हा टक्का घसरण्याचे आपण इतके मनाला लावून का घ्यावे? कारण जगभरातील तब्बल ७०,००० कोटी अमेरिकी डॉलरची मत्ता या निर्देशांकाकडून आकर्षिक केली जाते. या गुंतवणुकीतील आपला वाटा आता निर्देशांकातील वजनाप्रमाणेच घटणार. किंबहुना २०२६ सालात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे पावणेतीन लाख कोटी रुपये काढून माघारी नेलेच आहेत. आता हा वेग आणखी दुणावेल याचा हा ठोस संकेत आहे. मोदी सरकार आणि त्यांचे अर्थमंत्रालय परकीय गुंतवणुकीचा दुष्काळ संपवण्यासाठी युद्धपातळीवर धडपड करताना असताना हे घडले. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात यावे.
एमएससीआय इमर्जिंग मार्केट निर्देशांकाच्या पहिल्या दहामध्ये तैवान, दक्षिण कोरियातील कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि सेमीकंडक्टर चिप निर्मितीतील कंपन्या तसेच चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचा वरचष्मा आहे. एआय लाटेत या कंपन्यांचे समभागांचे मूल्य वेगाने फुगत गेले, त्या स्पर्धेत भारतीय कंपन्या मागे पडल्या आणि जागतिक क्रमवारीतही घसरल्या. अव्वल दहांतून गच्छंतीची ही कारणमीमांसाच समस्येचे मूळ उकरून काढणारी आहे. एआयच्या स्पर्धेत आपण कैक योजने मागे पडलो आहोत. हे एकदा मान्य करायचेच नाही ठरविले तर सबबींना तोटाही नाही. आपण एआय युगासाठी आवश्यक भौतिक पायाभूत सुविधा जशी विदा केंद्रे, प्रचंड वीज, प्रशीतन प्रणाली अर्थात पाणी वगैरे अफाट क्षमतेने पुरवत आहोत. हे म्हणजे सोन्याची खाण आपल्याकडे नाही, पण त्या खाणकामासाठी कुदळ आणि फावडे विकण्याचा आपला व्यवसाय मात्र जोमात आहे असे म्हणण्यासारखे आहे. मुळात येथेही आपण नैसर्गिक संसाधने बेछूट खर्ची घालून केवळ ‘कच्चा माल’ पुरविणारेच आणि तयार मालाचे म्हणजेच एआयआधारित तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे गिर्हाईक याच श्रेणीवर आहोत. जगातील सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था, पण बाजारपेठ उभरतीच. आता त्या उभरत्या बाजारपेठेची रयाही लयाला चालली आहे. अर्थात एआयबाबत अतिउत्साह हादेखील खरा नाही हे ‘सर्किट ब्रेकर’ लागेपर्यंत दक्षिण कोरियाच्या बाजारात झालेल्या ताज्या पडझडीनेही पुरते स्पष्ट केले आहे.
भारताच्या गुंतवणूकदार रयतेने मात्र ताज्या घडामोडींतून बोध नक्कीच घ्यावा. ‘सध्या बाजारावर या रयतेचीच हुकूमत आहे,’ असे बाजार मध्यस्थ, नियामक आणि सरकार गौरवाने म्हणत आहेत. ही आत्मनिर्भर आर्थिक ताकदच भारतीय बाजाराचे आधुनिक वैभव वगैरे भूषण मिरवत असताना, वरीलप्रमाणे अकल्पित काही घडते आणि रंगाचा बेरंग होतो. विशेषत: अनेक नव-गुंतवणूकदार असे आहेत, ज्यांनी डॉटकॉम बबल, २००८ चे जागतिक वित्तीय संकट अथवा करोना महासाथीतील मंदी पाहिलेली नाही. अशांसाठी तेजीच्या बाजारातील उन्मादाची सामुदायिक भुरळ पुढे जाऊन पश्चात्तापात बदलणे संभवू शकते. सलग एक-दोन वर्षे बाजारात मंदी राहिल्यास, मोठ्या निष्ठेने दरमहा हजारो कोटींची ‘एसआयपी’ करणार्या पगारदार नवतरुण, गृहिणी, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे काय होईल, याचा अंदाजही करता येत नाही. अलीकडे सामान्य कुटुंबाच्या बचतीचा कणा हा शेअर बाजारच आहे, असे खुद्द सेबी प्रमुख तुहिन कांता पांडे सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले. चांगल्या भविष्याच्या आशेने झालेली रयतेची कष्टार्जित बचत आहे, ते जोखीम भांडवल नव्हे. हा अतीव महत्त्वाचा फरक आहे. काटेकोरपणे तो जपला जाणे हा बाजारावरील विश्वास जपण्याचा सर्वात मोठा आधार ठरेल, हे नियामकांनीदेखील ध्यानात घ्यावे.
