मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उड्डाण करणार्या विमानांची संख्या कमी करण्याच्या योजनेला सध्या तरी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. येत्या २६ ऑक्टोबरपासून ही संख्या कमी करण्याचे नियोजित होते. यापायी मुंबईतून होणार्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या ३३ टक्क्यांनी कमी होणार होती. विमान कंपन्यांनी याला केलेल्या विरोधाची केंद्राने दखल घेतली, हे बरे केले.
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेड ही कंपनी करते. या विमानतळावरील ‘टर्मिनल १’वर सध्या टप्प्याटप्प्याने पुनर्विकासाचे काम सुरू करायचे आहे. त्यात ‘टर्मिनल १ बी’ या विभागातील उत्तरेकडील काही बांधकाम पाडून तो भाग पुनर्विकसित करायचा आहे. या भागात उभ्या राहणार्या विमानांतून ००० वर्षाला ५० लाख प्रवासी देशांतर्गत प्रवास करतात. ही संख्या ‘टर्मिनल १’वरील एकूण प्रवासी संख्येच्या एक तृतीयांश इतकी आहे. आता हाच भाग कामासाठी बंद होणार म्हटल्यावर येथून प्रवास करणार्या प्रवाशांची आणि त्यांना नेणार्या विमानांची दुसरीकडे सोय करणे आले. ती करण्यासाठी ‘टर्मिनल २’वरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करायची, असे हे नियोजन.
आता हे कसे साधावे? तर, त्यासाठी कंपनीने योजना केली, की ‘टर्मिनल २’वरून आठवड्याला होणार्या ७७० आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी २६५ येत्या २६ ऑक्टोबरपासून रद्द करून टाकायची. कशी? तर, विमान कंपन्यांनी स्वेच्छेनेच कोणती उड्डाणे रद्द करायची, ते ठरवावे, अशी कंपनीची सूचना. पण, त्यांनी तसे ६ ऑक्टोबरपर्यंत न केल्यास कंपनीच ते उपलब्ध वेळांप्रमाणे करून टाकेल, असा त्यात इशाराही. जी २६५ उड्डाणे रद्द होणे प्रस्तावित होते, त्यात सर्वाधिक फटका बसणार होता, तो इंडिगो (७४), एअर इंडिया (३३), अकासा एअर (११) आणि एमिरेट्स व ऐतिहाद एअरवेज (प्रत्येकी १०) आदींना. विमान कंपन्यांनी साहजिकच याला विरोध केला.
विरोधाचे दोन प्रमुख मुद्दे. एक म्हणजे विमान संचालनात हे सगळे असे इतक्या झटपट करणे व्यावसायिकदृष्ट्या गैरसोयीचे. एवढ्या मोठ्या संख्येने उड्डाणे कमी करणे याचा आर्थिक फटका मोठा बसणार हे साहजिकच. दुसरा मुद्दा तांत्रिक आणि उड्डाणांच्या स्थलांतराशी निगडित. तो म्हणजे मुंबईतील बरीचशी उड्डाणे नवी मुंबईच्या नव्या विमानतळावर हलविणे. ‘टर्मिनल १’वरील देशांतर्गत उड्डाणे ‘टर्मिनल २’वरून करायची आणि त्या बदल्यात ‘टर्मिनल २’वरून सध्या होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईला न्यायची, अशी खरी विस्तृत योजना.
विमान कंपन्या या बदलाला सहजासहजी राजी नाहीत. कारण, तसे करण्यापूर्वी नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांकरिता आवश्यक मालवाहतूक सुविधा, विमानांचे तंदुरुस्ती परीक्षण, विमान कर्मचार्यांची निवास व्यवस्था, विमानतळापर्यंतची रस्ते वा अन्य मार्गांनी जोडणी, सुरक्षा तपासणी, सामान हाताळणी आणि अन्य अनेक प्रवासी सुविधा पुरविण्याबाबतच्या क्षमतांची नीट चाचपणी करावी लागेल.
दुसरा मुद्दा आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मुंबई विमानतळ जितके सोयीचे आहे, तितके नवी मुंबई विमानतळ प्रवाशांना सोयीचे पडेल का, हा. हे दोन्ही मुद्दे थेट विमान कंपन्यांच्या व्यवसायाशी, पर्यायाने आर्थिक बाबींशी निगडित असल्याने विमान कंपन्यांचा घाईने स्थलांतर करण्याला विरोध साहजिकच. किंबहुना इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) सक्तीने स्थलांतर न होता, चर्चेतून राजीखुशीने व्हावे, अशीच भूमिका मांडली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रश्नात लक्ष घालणे स्वागतार्ह ठरते. त्यामुळे अदानी एअरपोर्ट्सला आता नवी सुधारित योजना राबविण्यापूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस), नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि राज्य सरकारशी संबंधित परवानग्या घ्याव्या लागतील.
मंत्रालयाने लक्ष घातल्याने या प्रश्नावर तोडगा काढून नवी सुधारित योजना तयार करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. या अवधीत अदानी एअरपोर्ट्स कंपनी, विमान कंपन्या आणि अन्य भागधारकांनी एकत्र चर्चा करून ‘सर्वांना संमत होईल’ अशी स्थलांतर योजना तयार करावी, असे मंत्रालयाने म्हटले. ‘टर्मिनल १’च्या पुनर्विकासाच्या योजनेबाबत अदानी एअरपोर्ट्सने योजना सादर करावी, असेही मंत्रालयाने नमूद केले. बाकी काही असो, यानिमित्ताने एक केंद्रीय मंत्रालय तरी चर्चेने मार्ग काढावे, असे किमान म्हणते आहे, हेही नसे थोडके.
