यंदाच्या संपूर्ण उत्सवादरम्यान गाजलेल्या ध्वनिप्रदूषण या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुका निघण्यापूर्वी दोन दिवस काही आदेश दिले. उत्सवापूर्वी नागरिकांनी  ध्वनिमर्यादाभंगाच्या विरोधात स्वयंस्फूर्तीने काढलेले मोर्चे, केलेली आंदोलने, यंत्रणांना कारवाईसाठी वारंवार दिलेली निवेदने आणि उत्सव संपता संपता आलेले उच्च न्यायालयाचे हे आदेश. ध्वनिप्रदूषण हा मुद्दा सार्वजनिक आयुष्यात किती उपद्रवी ठरतो आहे, याचे हे लक्षण. तो तडीस जावा, अशीच सार्वत्रिक अपेक्षा आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशांची चर्चा गरजेची.

आधी न्यायालयाच्या आदेशाबद्दल. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ‘स्वयंस्फूर्त’ याचिकेवरील सुनावणीदरम्यान फटाक्यांवर, डीजे यंत्रणेच्या ‘आव्वाजा’वर, लेझर झोतांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई म्हणून काय करायचे, तेही न्यायालयाने सांगितले. ‘ध्वनिमर्यादा ओलांडणार्‍यांची उपकरणे, वाद्ये जप्त करा’, असेच हे आदेश म्हणतात. जबाबदारी निश्चतीसाठी मिरवणूक आयोजन करणार्‍यांची नावे, पत्ते आणि मोबाइल क्रमांक मिरवणुकीत दर्शनी भागात लावणे, पोलिसांनी डेसिबल पातळी तपासणे, ध्वनियंत्रणेत ध्वनिमर्यादा यंत्र बसविणे, ध्वनियंत्रणेला परवानगी देताना परिणामांचा अभ्यास करून परवानगी देणे, अशा बाबी अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

या सगळ्याबरोबरच एक महत्त्वाची टिप्पणी न्यायालयाने केली, ती म्हणजे, ‘ध्वनी आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे केले जाऊ शकतात. मिरवणुका आणि उत्सव अधिक सन्मानजनक व सभ्य पद्धतीने आयोजित करणे ही काळाची गरज आहे.’ कर्कशता टाळून उत्सव साजरे करा, हा याचा मथितार्थ. वास्तविक ध्वनिमर्यादाभंगाबाबत आधीपासूनच नियम असल्याची कल्पना आता सरकार-सरकारी यंत्रणांबरोबर सामान्यजनांनाही आहे. असलेल्या नियमांचे पालन करण्यात सरकार आणि त्यांच्या यंत्रणा कमी पडताहेत, हे या वेळी न्यायालयाने अधिक जोरकसपणे अधोरेखित केले, ज्याच्या परिणामांची परीक्षा आजच्या अनंत चतुर्दशीस होईलच.

या परीक्षेत यंत्रणा लगेच उत्तीर्ण होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण या निमित्ताने किमान पुढील उत्सवांपूर्वी यंत्रणा अधिक उत्तम तयारी करतील, इतकी अपेक्षा ठेवण्याइतकी तरी कामगिरी यंत्रणांनी करावी, अशी आशा. ध्वनिप्रदूषणाने ग्रासलेल्या सामान्यजनांना अशाच आशेवर राहावे लागते. ते का, याचे उत्तर न्यायालयानेच आपल्या टिप्पणीतून दिले आहे, हे या वेळच्या आदेशातील वेगळेपण.

‘ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणा गांभीर्य दाखवत नाहीत, नागरिकांना उत्सवकाळात ध्वनी आणि हवा प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. सरकार मात्र, ‘सर्व काही ठीक चालले आहे,’ असा आभास निर्माण करते.’ – या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. याचा अर्थ असा की, नियमांची माहिती असूनही यंत्रणा नि्क्रिरय राहते आणि ती तशी राहिली, तरी सरकार सांगते, ‘ठीक चालले आहे.’ आता यात यंत्रणा आपण होऊन नि्क्रिरय राहते, की तसा त्यावर दबाव आणला जातो, याचे वेगळे उत्तर देण्याची गरजही नाही. परिणामी, उपद्रव चालूच राहतो. म्हणूनच प्रश्न पडतो तो असा, की उत्सवी गोंगाट चालणारच, तो नागरिकांनीही चालवून घ्यावा, त्याची एकदा सवय झाली, की ते अंगवळणी पडेल, असे सरकारला, ‘ठीक चालले आहे,’ या उत्तरातून सुचवायचे असते का?

या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असावे, इतका बेदरकारपणा उत्सवकाळात सर्वत्र दिसतो. राज्यभरात पुण्याच्या विद्यानंद बापट यांच्या निमित्ताने ध्वनिमर्यादाभंग हा विषय ऐरणीवर आला. त्याला पाठिंबाही मिळाला. लोकभावना ध्वनिवर्धकांविरोधात आहे, हेही स्पष्ट झाले. पण, प्रत्यक्षात गोंगाट कमी होताना दिसत नाही. ‘उत्सव आहे, आनंदासाठी झाला जरा आवाज, तर काय एवढे’ अशी उत्तरे त्यावर तयार असतात. कमी ‘आव्वाजा’तही आनंद साजरा करता येतो, याचे भान संपले आहे, याचा हा परिणाम. त्यांना भानावर आणण्यासाठी असलेली यंत्रणा निष्क्रिय राहत असल्याने ‘हे तर चालतेच की’ असा दृढ होणारा समज ही त्याची पुढची पायरी. न्यायालयाने यावरही बोट ठेवले आहे.

अर्थात, प्रत्येक वेळी सगळाच दोष यंत्रणेचा असतो असेही नाही. कारण, कर्कशता हा आता आयुष्याचा भाग बनला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क सरकारी रुग्णालयाच्या आवारात, म्हणजे जे शांतता क्षेत्र असणे अपेक्षित आहे, तेथेच ढोल वाजवून मिरवणूक काढली गेली, हे त्याचे उदाहरण. अशा या वातावरणात आज – अनंत चतुर्दशीला – विसर्जन मिरवणुका निघतील, तेव्हा न्यायालयाने केलेल्या कानउघाडणीतील सर्व वाक्ये सरकार आणि सरकारी यंत्रणांच्या कानात घुमतील, अशी अपेक्षा तेवढी करायची.