सिद्धार्थ म्हात्रे
मुंबईतील घर या ‘प्रश्ना’भोवतीच्या अनेक मुद्द्यांचं त्यातल्या विसंगतींसह परखड विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाविषयी…

आधुनिक मुंबईची पायाभरणी ब्रिटिश राजवटीत सुरू झाली. सुरुवात मुंबई किल्ल्याची (फोर्टची) भिंत पाडण्यापासून झाली. गिरण्यांची सुरुवात साधारणपणे याच काळातली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबई चहुबाजूंनी पसरू लागली. लोकसंख्या वाढू लागली आणि वाढत्या मुंबईतली घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे शहर अक्षरश: समुद्रात भराव टाकून उभारलं जाऊ लागलं. आज महानगर हा शब्दही अपुरा पडावा इतकं अजस्रापणे पसरलेलं शहर अजूनही वाढत आहे. आज या शहरात पुनर्विकास, समूह विकास, झोपडपट्टी पुनर्वसन यांसारखे शब्द परवलीचे झाले आहेत. मात्र, या शहरात अशा स्वरूपाचे शब्द ऐकू येण्याची सुरुवात झाली, ती शहर ‘बॉम्बे’ असल्यापासूनच. या शहरातल्या घरांचा इतिहास हा एकाच वेळी रंजक, सत्ताकेंद्री आणि अर्थकेंद्रीही आहे. पत्रकार आणि मुंबईकर असलेले सिद्धार्थ भाटिया यांचं ‘मुंबई अ मिलियन आयलंड्स’ हे नवं कोरं पुस्तक मुंबईच्या गतकाळापासून ते अगदी आतापर्यंतच्या अनेक टप्प्यांचं चित्र रेखाटतं. इथे निवास करणाऱ्यांच्या कथांचा आणि शहराच्या नव्या-जुन्या खुणांचा शब्दप्रवास घडवतं. आधुनिक मुंबईचा विकास ते सध्याची मेट्रो सिटी असा व्यापक पट या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

लेखक पत्रकार असल्याने लेखनशैली नेमकेपणाकडे झुकणारी आणि संदर्भसंपन्न आहे. शहराचा उज्ज्वल इतिहास, वर्तमानातली स्पर्धा आणि या दोन टोकांना जोडणाऱ्या लेखकाच्या आठवणी यामुळे पुस्तक मुंबईच्या वाटचालीचा एकसंध अनुभव देतं. पुस्तक वाचताना मुंबईचं देखणं पण सातत्याने बदलत जाणारं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. ‘कही बिल्डिंग कही ट्रामे कही मोटर कही मिल…’ या गाण्यातल्या मुंबईत जसं एका समृद्ध म्हणाव्या अशा काळाचं चित्रण आहे तसंच हे पुस्तकही शहराच्या स्थित्यंतराचं सुंदर तरीही परखड चित्र आहे. पण या कथा केवळ स्थित्यंतराच्या नसून त्या इथल्या माणसांच्या – इथे रुजलेल्यांच्या आहेत. त्या माणसांच्या जगण्याचे संदर्भ मांडतात. मग धारावीत राहणारी धारदार जिभेची बोंबील आपा असो, घरांसाठी संघर्ष करणारी गौरी सावंत असो वा आयुष्यभर मरिन ड्राइव्हवरच्या घरात राहून आयुष्याची संध्याकाळ खिडकीतून लाटांकडे बघत व्यतीत करणारी सेवंतीभाई पारीख असो.

व्यक्तिचित्रणं घरांच्या संदर्भात असली तरीही ती सुरस आहेत. पुढेपुढे शहरातील कुलाबा, डोंगरी, परळ, दादर असे एकएक भाग तिथल्या माणसांच्या माध्यमातून उलगडत जातात. दारूखाना भागातील शांती रवी हे आपल्या ‘शिप – ब्रेकिंग अँड स्लम्स’ या प्रकरणात भेटतात. त्यांची गोष्ट वाचताना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शकडो एकर जमिनींचा गुंता सुटत जातो. तिथल्या रहिवाशांच्या घरांना कोणतंही अधिकृत संरक्षण नाही. सध्या घरांनी व्यापलेल्या त्या जमिनींची डोळे विस्फारणारी किंमत पाहता या परिसरात दुबईसारखे प्रकल्प उभारण्याची विकासक, राजकारणी यांची स्वप्ने या जमिनींभोवतीच का घुटमळत आहेत, हे स्पष्ट होतं. ‘लक्झुरी’ हा शब्द आता घरविक्रीचा जाहिरातींचा मंत्र झाला आहे, असं लेखक म्हणतात. आजही मुंबई अनेकांना आकर्षित करते. अनेक जण इथे घर घेण्याचं स्वप्न पाहतात. त्यानुसार होणारा शहराचा विकास, झोपडपट्ट्यांतल्या समस्या अनेक प्रकल्पांसाठी या वस्त्यांचं केलं जाणारं स्थलांतर अशा घर या प्रश्नाभोवतीच्या अनेक मुद्द्यांचा त्यातल्या विसंगतीसह परखड आढावा लेखकाने घेतला आहे.

‘मिल्स बिकम मॉल्स’ या प्रकरणात लालबाग परळमधील बदलांच्या खुणा आहेत. केवळ चाळींची पुसट होत जाणारी रेषा आणि त्यावर उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारती, मॉल्स असे चित्रण यात नाही तर तिथली भौगोलिक स्थिती, चाळी पाडण्यासाठी हपापलेल्या व्यवसायकेंद्री बांधकाम व्यावसायिकांची उघड स्पर्धा यात आहे. मुंबईतल्या गिरण्यांचं वैभव ओसरल्यानंतर झालेली वाताहत लेखकाने विस्तृतपणे दिली आहे. लेखक या साऱ्यातून केवळ बदल टिपत नाहीत तर यामुळे माणसांच्या मनात निर्माण होणारे द्वंवही टिपत जातात. आपलं मूळ असलेली चाळीतली घरं सोडून दूर कुठेतरी उपनगरात मोठ्या घरात बिऱ्हाड थाटलेल्यांविषयी लेखक लिहितात, ‘काहीतरी गमावल्यावरच हा बदल येतो. प्रवास लांबत जातो आणि सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक लोकल ट्रेनमधील गर्दी वाढत जाते आणि घुसमटही. पण सर्वांत वेदनादायी काय असेल तर जुने स्नेहबंध आणि परिचितांचं वर्तुळ हरवत जाणं…’

मुंबईचा इतिहास, शहराची संस्कृती, इथला संघर्ष, स्थलांतरितांचे लोंढे या साऱ्याविषयी अनेकांनी लेखन केलं आहे. अगदी ब्रिटिश काळापासून या शहरावर लिहिलं जात आहे. भाटिया यांचं हे पुस्तक ही त्यात केवळ आणखी एक भर नाही. ही बदलाच्या वेगाशी जुळवून घेताना थकलेल्या माणसांची गोष्ट आहे. स्थलांतराचा सामाजिक दृष्टिकोनातून मांडलेला दस्तावेज आहे. वर्षानुवर्षं या शहरात राहणाऱ्यांनाही एका वेगळ्या मुंबईची ओळख या पुस्तकातून होईल यात शंका नाही. पत्रकारितेच्या भाषेत सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे शहराचा उभा आडवा बरचंसं संशोधन करून केलेला ‘ग्राऊंड’ रिपोर्ट आहे. स्थित्यंतराच्या रेट्यात हरवलेल्या मुंबईचं देखणं चित्र अनुभवायचं असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.

siddharth. mhatre@expressindia. com