साहित्यासह आजच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणारा आणि कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, चित्रपट, आरोग्य अशा बहुविध विषयांना स्पर्श करणारा ‘गोदरेज लिटरेचर लाइव्ह! द मुंबई लिटफेस्ट २०२६’ २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ (एनसीपीए) येथे रंगणार आहे. महोत्सवाचे हे सतरावे वर्ष आहे. महोत्सवात लेखक, विचारवंत, कलाकार आणि विविध वयोगटांतील तसेच विभिन्न विषयांत स्वारस्य असणारे वाचक एकत्र येतील.

महोत्सवात यंदा अदिती मित्तल, अनुराग मायनस वर्मा, अयाझ मेमन, बोरिया मजुमदार, सिरियाक ॲबी फिलिप्स, फे डिसूझा, गगन गिल, गुलजार, आयर्विन ॲलन सीली, जसप्रीत बिंद्रा, जावेद अख्तर, जेरी पिंटो, जुही बब्बर, कौशिक बसू, माझदा टुरेल, नमन आहुजा, पवन के. वर्मा, रामचंद्र गुहा, रत्ना पाठक शाह, रिया चोप्रा, शांता गोखले, शशी थरूर, शेफाली शाह आणि सोनाली कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होतील आणि आपले विचार मांडतील.

या महोत्सवात ‘लिटररी अवॉर्ड्स’ अंतर्गत जीवनगौरव, कथा, कविता, नॉन-फिक्शन आणि व्यावसायविषयक पुस्तकांसाठी पुरस्कार प्रदान केले जातील. याव्यतिरिक्त विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, पुस्तकांचे प्रकाशन आणि पुस्तकांचे आदानप्रदान असे उपक्रम आयोजित केले जातील. ‘गोदरेज डीईआय लॅब’च्या माध्यमातून सर्वसमावेशकतेवर भर दिला जाईल. ‘एलजीबीटीक्यूआयए प्लस’ समुदाय आणि अल्पसंख्याक गटांतील व्यक्तींची चर्चासत्रे आयोजित केली जातील.

लहान मुलांसाठी, ‘एचटी पारेख फाउंडेशन’च्या सहकार्याने ‘लिटरेचर लाइव्ह! लिट्ल फेस्टिव्हल’ अंतर्गत विशेष सत्रे आयोजित केली जातील. ७-८ वर्षे वयोगटातील मुले वन्यजीव, पत्रलेखन आणि कथाकथन यांवर आधारित उपक्रमांमध्ये सहभागी होतील; यामध्ये नकाशे, कला आणि नृत्य (कथकसह) यांचा समावेश असेल. ९ ते १० वर्षे वयोगटातील मुले संगीत, चित्रपट आणि सादरीकरणाद्वारे सांगितल्या जाणार्‍या कथांचा आनंद घेतील. नकाशा वाचन, ग्राफिक कादंबर्‍या, सागरी जीवन, मानव-प्राणी संघर्ष, मुंबईचा वारसा, सर्वसमावेशकता आणि सहानुभूती यांसारख्या विषयांवरील चर्चांत मुले भाग घेतील.