प्रवासाची सार्वजनिक सुविधा अपुरी पडू लागल्याने खासगी सेवा हा पर्याय निर्माण झाला, टिकला आणि हळूहळू स्थिरावलाही. वेगवेगळ्या खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्याने तिकीट दरांत आणि अन्य काही सुविधांत स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकाला आणखी पर्याय उपलब्ध झाले. ॲपआधारित आरक्षणाने तर आणखी सोय झाली. अल्पावधीतच ही समांतर व्यवस्था प्रत्यक्ष व्यवस्थेचा भाग झाली. मात्र, राज्यातील अनेक शहरांत या खासगी बस ऐन वाहतुकीच्या काळात प्रमुख रस्त्यांवर प्रवाशांसाठी ठाण मांडून बसायला लागल्याने कोंडीत भर पडत आहे. ती सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेने एक उपाय प्रस्तावित केला आहे, त्याची सध्या चर्चा असून, त्यानिमित्ताने राज्यभरातच यावर तोडगा निघाला तर हवा आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांतून आणि इतर राज्यांतून दररोज मुंबईत येणार्या हजारो खासगी प्रवासी बस वाहतूक कोंडीत भर घालत असल्याने त्या आता मुंबईच्या वेशीवर – जकात नाक्यांवर थांबविल्या जाणार आहेत. या गाड्यांतून येणार्या प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी मेट्रो, बस आणि कॅबची सुविधा जोडून दिली जाणार आहे. जेथे या खासगी प्रवासी गाड्या थांबतील, तेथे हॉटेल, वाहनतळ, खाण्याची व्यवस्था करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन असल्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. जकात नाके नऊ वर्षांपूर्वी बंद झालेले असल्याने तेथील जागा या सुविधा उभ्या करण्यासाठी वापरता येईल, अशी ही योजना. थोडक्यात, या खासगी बस आता शहरात न येता वेशीवरच प्रवाशांना सोडतील आणि तेथूनच नवे प्रवासी घेऊन ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथे प्रस्थान करतील.

मुंबईकरांना जेरीस आणणार्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठीच्या उपायांपैकी हा एक उपाय असल्याचे सांगण्यात येते. पण, यानिमित्ताने राज्यातील अन्य शहरांतही खासगी प्रवासी सेवांबाबतच्या तक्रारी, त्यांचे नियंत्रण आणि सुसूत्रता आणण्यासाठी धोरण करण्याची गरज आहे, हे सांगायला हवे. पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा काही प्रमुख शहरांबरोबरच इतरही अनेक शहरांत खासगी प्रवासी सेवेचे पेव फुटले आहे. या बसच्या तिकिटांचे दर जास्त असले, तरी स्लीपर कोच, आरामदायी आसने, जलद प्रवासाचे आश्वासन आदी सुविधा ग्राहकाला आकर्षित करणार्या असतात. त्यामुळे तिकडे ओढाही असतो. आणि, अनेकदा आयत्या वेळच्या प्रवासासाठी किंवा कितीही आधी प्रयत्न करूनही एसटी, रेल्वेचे आरक्षण उपलब्ध झाले नाही, तर ती गरजही बनते.

खासगी प्रवासी सेवा ही अशी गरज बनली असेल, तर ती सुविहितपणे चालावी, यासाठी धोरणात्मक पावले उचलणे क्रमप्राप्त. मुंबईसारखाच कोंडी टाळण्यासाठीचा उपाय मध्यंतरी पुण्यातही सुचविला गेला. ठरवून दिलेल्या मार्गांवरच सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळात खासगी प्रवासी बसने शहरात ये-जा करावी आणि शहरातील थांब्यांवर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू नये, अशा सूचना होत्या. मात्र, त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही.

एसटी बसला असते, तसे खासगी प्रवासी बस वा गाड्यांना थांबण्यासाठी निश्चित स्थानक नसल्याने या गाड्या त्या-त्या शहरानुसार प्रवाशांना त्यातल्या त्यात सोयीच्या ठिकाणी आपला डेरा जमवतात. मात्र, बहुतेकदा या ठिकाणी वाहते रस्ते असल्याने त्यांचे तेथे थांबणे अडथळा ठरते. मुंबईतील प्रस्तावित उपायांनुसार सर्वच शहरांत खासगी बसना असे वेशीवरचे थांबे तयार झाले, तर काही प्रमाणात हा प्रश्न सुटू शकतो. या गाड्यांतून येणार्या प्रवाशांना शहरात आणण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा मुद्दाही स्वागतार्ह, पण त्यासाठी ती सोय सक्षम हवी.

खासगी प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यांबाबत इतरही प्रश्न आहेत. तिकीट दरांबाबत मनमानी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहणे, गाड्यांच्या परवान्यांबाबत व त्यांच्या नूतनीकरणाबाबत अनास्था, बेदरकार चालक, बसमधील असुरक्षितता इत्यादी. प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिसांचा वाहतूक विभाग यांचे हात या अनियमिततेवर कारवाई करायला बांधले जाऊ नयेत, हीसुद्धा यानिमित्ताने अपेक्षा. मुंबई जर वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने खासगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी एक पाऊल टाकत असेल, तर आनुषंगिक इतर प्रश्नांवरही तोडगे काढण्यासाठी राज्याचेच एक समान धोरण झाले, तर अधिक उत्तम.