मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला खर्या अर्थाने द्रुत करणार्या ‘मिसिंग लिंक’वरच्या वेगाचा बळी केवळ दुर्दैवी म्हणता येणार नाही. या ‘मिसिंग लिंक’वर- किंवा राज्यातल्या, देशातल्या अन्य महामार्गांवरही- वाहनचालकांनी पाळायचे नियम आणि त्या नियमांची अंमलबजावणी करणारी प्रभावी यंत्रणा हे दोन्ही ‘मिसिंग’ असतील, तर अशा अभावातून होणारे उत्पातही आतापासूनच दिसू लागले आहेत. हा जोडरस्ता सुरू होऊन जेमतेम तीन महिने होत नाहीत, तोवर गेल्या आठवड्यातल्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा होऊन एका तरुणाचा बळी गेला. यानिमित्ताने महामार्ग सुरक्षा, वेग, चालक मानसिकता आणि महामार्गांवर अपेक्षित वाहनचलन शिष्टाचार यांबाबत जे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यावर भाष्य आवश्यक ठरते.
‘मिसिंग लिंक’वरच्या अपघातामध्ये मालवाहू टेम्पोला धडकलेल्या ‘एसयूव्ही’ची गती १५० किलोमीटर प्रति तास इतकी असल्याचे चौकशीत उघड झाले. या जोडरस्त्याच्या बोगद्यांमध्ये ८० किलोमीटर प्रति तास वेग ठेवण्याबाबतचे इलेक्ट्रॉनिक फलक विशिष्ट अंतरांवर आहेत. तरीही वेगाचे उल्लंघन होते आणि तेही जवळपास दुप्पट वेगाने. तसे ते द्रुतगती मार्गाच्या इतर टप्प्यांतही होतच असते. आता राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) म्हणते आहे, की वेगाचे उल्लंघन करणार्यांवर देखरेखीकरिता विशेष कॅमेरे लावू. अशी देखरेख-व्यवस्था ही वास्तविक ‘मिसिंग लिंक’ उभारणीची पूर्वअट असायला हवी होती, असे एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांना का वाटले नसावे? आता या कॅमेर्यांचा उपयोग ते लावल्यानंतर कारवाई किती होते, यावरच अवलंबून राहील.
या अपघाताने आणखी एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे बंदी असूनही मालवाहू टेम्पो ‘मिसिंग लिंक’वर आलाच कसा? मालवाहू व्यावसायिक वाहनांनी जुन्या घाटातून जाणेच अपेक्षित असताना हे घडले. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यापासूनच असे घडते आहे. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत मिसिंग लिंकवरील बंदीचे उल्लंघन करणार्या ६२९ अवजड वाहनांवर कारवाई करून ई-चलानद्वारे ७.३८ लाखांचा दंड वसूल केला गेला. म्हणजे दररोज सरासरी सात अवजड वाहने, हा फक्त कारवाई झालेला आकडा. असे बरेच असू शकतात. त्यासाठी ‘मिसिंग लिंक’च्या बर्याच अलीकडेपासून हा मार्ग अवजड वाहनांसाठी नसल्याचे सांगणारी व्यवस्था असणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित होते आहे.
परवाच्या रविवारी समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेने या चर्चेला आणखी एक आयाम दिला. एका ट्रेलरवर कारवाई झाली, तर चालक ट्रेलरच रस्त्यात आडवा घालून, महामार्गच अडवून पळून गेला. चलानचे पैसे भरल्यावरही गाडीची कागदपत्रे दिली गेली नाहीत आणि अडवून ठेवले गेले, म्हणून हे कृत्य झाल्याचे दावे आता केले जात आहेत. पण मुळात हा ट्रेलर महामार्गावर थांबायची परवानगी नसतानाही थांबला. अशा थांबलेल्या अवजड
वाहनांवर मागून येऊन गाड्या आदळल्याने होणारे अपघातही बरेच आहेत. हाही वाहनचलन शिष्टाचार, संकेतांची पायमल्ली करण्याचाच भाग. त्यामुळे वेगमापक कॅमेरे, वाहन परवाने रद्द करणे, गुन्हे दाखल करणे, आदी उपाययोजनांच्या जंत्रीबरोबर या वर्तनदोषावरही बोट ठेवणे क्रमप्राप्त.
महामार्गावरील मोकळा आणि गुळगुळीत रस्ता म्हणजे ॲक्सिलरेटरवर पाय दाबून कितीही वेग वाढविण्याची मोकळीक नव्हे. प्रशस्त, आलिशान चारचाकी गाड्यांत खिडक्या बंद करून बसल्यावर वेगाचे भान राहत नाही, हा त्यावरचा प्रतिवाद अत्यंत बेमुर्वत. लहान, कमी क्षमतेच्या चारचाकींनाही अनेकदा वेगाचा वारू खुणावतो, तोही गंभीर. चारचाकीत बसल्यावर फक्त चालकाने नव्हे, तर सर्वांनी सीटबेल्ट लावणे वगैरे मूलभूत नियमांची ऐशीतैशी होत राहते. हेही चारचाकी खरेदीची ऐपत आल्यानंतरही ती चालवण्याचे आणि त्यातून प्रवास करण्याचेही शास्त्र असते, या समजेच्या अभावाचे लक्षण. अर्थात, वेगाचे आणि अन्य नियमांचे पालन केल्यानंतरही अनेक महामार्गांवरील रस्त्यांची दयनीय स्थिती आणि त्यामुळे होणारे अपघात याबाबत त्या-त्या यंत्रणांनी उत्तरदायित्व घेणे घडताना दिसत नाही, हेही खरेच. नियमभंगाच्या कारवाईवेळी, सावज सापडल्याचा आनंद होणार्या यंत्रणा रस्त्यांच्या अवस्थेची जबाबदारी घ्यायला पुढे येतील, तो सुदिन. सध्या हेही ‘मिसिंग’ आहे.
