देशाचा विकास साधायचा असेल, तर दळणवळण सुकर करणे अगत्याचे. त्यासाठी रस्ते, जल, हवाई मार्गांचे सर्वंकष जाळे उभे करणे महत्त्वाचे. गेल्या दशकभरात देशभरात या कामांचा धडाका सुरू आहे. नवीन महामार्गांची निर्मिती आणि आहे त्या महामार्गांचे विस्तारीकरण असे साधारण याचे स्वरूप. मोठा विरोध होत असलेला ‘शक्तिपीठ’, तयार होऊनही अद्याप त्या मानाने कमीच वापरात असलेला ‘समृद्धी’ ही नव्या महामार्गांची ठळक उदाहरणे; तर मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा घातलेला घाट हा सद्य:स्थितीतील महामार्गाच्या अनाठायी विस्तारीकरणाचा ताजा नमुना.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘मिसिंग लिंक’ खुली झाल्याच्या आगेमागे मुंबई-पुणेदरम्यान तिसरा महामार्ग बांधणार असल्याचे वृत्त येऊन धडकले होते. अटल सेतू-चौक-पुणे असा हा द्रुतगती मार्ग मुंबई-पुणे अंतर ९० मिनिटांत पार करणे शक्य करील, असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दावा. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्याने खंडाळा घाटातील कोंडी कमी झाल्याचे दावे, द्रुतगती मार्गाच्या दहापदरीकरणाची चर्चा, शिवाय तिसरा द्रुतगती मार्ग करण्याचा बेत एका बाजूला आणि आता त्यात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची टूम. यातून सतत काही ना काही बांधत राहण्याचे कंत्राटचक्र स्पष्टच दिसते. पण त्याचा परिणाम प्रवाशांवरही होतो.
हा परिणाम वेळ वाचण्याचाच असतो असे नाही. ‘मिसिंग लिंक’च्या कामाचा खर्च साडेसहा हजार कोटींहून अधिक, नव्या द्रुतगती मार्गासाठी १५ हजार कोटींचा अंदाज आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सहा हजार कोटींचे असणे अपेक्षित. हे प्रचंड आकडे पाहिले, तर लक्षात येते, की मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्यासाठी २५ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे, तेही दोन मार्ग सध्या अस्तित्वात असताना.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या कामात खंडाळा घाट वगळून वाहतूक आणखी जलद करण्याची योजना दिसते. तसे असेल, तर ‘मिसिंग लिंक’ ही साडेसहा हजार कोटींची तात्पुरती सोय आहे, असे म्हणायचे का? शिवाय, जुन्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचा खर्च पथकराच्या माध्यमातून वसूल होणार आहे. त्यामुळे आत्ता या मार्गावर पथकर घेण्यासाठी असलेली २०३५ पर्यंतची मुदत १० ते १५ वर्षांनी वाढणार. पथकर किती वाढेल, ते पुढच्या खर्चावर ठरेल. म्हणजे अखेर भुर्दंड वाहनचालकांवरच.
मुंबईलगत तयार होत असलेली तिसरी मुंबई, पुण्यालगत होत असलेले नवे पुणे लक्षात घेऊन हे सर्व मार्ग बांधले जाणार असल्याचे म्हटले जाते. एक वेळ ते मान्य केले, तरी हा नवा विकास करताना या दोन्ही शहरांची आणि त्यांच्या विस्तारित भागांची क्षमता संपत चालली असल्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? या दोन्ही शहरांत अंतर्गत रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे, की समजा कुणी नव्या गुळगुळीत महामार्गाद्वारे दोन्हीपैकी एका शहरात एखादा शिरला, तर त्याला वेशीपासून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी महामार्ग ओलांडताना लागतो, तेवढाच वेळ लागतो.
मग महामार्गाचा काय उपयोग, असा प्रश्न कुणाला पडला, तर तो गैरलागू नाही. दुसरीकडे, ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठीच गावागावांत विरोध होत आहे, तर ‘समृद्धी’ बांधल्यानंतरही त्याचा वापर तितकासा होत नाही, असे निरीक्षण तज्ज्ञ नोंदवतात. महामार्गांच्या निर्मिती आणि विस्तारीकरणाची ही दिशा नेमकी कोणाच्या विकासाची आहे, असा प्रश्न त्यामुळे पडतो. त्यात कधीही दुरुस्त न होणारा मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई आणि पुण्याहून नाशिकला जाताना कमी न होणारा वेळ, हे आणखी प्रश्न निर्माण करणारे.
पूर्वी रोजगार हमी योजनेसाठी गावे जोडणार्या रस्त्यांची कामे काढली जात. त्यातून रस्तेबांधणी व बेरोजगारांना रोजगार, असा दुहेरी उद्देश होता. त्यातही गैरप्रकार होत असत. पण, किमान मूळ उद्देश हाताला काम नसलेल्यांना कामाला लावण्याचा होता. सध्या प्रामुख्याने होणारी महामार्गांची बांधणी फक्त आणि फक्त कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी होते की काय, अशी शंका येते. कारण, बहुतांश सर्वच कामे ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ अशा तत्त्वावर चालणारी. आणि, ज्या जनतेसाठी हे महामार्ग बांधले जातात, त्यांना त्यांच्याच कररूपी पैशांतून काम झालेल्या या मार्गांचा वापर करण्यासाठी पथकर भरण्याची सक्ती. असे ‘महाग’मार्ग नक्की कोणता विकास साधतात, हा त्यामुळे प्रश्नच.
