सत्य काय असतं? एकाचं सत्य दुसर्‍यासाठी असत्य वा अर्धसत्यही असू शकतंच. पण ते मांडण्याचा हक्क हिरावून घेतला जाणं कितपत योग्य आहे? विशेषत: सत्य शोधून काढणं आणि ते मांडत राहणं हाच ज्याचा पेशा आहे, अभिव्यक्ती हेच ज्याचं आयुष्य आहे, अशा व्यक्तीसाठी आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार नाकारणं अधिकच अन्यायकारक नव्हे का? हे सारे प्रश्न पडण्यास निमित्त म्हणजे, जो साको यांच्या ‘द वन्स अँड द फ्युचर रायट’ या पुस्तकाचं भारतात वितरण करण्यास ‘पेंग्विन इंडिया’ने दिलेला नकार. पुस्तकात उत्तरप्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या आणि अनेक हत्या व विस्थापनास कारणीभूत ठरलेल्या हिंदू-मुस्लीम दंगलींचं चित्र वाचकांसमोर मांडण्यात आलं आहे.

जो साको बोस्नियापासून पॅलेस्टाइनपर्यंत जगभरातल्या अनेक संघर्षांवर कॉमिक बुक्सच्या माध्यमातून व्यक्त होत आले आहेत. त्यांच्या ‘पॅलेस्टाइन’ या पुस्तकाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर बरंच कौतुक झालं आहे. घटनास्थळी जाऊन, संबंधितांच्या भेटीगाठी घेऊन, आलेल्या स्वानुभवाच्या आधारे चित्र आणि आशयातून ते व्यक्त होतात. ही वेगळ्या धाटणीची पत्रकारिताच- व्यक्त होण्याची दोन माध्यमं एकाच वेळी वापरून दुहेरी परिणाम साधणारी!

कलाकार आणि पत्रकार म्हणून साको यांनी एवढ्या वर्षांत निर्माण केलेली विश्वासार्हता पाहता, २०१३ मधील मुझफ्फरनगर दंगलीचा वेध घेणारं त्यांचं ‘द वन्स अँड फ्युचर द रायट’ हे नवं पुस्तक वितरित करण्यास ‘पेंग्विन इंडिया’ने नकार देणं धक्कादायक ठरतं. त्यासाठी देण्यात आलेलं कारण तर अधिकच आश्चर्यकारक आहे. पुस्तकातला हाताने काढलेला नकाशा अचूक नाही, म्हणून पुस्तक वितरित करण्यास नकार देण्यात आला आहे. मग प्रश्न पडतो की साको यांना तेवढा नकाशा बदलण्यास सांगता आलं नसतं का? पेंग्विन प्रकाशनाने त्या दृष्टीने प्रयत्न केले की नाही? ‘पेंग्विन इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव श्रीनागेश यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, प्रकाशकाने ‘पेंग्विन यूके’ला या पुस्तकासंदर्भात काही प्रश्न विचारले होते आणि संदर्भांची मागणी केली होती, मात्र ती माहिती देण्यात आलेली नाही. मुझफ्फरनगरच्या दंगलीत सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला आणि हजारोंना विस्थापित होणं भाग पडलं होतं. त्यानंतर तिथं जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेऊन, या दंगलीचं वार्तांकन केलेल्या पत्रकारांशी बोलून, त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती अन्य अनेक मार्गांनी तपासून हाती आलेल्या वास्तवाचं प्रकाशन रोखण्यासाठी पेंग्विनने दिलेली कारणं पुरेशी आहेत का? जो साकोसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चं खास स्थान निर्माण केलेल्या लेखकाच्या पुस्तकाची ही गत होते तेव्हा, देशातले अन्य लेखक, पत्रकार, संशोधक यांच्या अभ्यास आणि अभिव्यक्तीवर काय परिणाम होत असेल?

साको यांनी त्यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातील चित्रांतही त्यांचं स्वतःचं पात्र रेखाटलं आहे. ते संबंधितांशी बोलताना, त्यांनी दिलेली माहिती नोंदवून घेताना दिसतात. घटनेला अनेक वर्षं उलटल्यानंतरही नेटाने हे पुस्तक पूर्ण करण्याचे प्रयत्न रेटत राहण्यामागे त्यांच्या मनातली उत्तरदायित्वाची भावना होती. मी या पुस्तकासाठी अनेकांना त्रास दिला आहे, त्यांच्या भावनांचा सन्मान व्हावा म्हणून हे पुस्तक उपलब्ध होणं अतिशय गरजेचं
आहे, असं साको यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.