आकाशवाणीच्या पु. मं. लाड व्याख्यानमालेतील हे दुसरे भाषण होय. या भाषणात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पूर्वार्धात ज्या रहस्यवादाच्या संकल्पनेची विस्ताराने मांडणी केली होती, तो रहस्यवाद आधुनिक पाश्चात्त्य साहित्यात ज्या स्वरूपात आढळतो, त्यापेक्षा भारतीय संस्कृत साहित्यात असलेले त्याचे प्रतिपादन हे दिव्य अध्यात्मवादी अनुभूतीच्या स्वरूपात कसे आढळते, याचे या उत्तरार्धाच्या भाषणात तर्कतीर्थांनी विवेचन केले आहे.

आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, ‘‘बर्ट्रांड रसेल यांनी ‘गूढवाद व तर्क’ (मिस्टिसिझम अँड लॉजिक) या आपल्या निबंधात गूढवादाची मीमांसा केली आहे. ही त्यांची मीमांसा बर्गसां यांच्या गूढवादी तत्त्वचिंतनावर आधारित आहे. माणसात अंत:प्रज्ञा आणि तर्कबुद्धी अशा ज्ञान निर्मिणाऱ्या दोन प्रवृत्ती असतात. ज्यांच्यात अंत:प्रज्ञा प्रवृत्ती असते, अशी माणसे पुढे प्रेषित, ऋषी, भविष्यवादी, धर्मसंस्थापक, कवी, कलाकार, वीर, योद्धे, धर्मज्ञ, संत अशा त्या त्या क्षेत्रांतील श्रेष्ठ व्यक्ती बनतात. ज्यांच्यामध्ये तर्कबुद्धी प्रवृत्ती प्रबळ असते, असे लोक विज्ञानवेत्ते, वैयकरणी, गणिती, न्यायाधीश, पंडित, मुत्सद्दी होतात.

अंत:प्रज्ञेला सत्यदर्शनाचा साक्षात्कार होणे, यालाच गूढवाद वा रहस्यवाद मानले जाते. आज अंत:प्रज्ञा आणि तर्कबुद्धी यांच्या समन्वयाची गरज आहे. सौंदर्यमीमांसा ही लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही मार्गांनी करता येते. यातील अलौकिकवादी सौंदर्यमीमांसा म्हणजे गूढवाद वा रहस्यवाद असतो, तर लौकिकवादी सौंदर्यमीमांसा म्हणजे छायावाद अथवा स्वच्छंदवाद (रोमँटिसिझम) होय. भारतीय प्राचीन संस्कृत वाङ्मयात अभिनव गुप्त, भृगू, तर आधुनिक मराठी साहित्यात बालकवी, प्रा. बा. सी. मर्ढेकर यांचे काव्य गूढवादी काव्य म्हणून ओळखले जाते.’’

तर्कतीर्थांनी या व्याख्यानात संस्कृत आणि मराठी काव्य म्हणजे प्राचीन आणि आधुनिकतेची रूपे होत. दोहोत गूढवादी अनुभूतीची साम्यस्थळे आढळतात, हे स्पष्ट केले आहे. प्रा. न. र. फाटक यांनी या दोन्ही व्याख्यानपुष्पांचा आपल्या समारोपपर भाषणात परामर्श घेत म्हटले आहे की, ‘‘दोन्ही दिवस मी पुष्पांचा सुगंध घेत होतो. ‘रहस्यवाद आणि साहित्य’ विषयावर गेली शेकडो वर्षे चर्वितचर्वण चालत आलेले आहे. तर्कतीर्थांनी एक क्लिष्ट विषय सुबोध करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इत:पर कुणास सदर विषय दुर्बोध वाटला, तर तो दोष व्याख्यात्याचा नसून, त्याचे रहस्य मूळ विषयाच्या गूढतेतच सामावलेले आहे.’’ तर्कतीर्थांनी या व्याख्यानात सत्य आणि सौंदर्याची चर्चा करीत गूढतेचे स्वरूप समजाविले आहे. काही संकल्पना ‘ना अरत्री ना परत्री’ असतात. ‘ना इकडे, ना तिकडे’ कळूनही सरतेशेवटी त्या गूढ, क्लिष्टच राहतात. गूढवादी विवेचनातला ‘आत्मा’ म्हणजे रोजच्या जीवनातला ‘मी’ असतो. आपणास आत्मानुभूती होते; पण ती स्पष्ट करता येत नाही. संत रामदासांनी मराठीत (आणि हिंदीत व कबीरदासांनी) गुळाच्या आस्वादाचा दिलेला दृष्टांत प्रा. न. र. फाटक यांनी उद्धृत करून ती आत्मानुभूती ‘स्वसंवेद्या’ असल्याचे म्हटले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या या दोन्ही व्याख्यानांची प्रशंसा करताना ‘गुरोस्तु मौनं व्याख्यानं’ अशा शब्दांत करीत प्रा. फाटक यांनी ते ‘स्वसंवेद्या’ असल्याचे मान्य केले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची ही दोन भाषणे या विषयाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून लक्षात घेऊन यात त्यांनी कलेचा उगम व तिचे स्वरूप अशा दोन्ही तत्त्वांची मांडणी पाश्चात्त्य आणि भारतीय साहित्यात विशेषत: काव्यात कशी झाली आहे, त्याचे उत्कृष्ट प्रतिपादन केले आहे.

‘दिव्य शून्यमय सारे आहे,

शून्यपणाने शून्य नांदते उत्पत्तिस्थित्यन्तांत

त्या शून्यांतुनि उदया येती,

शून्याला अक्षय शोधिती,

जागृत सारे एकाकारें शून्याच्या आवर्तात’

या बालकवींच्या ओळी आपल्या भाषणात उद्धृत करून तर्कतीर्थांनी गूढवाद म्हणजे एका अर्थाने शून्याचाच शोध असतो, हे मांडले आहे. शून्यातून शून्य जाऊन शून्य शिल्लक राहण्याचे जे गूढ तत्त्वज्ञान आहे, त्याचा खरा अर्थ स्वशोध असाच आहे, तो अनादिअनंत चालत राहणार, हेही तितकेच खरे. तेच या व्याख्यानांतून तर्कतीर्थांना अधोरेखित होणे अपेक्षित असावे, असे दिसते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com