चित्ततोष खांडेकर (नदी विषयक संशोधक अभ्यासक)
नीतीशतकातील नवव्या श्लोकात भर्तृहरि गंगेच्या प्रवाहाच्या इतिहासाची एक अनोखी कथा सांगतो. ‘गंगा जेव्हा स्वर्गात होती तेव्हा ती थोडीशी उद्धट होती, पण स्वर्गातील इतर देवतांमुळे तिच्या उद्धटपणाला वेसण घातली गेली. मात्र ती जेव्हा स्वर्गातून खाली उतरली, तेव्हा तिच्या उद्धटपणाला थांबवणारं कोणीच नव्हतं. तिच्या उद्धटपणामुळे ती खाली वेगाने वाहत गेली – तिची ‘अधोगती’ झाली… ती इतकी की ती अखेर गोडं पाणी सोडून खार्या पाण्यात मिसळली. सारांश दुर्गुणांना वेसण घातली नाही तर एखाद्या थोर माणसाचीही गंगेप्रमाणे अधोगती होऊ शकते’. पण भर्तृहरि जर आधुनिक काळात जन्मला असता तर त्याने अधोगतीची एक वेगळीच अनोखी कथा लिहिली असती. कारण खाली वाहात जाणं यापलीकडेही नदीप्रवाहाची अनेक प्रकारे अधोगती झाली. याच प्रवाहांच्या वेगवेगळ्या रूपांचा इतिहास म्हणजे नदीचा आधुनिक इतिहास! आधुनिकता आज आपल्या आयुष्याला सर्वाथाने व्यापून उरली आहे. आधुनिकतेच्या प्रत्येक पदरासह एक नवीन नदीकारण जन्माला आलं. या इतिहासाचे दोन पदर आज समजून घेऊ.
पहिला पदर तंत्रज्ञानाचा. आधुनिकता ओळखली जाते ती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे. औद्योगिकीकरण झालं तेच नवीन तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे. मग छापखाना असो, रेल्वे असो, हातमाग असो, त्याहीआधी तेलाचा लागलेला शोध असो; मानवी जीवनाचं तंत्रयुगात पदार्पण झालं. आधुनिकतेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत तंत्रक्रांती होत राहिली. हातमागापासून एआयपर्यंत हा तंत्रज्ञानाचा विकास सुरूच आहे. पण तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पावलागणिक नदीची नव्यानं अधोगती झाल्याचं दिसतं. तंत्रक्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या काळात अमेरिकेत हेन्री डेव्हिड थोरो या विचारवंतानं नद्या कशा बदलत आहेत हे समजायला होडीतून नद्यांमध्ये प्रवास केला. या प्रवासवर्णनाचं एक पुस्तक तयार झाले, ‘अ वीक ऑन द कॉन्कॉर्ड ॲण्ड मॅरीमॅक रिव्हर’, औद्योगिकीकरण आणि नवीन वसाहतींमुळे बदलत चाललेल्या नद्या, त्यांचा सिंचनासाठी होणारा अतिवापर, स्थानिक मूळनिवासींचं नद्यांशी असलेलं अतूट नातं, आणि नवीन राहायला येणार्या युरोपीय लोकांचं नातं याचा ऊहापोह थोरो करतो. जिथं धरण बांधून नदी अडवली जात होती, तिथं नदीचा प्रवाह वाहता राहात नव्हता, तो स्थिर होत होता. नदीच्या प्रवाहाची दिशा आणि दशाही नदी ठरवतच नव्हती… ते ठरवत होता आधुनिक मानव. थोरोची नदीच्या बदलाबद्दलची छोटी छोटी निरीक्षणं तेव्हाचं वर्तमान सांगत होती. पण या बदलांचं पुढे काय झालं?
हे पुढले बदलही त्यानंतरच्या अनेक पर्यावरण निरीक्षकांनी टप्या-टप्यानं टिपलेले दिसतात. मग तो लॉस एंजलिस नदीचा झालेला मृत्यू असो वा कारखान्यातील रसायनांमुळे ‘जळलेली’ कुयाहोगा नदी… हे बदल अमेरिकेतल्या पर्यावरणीय अभ्यासकांनी निक्षून नोंदवले. याचं टोक गाठलं विसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या ‘सायलेन्स्ड रिव्हर’ या पुस्तकानं. मोठ्या धरणांमुळे नदीची ओळख असलेला तिचा नादच हरवला, अशी मांडणी पॅट्रिक मॅक्कली यानं त्याच्या या पुस्तकात केली. नद्यांचं प्रवाहीपण संपवणारी ही धरणांची जीवघेणी स्पर्धा थांबवण्याची करुणाच मॅक्कलीनं भाकली. नदीचा नाद शांत झाल्यामुळे नदीकाठच्या समूहांचे आक्रोश, त्यांचा निनाद गगनाला भिडला – हा नद्यांनी घडवलेला आधुनिक इतिहास होता!
पण तंत्रक्रांतीनं होणारी नद्यांची अधोगती इथेच थांबली नाही, त्याचे नवनवे उच्चांक मानव गाठतोच आहे. आज उद्योगजगतात नवी क्रांती आणणारी ‘एआय डेटा सेंटर्स’ नदीचं पाणी अतोनात वापरण्यावर थांबत नाहीत, तर ते वापरताच येणार नाही इतकं प्रदूषित करतात. अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतातल्या नद्यांच्या दुर्दशेची कथा तर हीच अधोगतीची गाथा पुढं नेते आहे. तंत्रक्रांतीमुळे मृत झालेल्या अनेक नद्यांची गीतं आज पर्यावरण चळवळी स्मृतीचिन्हं म्हणून गात आहेत.
दुसरा पदर राष्ट्रवादाचा. आधुनिकतेमुळे तंत्रज्ञानाचा शोध लागला. तंत्रज्ञानाच्या वापरातून नवीन उद्योगांची निर्मिती झाली. त्यासाठी नवीन बाजारपेठा आणि संसाधनांची गरज भासली. म्हणजेच सातासमुद्रापार जावं लागणार, नवीन प्रदेशात उद्योग उभे करावे लागणार. पण यात धोके भरपूर होते. त्यासाठी राज्यसत्तेचा पाठिंबा गरजेचा होता. तेव्हा प्रत्येक देशाच्या उद्योजकांनी राजाश्रयासाठी ‘आपलेपणाची भाषा’ स्वीकारली. ‘आपले उद्योग मोठे व्हायला हवे, हेच फ्रान्समध्ये फ्रेंच, ब्रिटनमध्ये इंग्रज, नेदरलॅण्डसमध्ये डच लोक म्हणू लागले; आपणच जगाच्या पुढं जायचं, आपला झेंडा सातासमुद्रापार फडकायला हवा… या प्रक्रियेतून जन्मलेला राष्ट्रवाद फक्त त्या-त्या देशातल्या भांडवलदार-राजांच्या संवादापर्यंत मर्यादित नव्हता. त्या राष्ट्रवादाची भाषा ही भौगोलिक प्रदेशांवर सांस्कृतिक मालकीची संकल्पना मांडत होती. ‘आसिंधुसिंधु भारत’सारख्या कल्पनेचे मुळ १७व्या-१८व्या शतकातल्या फ्रेंच-जर्मन राष्ट्रवादात आहे. र्हाईनच्या पाण्यात ज्या दिवशी फ्रेंच घोडे न्हातील त्यादिवशी फ्रेंच राष्ट्र त्याचा सर्वोच्च बिंदू गाठेल अशी तिथल्या राजांची धारणा होती. र्हाइनच्या काठावरल्या शहरांपर्यंत फ्रेंच साम्राज्य वाढवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. र्हाइननजीकची अनेक शहरंही त्यांनी जिंकली. पण त्यांच्या स्वप्नातला खरा उत्कर्ष गाठला नेपोलियननं. नेपोलियनचं घोडदळ र्हाइन नदी ओलांडून जर्मनीत धडकले. रोमन साम्राज्याच्या काळापासून हेवा वाटणारा र्हाइनलॅण्ड जिंकून, र्हाइन साम्राज्याची त्याने स्थापना केली. ‘र्हाइनपासून अटलांटिक महासागरापर्यंत पसरलेलं गौरवशाली फ्रेंच राष्ट्र’ अशी व्याख्या फ्रेंचांनी त्यांच्या राष्ट्राची केली. पण नेपोलियनच्या या विजयी घोडदौडीनं फक्त फ्रेंच राष्ट्रवादाला चालना दिली नव्हती. फ्रेंचांनी जर्मनीचा पश्चिम भाग पादाक्रांत केल्यानं जर्मनांमध्ये अवमान, दु:ख, संतापाची भावना होती, यातून जर्मन समाजात आपली नदी परत जिंकण्याची ईर्षा पेटली. एकोणिसाव्या शतकातल्या जर्मन कवी, लेखक, कांदबरीकारांनी त्यांच्या लेखनातून र्हाइन पुन्हा मिळवण्याची एक आशा व्यक्त केली. त्यांच्यासाठी र्हाईन नदी नव्हती, नद होता. त्याहूनी जास्त र्हाइन हा त्यांचा पिता होता. फ्रेंचांच्या कैदेतून आमचा पवित्र बाप आम्हाला सोडवायचा आहे, असं जर्मन लेखक त्यांच्या लेखनातून सांगत होते. ‘डी वाख्ट् आम र्हाईन’ हे र्हाइनवरचं गाणं, हे जर्मन राष्ट्रवादाची गीता झालं होतं. या जर्मन साहित्यातून र्हाइन संस्कृतीत मिसळलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जन्माला आला. पुढं सगळे जर्मन भाषिक प्रांत एकत्रित करून जर्मन राष्ट्र उभारताना, ‘र्हाइनच्या मुलांचं राष्ट्र’ ही उपमा सार्थ झाली. थोडक्यात आधुनिक फ्रेंच-जर्मन राष्ट्रवादांची जननीच र्हाइन नदी झाली.
आक्रमक राष्ट्रवादामुळे, युरोपातील राष्ट्रांमध्ये साम्राज्य जगभर वाढवायची आणि टिकवण्याची एक स्पर्धाच सुरू झाली. यातूनच विसाव्या शतकात दोन जागतिक महायुद्धं झाली. पण या महायुद्धांच्या अलीकडे, मध्ये आणि नंतर नदीला वेगळे आयाम मिळाले. नदी हे राजकीय स्पर्धेचं साधन झालं. दोन देशांच्या सीमेवरून वाहणार्या नदीवर धरण बांधायचं आणि तिचं पाणी वळवायचं, किंवा कारखाना उभारून प्रदूषण करणारी रसायनं दुसर्या देशाच्या नदीच्या प्रवाहात सोडायची, अशा कुरघोड्या सुरू झाल्या. अमेरिका-मेक्सिको असो, फ्रान्स-जर्मनी असो, वा पश्चिम आशियातील इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्सच्या वसाहती असोत, सगळीकडे नदी हे मुत्सद्देगिरीचं आणि परराष्ट्र धोरणाचं एक हत्यार झाले. दुसर्या महायुद्धानंतर याला नद्यांवरच्या आंतरराष्ट्रीय संघर्षांचं स्वरूप आलं. मग सध्या चाललेला इथियोपिया-इजिप्तमधील नाइलचा संघर्ष असो, भारत-पाकिस्तानातील सिंधूचा संघर्ष असो वा चीन-दक्षिण पूर्व आशियाई देश यांच्यातला मेकॉँगवरचा संघर्ष असो – राष्ट्रवादाच्या बदलत्या स्वरूपानुसार नदीप्रणीत राष्ट्रवादाचे आयाम बदलले. जननी-जनक ते हत्यार-साधन अशी नद्यांची राष्ट्रवादात अधोगतीच झाली. त्यात त्यांचे प्रवाह थांबले. कुठं कुठं तर नष्टसुद्धा झाले. रिओ ग्रान्डे आणि मिसिसीपीच्या काठावरचे झरे आटले. त्या नद्यांची युद्धाचं साधन ते युद्धाचं साध्य इथपर्यंत अधोगती एकविसावं शतक पाहील, अशी भीती अनेक अभ्यासक व्यक्त करत आहेत.
आधुनिकतेपायी जन्माला आलेली तंत्रक्रांती आणि राष्ट्रवादानं नद्यांची सुरू झालेली अधोगती आजही सुरूच आहे. पण आधुनिक इतिहासातलं नदीकारण फक्त नदीच्या अधोगतीचेच आहे का? या प्रश्नाचं उत्तर पुढील भागात शोधू.
chittatoshresearch@gmail.com
