कीर्ती भांडारकर (४२ वर्षे) दिवसभर अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. माहूरझरी गावापासून नागपूर शहरापर्यंतचं साधारण २० किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्या घरी जाण्याऐवजी नागपूरजवळच्या फेट्री गावी जातात. तिथल्या ग्रंथालयात काही तास शांतपणे अभ्यास करतात. त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षक पदाची परीक्षा द्यायची आहे. ‘मी एकत्र कुटुंबात राहते, त्यामुळे घरी अभ्यास करणं शक्यच नाही. शिवाय या वाचनालयात स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तकं, वाय-फाय, संगणक, कूलर अशा  अभ्यासासाठी आवश्यक सर्व सोयी आहेत,’ असं त्या सांगतात. 

पण आज जिथे हे स्वच्छ, सुंदर वाचनालय साकार झालं आहे, तिथे अगदी अलीकडच्या काळापर्यंत ओसाड पडलेलं एक ग्रंथालय होतं. त्याचं परिवर्तन वापरण्याजोग्या वाचनालयात झालं ते सरकारी कागदपत्रांवर साचलेले धुळीचे थर आणि जळमटं हटवण्याच्या एका मोहिमेमुळे… ‘‘सरकारने एक शंभर दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

सरकारी इमारती स्वच्छ करणं आणि जुनी कागदपत्र नियोजनबद्धरित्या लावून ठेवणं हे या मोहिमेतलं एक काम होतं. त्यावेळी लक्षात आलं की, अनेक इमारती कडी-कुलपात बंद आणि पडीक आहेत,’’ अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी ‘द संडे एक्स्प्रेस’ला दिली. अशी जुनी ग्रामपंचायत कार्यालयं, सभागृह, अंगणवाड्या आणि शाळांच्या इमारतींची सफाई आणि डागडुजी करून त्यांचं आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा अभ्यासकेंद्रांत रूपांतर करण्यात आलं आहे. ‘ड्रीम (‘डेडिकेटेड रूम फॉर एम्पॉवरमेंट, अवेअरनेस अँड मोटिव्हेशन’) लायब्ररी प्रोजेक्ट’ अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

महामुनी सांगतात, ‘‘पडीक इमारतींचा योग्य वापर व्हावा, यासाठी एप्रिल २०२५ पासून प्रयत्न सुरू केले. काही इमारतींची डागडुजी सोपी होती. रामटेक आणि पारशिवनीतल्या इमारती फारच जुन्या होत्या. त्यांच्या डागडुजीचा खर्च अडीच लाखांच्या घरात जाण्याची चिन्हं होती. पण दुरुस्ती झाली की २० दिवसांत वाचनालय सुरू करता येत होतं.’’ प्रकल्पाची वाट अगदीच सरळसोट होती, असं नाही. रामटेक परिसरातल्या बांद्रा गावाच्या सरपंच कल्पना भलावी सांगतात, ‘‘आज जिथे वाचनालय आहे तिथे पूर्वी अंगणवाडी होती. ती मोडकळीस आली होती. तरीही तिथे वाचनालय सुरू होणार म्हटल्यावर काही गावकर्‍यांनी विरोध सुरू केला. अनेक बैठका घेतल्यावर ते राजी झाले. शहरांत आणि गावांत राहणार्‍या मुलांना मिळणार्‍या सुविधांत दरी आहे. ती सांधली जात असेल, तर काय हरकत आहे?’’

नागपूरपासून १५ किलोमीटरवर असलेल्या लावा गावातल्या वाचनालयात मुलांच्या चपला रॅकवर व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. १५हून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात गढून गेले होते. तिथे भिंतींवर बुकशेल्फ आहेत आणि त्यावर पुस्तकं नीट लावून ठेवलेली असतात. दोन संगणक आणि एक स्मार्ट टीव्ही आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खास कंपार्टमेंट्सही तयार करण्यात आलेली दिसली.

२२ वर्षांची अश्विनी झोडापे आठ किलोमीटर दूर असलेल्या गोंडखैरी गावातून वाचनालयात येते. ती स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहे. आमच्या गावातही असंच एक ग्रंथालय बांधलं जाईल, असं आश्वासन  अधिकार्‍यांनी दिल्याचं ती सांगते. दाभा येथून येणारा रजत रामटेके (२४) पोलीस भरती परीक्षेची तयारी करत आहे. घरी अभ्यासाला पोषक वातावरण नाही. वाचनालयात अभ्यास करणं सोपं जातं, इथे पुस्तकंही मिळतात, असं तो सांगतो. ‘सर्वहितेय’ या स्वयंसेवी संस्थेने यात ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून भूमिका बजावली. ‘‘अशीच आणखी १०० वाचनालयं स्थापन करण्याचा विचार आहे. हे मॉडेल राज्यात अन्यत्रही राबवले जाऊ शकते,’’ असं मत महामुनी यांनी व्यक्त केलं. (‘द इंडियन एक्स्प्रेस’मधून)