‘काव्येतिहाससंग्रहा’च्या प्रारंभी उपोद्घातामध्येच काशीनाथपंत साने यांनी ऐतिहासिक पत्रव्यवहाराबद्दलची तत्कालीन स्थिती वर्णन केली होती. त्यांनी लिहिले होते, ‘जुन्या काळच्या पत्रव्यवहारांची पुडकीच्या पुडकी पुष्कळ गृहस्थांकडे लोळत पडलेली सापडतील; परंतु ती मिळण्याचीच मारामार आहे. या पत्रव्यवहाराची ऐतिहासिक दृष्टीनेच काय किंमत असेल ती असेल, बाकी अन्य दृष्टीने पाहता त्याची काही किंमत या काळी दिसत नाही. तेव्हा हे लेख वाण्याच्या दुकानात किंवा कसरीच्या भक्ष्यस्थानी दवडण्यापेक्षा त्यांचा जीर्णोद्धार करण्याविषयी त्यांच्या रक्षकांच्या मनात कोणत्याही प्रकारे बिंबले, तर मात्र इतिहासाच्या कामास मोठी अनुकूलता होईल.’
साने यांनी व्यक्त केलेली मूळची खंत आणि नंतरचा आशावाद वि. का. राजवाडे यांच्या अंत:करणापर्यंत जाऊन पोचला असावा. त्यांच्या पुढील आयुष्यातील कार्याची बीजे कुठेतरी त्या सामाजिक विरोधाभासात लपलेली असावीत. ती त्यांना जरी लगेच प्रकर्षाने जाणवली नसली, तरी त्यांच्या नकळत परागी भवनाची प्रक्रिया त्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या वाचनाने निश्चित सुरू झाली असावी, हा तर्क बांधता येतो.
या दृष्टीने उल्लेख केला पाहिजे, तो बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना फडणीस यांच्या स्वलिखित आत्मकथनाचा आणि त्यानंतर साने यांनी ‘काव्येतिहाससंग्रहा’मधून प्रसिद्ध केलेल्या सुमारे दोनशे पत्रांचा. जुलै १७६१मध्ये पहिले माधवराव पेशवे झाले, तोपर्यंतचे नानांचे आत्मवृत्त तसे पाहिले तर अगदी संक्षिप्त आहे; पण तरीही महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वायुष्याबद्दल, हातून घडलेल्या चुकांबद्दल, स्वभावदोषांबद्दल अत्यंत प्रामाणिकपणाने लिहिलेले ते आत्मकथन जसेच्या तसे छापण्यात काशीनाथ साने यांची जी संपादकीय दृष्टी स्पष्ट झाली, ती पारदर्शकतेचा दावा करणार्या भल्याभल्या आधुनिक लेखकांना वा संपादकांनासुद्धा दाखवणे कठीण जाते…आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा असंख्य अस्सल कागदपत्रांच्या आधारे नानांच्या इंग्रजांविरुद्धच्या दीर्घसूत्री व्यूहरचनेचा उलगडा होत गेला, तेव्हा समाजामध्ये त्याची कशी प्रतिक्रिया उमटली असेल, याची आज आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
१७७९ मध्ये वडगावचा तह होऊन इंग्रजांनी कारस्थानी राघोबादादाला मराठ्यांच्या ताब्यात दिले होते आणि साष्टीसह सगळा प्रांतही परत केला होता. तथापि तो तह नंतर इंग्रजांनी पाळला नाही. तेव्हा इंग्रजांची खोड मोडण्यासाठी नाना फडणीस यांनी शिंदे-होळकर-भोसले वगैरे मराठे सरदारांना तर एकत्र केलेच, पण निजाम आणि हैदर या दक्षिणेतल्या प्रतिस्पध्र्यांशीही संधान बांधून त्यांनाही इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात सहभागी करून घेतले. इंग्रजांना सर्व बाजूंनी घेरण्याचा आणि एकाच वेळी त्यांच्यावर हल्ले चढवण्याचा जो व्यूह नानांनी तडीस नेला, त्याबद्दलची दोनचार नव्हेत तर १४० पत्रे काशीनाथ साने यांनी आपल्या मासिकातून टप्प्याटप्प्याने छापली. त्या मूळ पत्रांमधील काही मजकूर खुद्द नानांच्याच हस्ताक्षरात असल्याचे जसे त्यांनी तळटीप देऊन स्पष्ट केले, तसेच ‘हा पत्रव्यवहार रा. अंताजीपंत हर्डीकर व गोविंद रामचंद्र केळकर, वस्ती महाड यांनी मोठ्या मेहनतीने मिळवून आम्हांकडे पाठविला’, हेही नमूद केले.
अशा स्वरूपाचे लेखन साने यांनी जसे ‘काव्येतिहास’मधून प्रकाशित केले, तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांची नोंद घेणारे लहान-मोठे दस्तावेजही त्यांनी प्रकाशित केले. उदाहरणार्थ-चिमाजी अप्पाने वसई सर केली, त्या मोहिमेदरम्यान त्यानेच ब्रह्मेंद्रस्वामींना वेळोवेळी पाठवलेली एकूण पाच पत्रे. वसई घेणे किती कठीण होते आणि ईश्वरकृपेने तो विजय मिळाल्यावर त्याचे महत्त्व किती वाटले, याचे वर्णन करणारे मधले पत्र म्हणजे तर मर्दुमकीची परिसीमा गाठणार्या वीराचे अत्यंत प्रेरणादायी आत्मकथन. आपल्या भूतकाळातल्या अशा विविध घटना राजवाडे यांच्यासारख्या तरुणांमध्ये मानसिक परिवर्तन घडवून आणणार्या ठरल्या.
आनंद हर्डीकर

