नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारलेल्या चार प्रातिनिधिक भूमिकांमधून त्यांच्या अभिनयाची व्याप्ती आणि खोली दिसून येते, असे मला वाटते. ‘बारिशकर’ (थोडासा रूमानी हो जाए), ‘जय’ (राजू बन गया जंटलमन), ‘वीरप्पन’ (गिद्ध), भीमा (‘स्मशानातील गुलमोहर’- दूरदर्शनवरील एका मालिकेतील भाग) या त्या व्यक्तिरेखा. त्या खरोखरच वेगळ्या होत्या. एक लेखक म्हणूनही नाना इतरांपेक्षा वेगळे होते. अभिनेत्री रंजना यांच्यावर ओढवलेल्या भीषण अपघातामुळे त्यांना केवळ शारीरिकच नव्हे, तर जो तीव्र मानसिक धक्काही सहन करावा लागला होता, त्याचा नानांनी स्पष्ट उल्लेख त्यांच्या लिखाणात केला होता. स्मिता पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर नानांनी लिहिलेला लेख हा कोणत्याही ठराविक साचेबद्धपणापेक्षा किंवा केवळ औपचारिक आदरांजली वाहण्याच्या प्रवृत्तीपेक्षा वेगळा होता; तो मनापासून लिहिला गेला होता आणि दर्जेदार चित्रपटांच्या चाहत्यांच्या मनात स्मिता पाटील यांचे नेमके स्थान काय होते, हे त्यातून प्रभावीपणे मांडले गेले होते. – सत्यव्रत नाईक, नारायण पेठ, पुणे

बबन्या लक्षात राहिला…

अभिनेते नाना पाटेकर गेल्यानंतर त्यांच्याविषयी अनेक लेख व माहिती येत आहे. त्यात त्यांनी सत्तरच्या दशकात ‘पाहिजे जातीचे’ या विजय तेंडुलकर लिखित नाटकात केलेल्या भूमिकेचा उल्लेख आढळला नाही. त्यात नानांनी केलेली बबन्याची भूमिका गाजली होती. गावात असलेल्या कॉलेजात एक जातीबाहेरचा प्राध्यापक येतो. तो जातीबाहेरचा असल्याने कधीतरी त्याला डच्चू मिळून जातीतलाच प्राध्यापक नेमला जाण्याची शक्यता असते. तो प्राध्यापक शिक्षणसंस्था चालक असलेल्या पाटलाच्या मुलीबरोबरच प्रेम जमवतो. मुलांशी मिळून मिसळून राहिल्याने बबन्याचा व इतर मुलांचा त्याला पाठिंबा असतो. प्रेमाला विरोध होईल म्हणून सकाळी पहाटेच्या अंधारात प्रात:विधीसाठी गेलेल्या पाटलाच्या मुलीला बबन्या उचलून आणणार असतो. पहाटेच्या अंधारात बबन्या जिला उचलून आणतो ती निघते पाटलाच्या घरातील मुलीसोबत गेलेली म्हातारी. या नाटकाचा कुठे उल्लेख झाला नाही याचे आश्चर्य वाटते. नाना कायम स्मृतीत राहील. – दिनकर र. जाधव, ठाणे</p>

लोकांच्या मनातला पुरस्कार

‘ज्वालामुखी!’हा अग्रलेख (९ ऑक्टोंबर) वाचला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची एक्झिट मनास सुन्न करणारी आहे. भारदस्त आवाज, भेदक डोळे, टोकदार संवादफेकीच्या जोरावर नाना पाटेकर यांनी अनेक दशके चित्रपट सृष्टी गाजवली. पडद्यावरचा तो क्रांतिवीर खर्‍या आयुष्यात शेतकर्‍यांच्या बांधावर गेला. मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ काढून दुष्काळात, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली. जलयुक्त शिवारसाठी स्वत: शेतात उतरला. भारत सरकारतर्फे प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण त्यापेक्षा मोठा पुरस्कार – लोकांच्या मनातला… तो कायम राहील. – प्रभाकर वारुळे, मालेगाव, नाशिक

फक्त पोलिसांवरच शिक्का का?

‘वाझेच्या राहणीमानाबाबत प्रश्नचिन्ह’ या शीर्षकाखालील बातमी वाचली आणि करमणूक झाली! सचिन वाझे हे पोलीस खात्यात ‘सहायक पोलीस निरीक्षक’ म्हणून कार्यरत होते. हे पद पोलीस यंत्रणेत तसे कनिष्ठच म्हणावे लागेल. त्यावरून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संपत्तीची कल्पना यावी. या प्रकरणात उद्योगपती मुकेश अंबानींच्या नावाचा उल्लेख होत असतो. ‘अँटिलीया’ ही २७ माजली इमारत त्यांचे निवासस्थान आहे. वाझे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ठरवलेच तर ते कदाचित याहीपेक्षा उंच आणि आलिशान इमारत उभारून तिथे आपले निवासस्थान वसवू शकतील असे वाटते. एका सामान्य पोलीस अधिकार्‍याकडे कोट्यवधी रुपयाची मालमत्ता असेल तर देशातल्या लाखो सरकारी कर्मचार्‍यांकडे किती संपत्ती असेल? शेवटी ‘भ्रष्टपणाचा शिक्का’ फक्त पोलिसांच्याच माथी का मारावा, इतर सरकारी खात्याचे काय, हा प्रश्न नागरिकांना पडणारच. – संजय जगताप, ठाणे

loksatta@expressindia.com