‘असुंदरातील सुंदर…’ ( ११ जून) हा अग्रलेख वाचला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेकडे असून त्या देशाचे अध्यक्षच प्रत्येक संघाकडे ‘खाष्ट सासू’च्या नजरेने पाहात असतील तर स्पर्धेतील खिलाडूवृत्तीला गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक संघाकडे जर पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले तर संपूर्ण विश्वचषक स्पर्धा कशा मन:स्थितीत पार पडेल याची कल्पनाच करवत नाही. अशा वेळी न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी लोकांवरच ही स्पर्धा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचे म्हणणे असे की,आज अमेरिका जी प्रगत झालेली दिसत आहे ती स्थलांतरितांच्या योगदानामुळेच. ते स्थलांतरित असले तरी आपापल्या देशाला जिंकून देण्यासाठी खेळतात. तेव्हा यजमानांनी दुसर्‍यांचा मान राखून आपलाही मान वाढवावा हीच अपेक्षा.

– उर्मिला पाटील, कल्याण</strong>

उत्तरदायित्वाचे काय?

‘काँग्रेसच्या नाकर्तेपणाने हिंदू बदनाम’ हे वृत्त (११ जून) वाचले. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवला, प्रसंगी अमेरिकेलाही ‘तुमच्यासमोर झुकणार नाही’, असा संदेश दिल्याचे दाखले मिळतील. मोदींच्या भाषणात देशात उत्तरदायित्वाची नवी संस्कृती निर्माण होण्याकरिता संघराज्यीय उत्तरदायित्व कायदा (फेडरल अकाऊंटीबिलिटी ॲक्ट) किंवा हितसंबंधांच्या संघर्षाबाबत (कॉन्फलिक्ट ऑफ इंटरेस्ट) कायदा अशा विषयांचा समावेश नसावा हे खटकले. वास्तविक त्यांनी यानिमित्ताने देशासमोरील प्रश्नांबाबत वक्तव्य करणे आवश्यक होते. पण आजकाल ते बोलतात एक व त्याविरुद्ध कृती करतात असे दिसते. मागील महिन्यात त्यांनी जनतेस वर्षभर परदेश प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आणि स्वत:च देशाबाहेर गेले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात कायदामंत्र्यांनी जवळजवळ पाऊणशे न्यायमूर्तींसह इंग्लंडवारी केली. हे सारे कोणत्या प्रकारात मोडते ?

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड, मुंबई

तुलनाच होऊ शकत नाही…

‘पंतप्रधान मोदी यांची नेहरूंशी तुलना अशक्य असल्याचे’ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या २७ व्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. अशी तुलना अयोग्यच ठरते. कारण मोदींचा जन्म हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा आहे, तसेच नेहरूंना जो राजकीय कौटुंबिक वारसा लाभला होता, तो मोदींकडे नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधानपदाकडील प्रवास हा मोदींच्या कारकीर्दीचा आलेख आणि नेहरूंच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख सर्वस्वी भिन्न कालखंडातील आहेत, त्यामुळे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!

– राजीव प्रभाकर चिटणीस, मुलुंड

लोकांनाच वाईट दिवस आले आहेत

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्यरत राहण्याचा विक्रम केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करायला हवे. परंतु मोदींची तुलना नेहरूंशी करणे अतिशयोक्तीचे ठरेल. सद्य:स्थिती पाहता विकासाच्या नावावर, देशावर आर्थिक कर्जाचा बोजा वाढला आहे. पण या योजनांमधून नेत्यांचाच विकास झालेला दिसतोय. १२ वर्षांत महागाई सातपट वाढली आहे. गरिबांना मोफत धान्य वाटले जात आहे. फुकट्या योजना मिळवण्यासाठी झुंबड उडतेय त्या लाटण्यासाठी प्रसंगी लबाडीही केली जात आहे. पंतप्रधानांनी दिवसांचा विक्रम मोडला खरा, पण लोकांना मात्र वाईट दिवस आलेत, असे म्हणावे लागत आहे.

– राज नारकर, ठाणे</strong>

काळच ठरवेल…

कोणा एका व्यक्तीची दुसर्‍या व्यक्तीच्या पंतप्रधानपदी राहण्याच्या केवळ कालावधी या निकषानुसार तुलना करून श्रेष्ठत्व ठरविता येणार नाही. कारण कालपरत्वे ज्याच्या त्याच्यासमोर आव्हाने व संधी वेगवेगळ्या असतात. त्यातून त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम कधी त्वरित असतात तर कालांतराने होणारे असतात. त्या परिणामाचा प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष फायदा किंवा दुष्परिणाम देशाच्या विविध घटकांवर, भागांवर होत असतो. त्यामुळे शांतीची अपेक्षा धरणार्‍यांनी वादावादीची अशांती टाळावी हेच योग्य. आपण आपली प्रामाणिक चाल चालत रहावे. काळ ठरवेल, ती लहान हत्तीची आहे की मोठ्या हत्तीची.

– श्रीराम शंकरराव पाटील, उरुण, ईश्वरपूर ( सांगली)

अहवाल मुंडेंच्या बदलीनंतरच येणार?

कारवाईनंतरही नमुना तपासणी मागेच! ही बातमी ( दि. ११ जून) वाचली. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर २० दिवसांत खाद्यपदार्थ, खाद्यतेल, मिठाई, दूध, दुग्ध पदार्थ इ.उत्पादनातील भेसळखोरावर केलेल्या धडक कार्यवाहीमुळे ग्राहक वर्ग सुखावला असेल. पण, या धडक कारवाईत जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक अन्नपदार्थाचे ४४२६ नमुने तपासणीसाठी वर्षभराचा कालावधी आवश्यक असल्याची शक्यता चिंता वाढवणारी आहे. कारण तुकाराम मुंडे यांच्या २१ वर्षांच्या सेवाकाळात २५ बदल्या झालेल्या आहेत; हा वेग लक्षात घेता त्यांची इतर खात्यात बदली होण्याच्या आत अन्नपदार्थाच्या भेसळीचा अहवाल हाती आला तरच भेसळखोरांवर गुन्हे दाखल होऊ शकतील. अन्यथा त्यांची धडक कारवाई निष्फळ ठरेल. जनतेच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या कारवाईच्या समर्थनार्थ राज्यकर्त्यांचा थंडा प्रतिसाद पाहता हीच शक्यता अधिक.

– सतीश कुलकर्णी मालेगावकर, नांदेड</strong>

कशी करणार तो वृद्ध तक्रार?

ठाण्यातील एका वृद्ध माणसाला एका रिक्षाचालकाने मारहाण केल्याची बातमी (लोकसत्ता- ११ जून) वाचली. कारण काय तर वृद्ध माणसाने त्या रिक्षाचालकाला रस्त्यावर थुंकल्याबद्दल हटकले. तेवढ्यावरून चालकाने वृद्धाला मारहाण केली. स्थानिक पक्षाच्या लोकांनी चालकाला शोधण्यासाठी मदत करूनही, पोलीस पुढील कारवाई करू शकत नाहीत. का? तर वृद्ध माणूस तक्रार करायला पुढे येत नाही! मुळात रस्त्यावर थुंकणे हे अनिष्टच आणि विशिष्ट ठिकाणी तर तो गुन्हा मानून कारवाईही होत असते. तरीदेखील, थुंकण्याविरुद्ध एखाद्या माणसाने बोलण्याचीही चोरी झाली आहे. स्वच्छतेबद्दल आपण सगळे भारतीय आनंदीच आहोत म्हणा. यामध्ये परप्रांतीय, पक्ष वगैरे काहीच महत्त्वाचे नाही. मुद्दा हा की, यावर काही उपाय आहे की नाही? इतर देशांचे स्वच्छतेबद्दल कौतुक करायला आपले लोक मागे राहात नाहीत. मात्र स्वत:च्या देशात ही अस्वच्छता आपण राजरोसपणे स्वीकारतो आणि त्यावर कोणी जागरूक नागरिकांनी निषेध नोंदवला तर त्याला होणारी मारहाण थोपवायला आपली यंत्रणाही तक्रारीची वाट पाहते! कशी करणार तो वृद्ध तक्रार? घाबरणारच ना? कोणीही यावे, रस्त्यावर थुंकावे, रस्ते काबीज करावेत आणि याला कोणी वाली नसावे यापेक्षा दु:ख काय?

– प्रकाश मिराशी, ठाणे

बेकायदा कृतीवर आक्षेपाचा अधिकार

ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल बाहेर रस्त्यावर थुंकू नका म्हणून एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला म्हणून त्यांच्यावर एका रिक्षाचालकाद्वारे प्राणघातक ठरू शकला असता असा हल्ला केला गेला हे ऐकून मन विचलित झाले. मी जेव्हा बीकेसी, मुंबई येथे सेवेस होतो, तेव्हा वांद्रे पूर्व येथे सकाळी बसच्या रांगेत उभा असताना माझ्या समोरचा उत्तर भारतीय युवक पचकन बाजूला थुंकला. मी त्याला तेथे थुंकू नको असे बजावले असता, ‘आप यहाँ के मुख्यमंत्री है क्या?’ असा त्याने अरेरावीने मला प्रतिप्रश्न केला. प्रकरण तेथपर्यंत संपले, परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की रांगेतील इतर कुणीही मला पाठिंबा देण्यास पुढे सरसावले नाही. नंतरही एकदा पत्नीसह अंधेरी स्टेशन पूर्व येथे जिन्यावरून उतरलो एवढ्यात बाजूला असलेल्या स्टॉलमधील विक्रेत्याने मधोमध पिचकारी मारली. मी त्याला खडसावले असता,आता ठाण्याला झाले तेच होण्यासारखी परिस्थिती होती!

हे किस्से सांगण्यामागचे तात्पर्य हे आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी थुंकतो म्हणजे काहीही गैर करत नाही, ही सर्वमान्य कृती आहे, अशी मानसिकता धारण करूनच ही माणसे चालत असतात. तू मुख्यमंत्री आहेस का हे विचारण्यामागे अर्थ असा की तू एक सर्वसामान्य नागरिक असशील तर माझ्या बेकायदा कृत्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार तुला नाही. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

– दीपक मच्याडो, वसई