नाशिकमध्ये पुढील वर्षी ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कुंभमेळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. दर एक तपाने नाशिकमध्ये भरणार्‍या कुंभमेळ्यासाठी सोयीसुविधा निर्माण करणे ही तशी नेहमीचीच प्रथा. नाशिकच्या बाहेर या तयारीची फारशी चर्चाही होत नसे. यंदा मात्र कुंभमेळ्याच्या तयारीची चर्चा जास्तच रंगत गेली. त्याची सुरुवात झाडे तोडण्यास झालेल्या विरोधाने झाली होती. कुंभमेळा हा धार्मिक उत्सव. त्याला विरोध कुणाचाही नाही. कुंभमेळा भव्य प्रमाणात साजरा व्हावा, तिथे कुणाची गैरसोय होऊ नये, याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही. प्रशासन, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग त्यासाठी आवश्यकच आहे. परंतु सध्या कुंभमेळ्याच्या तयारीवरून जी काही दैना झाली आहे व त्याचे वास्तव समोर येत आहे ते गंभीर आहे. वृक्षतोडीचा वाद हरित लवादात कायम आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात ठिकठिकाणी नागरी सुविधांची कामे प्रगतिप्रथावर आहेत, त्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यातून शहरात पावसात खड्ड्यांचे साम्राज्य बोकाळले. या खड्ड्यांमध्ये पडून आतापर्यंत सहा नागरिकांना हाकनाक जीव गमवावा लागला.

नाशिकसारख्या शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून सहा जणांचा बळी जातो ही खरोखरीच दुर्दैवी बाब. प्रशासनाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपने तिहेरी इंजिनचा किती प्रचार केला होता. ‘पालिकेची सत्ता हाती द्या, शहराचा चेहरामोहरा बदलू’, अशी मोठाली आश्वासने देण्यात आली होती. नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागे केली होती. नाशिककरांनी भाजपला भरभरून मते दिली. शहराची सत्ता भाजपला मिळाली. याच नाशिकची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे. याला जबाबदार कुंभमेळा प्राधिकरण की नाशिक महानगरपालिका हा वाद नेहमीप्रमाणे सुरू झाला. खड्ड्यांच्या साम्राज्यावरून मंत्री छगन भुजबळ तसेच शिंदे यांच्या शिवसेनेनेही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. रेंगाळलेल्या कामांमुळे खड्ड्यांपायी नागरिकांचा हाकनाक बळी गेला हे तर अधिकच गंभीर. शेवटी मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना कानपिचक्या द्याव्या. कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

यापेक्षा गंभीर बाब अशी की, कुंभमेळ्याच्या तयारीच्या कामातील गैरव्यवहारांचे प्रकरण पुढे आले. खोटी कागदपत्रे व बनावट स्वाक्षर्‍या यांतून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आल्याचे समोर आले. विविध कामे देण्याचे आमिष दाखवून ठेकेदारांकडून पैसे उकळण्यात आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. शेवटी निविदांची खातरजमा करूनच मगच कामे घेण्याचे आवाहन पोलिसांना करावे लागले. या गैरव्यवहाराचा म्होरक्या कुणी ‘महाजन’ असल्याने त्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरू झाले. रस्त्यांवर खड्डे, बनावट कागदपत्रे तयार करून कामांचे वाटप हे सारे गैरप्रकार उघडकीस आले.

कुंभमेळ्याच्या तयारीतील वृक्षतोडीवरून नाशिककरांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. राज्यकर्ते त्याची दखल घेण्यास तयार नाहीत. आता तर प्रस्तावित दर्शन पथाकरिता त्र्यंबकेश्वरमधील उपजिल्हा रुग्णालयाची इमारतच पाडण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी असलेले हे रुग्णालय आता चार कि.मी. लांब अंतरावर स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे रहिवाशांची गैरसोय होणार आहे. नागरिकांच्या गैरसोयीशी राज्यकर्त्यांना काहीही देणेघेणे दिसत नाही. आज रुग्णालय हलविले, उद्या एखादी शाळा मधोमध येते म्हणून त्यावर हातोडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर १२ वर्षांने येणारा कुंभमेळा ही खरे तर नाशिककरांसाठी पर्वणीच. कुंभमेळा यशस्वी झालाच पाहिजे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम होतात, तसेच आर्थिक उलाढाल वाढते. नांदेडमध्ये काही वर्षांपूर्वी साजरा झालेल्या शीख धर्मीयांच्या‘गुरु- दा- गद्दी’ उत्सवामुळे शहराचा पार कायापालट झाला होता. नाशिकचा असाच कायापालट करण्याची संधी आली आहे. पण खड्डे व त्यात नागरिकांचे गेलेले हकनाक बळी, कामातील गैरव्यवहार, रुग्णालय स्थलांतरित केल्याने रुग्णांचे संभाव्य हाल, बेसुमार वृक्षतोड अशा मानवी चेहरा हरपलेल्या प्रकारांमुळे नियोजनातला दंभ उघड होतो आहे. कुंभमेळा संस्मरणीय होण्यासाठी आधी हा ‘दंभमेळा’ आवरणे आवश्यक आहे.