महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अंतर्गत कारभारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष घालावे लागणार असे दिसते. हे खरे की अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट कधीच एकसंघ दिसला नाही. पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला. ज्येष्ठ नेत्यांची पद्धतशीरपणे मुस्कटदाबी करण्यात आली. जुन्याजाणत्या नेत्यांनी केलेला पत्रव्यवहार ग्राह्य मानू नये, असे पक्षाच्या वतीनेच निवडणूक आयोगाला कळवण्यापर्यंत नव्या नेतृत्वाची मजल गेली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांना पदाधिकार्‍यांच्या यादीत स्थान देण्यात आले नाही. अजित पवार यांच्या पश्चात पक्षाचे प्रमुखपद सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. पण पडद्यामागून पार्थ पवार हेच सारी सूत्रे हलवू लागले. पार्थ पवार आणि जुन्या नेत्यांत शीतयुद्ध सुरू झाले. शेवटी परवाच प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, तटकरे, हसन मुश्रीफ अशा काही निवडक नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी हा वाद नेला. ‘पक्षांतर्गत वाद मिटवून पक्षाचा कारभार करा’, असा सल्ला अमित शहा यांनी मित्रपक्षाला दिला.

राष्ट्रवादी अजित पवार गट हा स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष. भले तो भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असला तरी या पक्षाची घटना, विचारसरणी सारे काही वेगळे आहे. तरीही राष्ट्रवादीचा कारभार कसा चालवावा हा सल्ला अमित शहा देऊ लागले असल्यास हा पक्ष पूर्णत: भाजपच्या दावणीला बांधला गेल्याचेच द्योतक मानावे लागेल. खरे तर अजित पवार गटाच्या नेत्यांना मुंबईत एकत्र बसून पक्षांतर्गत वाद मिटविता आला असता. पार्थ पवारांनी जुन्या नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू केल्याने या नेत्यांनी अमित शहा यांना गळ घातली. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही नेहमी अमित शहा यांच्या दरबारी हजेरी लावत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फास आवळल्यावर शिंदे यांच्यासाठी अमित शहा हा हक्काचा आधार असतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तर शहा यांच्यापुढे अक्षरक्ष: लोळणच घातली. आमच्या पक्षात तुम्हीच सुधारणा करा, असे दुसर्‍या पक्षाच्या नेत्याकडे जाऊन विनवण्याची वेळ येते संबंधित पक्षाचे भवितव्य धोक्यात आले आहे, असाच अर्थ निघतो.

याउलट बिहारमध्ये भाजपने नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन मतदारसंघात संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेल्या दोन अपक्ष आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. पण तासाभरातच नवीन पत्रक काढून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही तर फक्त पाठिंबा दर्शवल्याची सारवासारव करण्यात आली. एकूणच भाजपने नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाची कळ काढली आहे. संयुक्त जनता दलाच्या विरोधात निवडून आलेला एक अपक्ष तर भाजपचा बंडखोर. या दोन आमदारांच्या भाजप प्रवेशावर संतापलेल्या संयुक्त जनता दलाने भाजपकडून खुलासा मागवला आहे. तो दिला जाईल का हे पाहायचे.

प्रादेशिक पक्षांचा वापर करून आपली ताकद वाढवायची हे भाजपचे जुने धोरणच. शिवसेना, अकाली दल, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद अशा पक्षांच्या कथा सर्वश्रुत आहेत. बिहारात संयुक्त जनता दलाबाबत तसाच प्रयोग बहुधा सुरू झाला असावा. राष्ट्रवादी अजित पवार गटाने सरळ सरळ भाजपपुढे नांगीच टाकली आहे. नितीश कुमार सक्रिय असेपर्यंत संयुक्त जनता दलाचा किमान निभाव लागू शकतो, पण महाराष्ट्रातील ‘आम्हीच खरा पक्ष’ म्हणवणार्‍यांना भाजपच्या वरिष्ठांपुढे नमते घ्यावे लागत आहे. उरतो प्रश्न असा की, अजित पवारांच्या पक्षाचे भवितव्य काय? ‘भाजप मित्र पक्षांचा नेहमीच सन्मान करतो’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे नेते नेहमीच करत असले तरी या सन्मानाची भाजप शैली महाराष्ट्र आणि बिहारच्या उदाहरणांतून दिसते.