नरेश म्हस्के
बिहारमधला विजय हा सत्तेसाठी नसून तत्त्वांसाठी एकत्र आलेल्या ‘एनडीए’च्या संघभावनेचा विजय होता. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, तेव्हा नाइलाजास्तव काही ठिकाणी वेगळी गणिते झाली तरीही ‘एनडीए’चेच महाराष्ट्रीय रूप असलेल्या ‘महायुती’मध्ये निकालाच्या दिवशी कोणतीही कटुता राहता कामा नये…
बिहारमधील विजय म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे यशस्वी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व घटक पक्षांच्या परस्पर मैत्री, विश्वास आणि सहकार्याचा विजय आहे. शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (‘एनडीए’च्या) प्रचारासाठी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावाती दौरा झाला.
खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सर्व एनडीए नेत्यांची मेहनत सार्थकी लागली. तर दुसऱ्या बाजूला पराभवाचे आकडे पाहिल्यावर महाराष्ट्रातील उबाठा नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. लगेचच काँग्रेसनेही उबाठावर टीका करण्याची संधी सोडली नाही. समान तत्त्व- विचारांनी एकत्र आलेल्या आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणि केवळ सत्ता उपभोगण्यासाठी मोठमोठ्या शब्दांचा दाखला देत एकत्र येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या टोळक्यात फरक आहे तो हाच. सत्तेचे लचके तोडण्यासाठी एकत्र आलेल्या श्वापदांची आणि यशस्वी सेनापतीच्या नेतृत्वातील चतुरंगिणी सैन्याची कधी तुलना होऊ शकते काय?
चोर दरोडेखोरांनी एकत्र येऊन एखादा खजिना लुटला तरी पहिली भांडणे वाट्यावरून होतात. बिहारच्या निकालानंतर उबाठा आणि काँग्रेसमध्ये जुंपली त्यामागील कारणही वेगळे नाही. ज्यांचा केंद्रीय निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांवर विश्वास नाही, जे राहुल गांधी सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्यांच्या नेतृत्वात बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार क्षणभरही मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत.
बाळासाहेब ठाकरेंना महाराष्ट्रातील ‘घुसपैठिये’ म्हणणाऱ्या लालूप्रसाद यादवांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे देव पाण्यात घालून बसले होते, हे चित्र विदारक आहे. ज्या लालूप्रसाद यादव यांनी रामजन्मभूमी मुक्तीसाठी निघालेली रथयात्रा अडवली, नरेंद्र मोदींसह लालकृष्ण अडवाणींना अटक केली त्या लालूप्रसाद यादवांच्या विजयाची स्वप्न पाहणारे खरे शिवसैनिक असूच शकत नाहीत. लालूप्रसाद यादवांचे गर्वहरण करण्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदेंनी बिहारमध्ये तळ ठोकला, याचा आम्हाला शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील सर्व पक्षांचा परस्परावर असलेला विश्वास अभेद्या आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भाजपचा नेता होता; तर भाजप कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जदयू, पासवान, कुशवाह. बिहारमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला विचारले की भाजपचे किती उमेदवार लढत आहेत तर उत्तर होते २४३, जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्याला विचारले की तुमच्या पक्षाचे किती उमेदवार लढत आहेत तर उत्तर होते २४३, लोक जनशक्ती पक्ष – चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, जितन राम मांझी आणि देशभरातील एनडीएचे सर्व घटक पक्ष यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकताही वेगळी नव्हती. संपूर्ण बिहारमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाचा उमेदवार लढतो आहे, या मानसिकतेने प्रत्येक कार्यकर्ता काम करत होता. एनडीएने एक टीम म्हणून काम करून विजयश्री खेचून आणली आहे.
भारताचे माननीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. भारतीय जनता पक्षाकडे स्वत:च्या मालकीचे कार्यालय असले पाहिजे, सुसज्ज कार्यालय असले पाहिजे या आग्रहापोटी अमित भाईंनी ‘बैसाखी’चा उल्लेख असलेले एक वाक्य उच्चारले.
सुसज्ज कार्यालय, पक्षाची व्यवस्था याबाबतीत आपल्या पक्षाने आत्मनिर्भर व्हायला हवे, या पोटतिडकीने अमितभाई कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. परंतु महाराष्ट्रातील संजय राऊत यांनी त्याबाबतचा संदर्भ बदलला. त्यानंतर मित्र म्हणजे कुबड्या नसतात, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते व बिहारच्या निवडणुकीत मैत्री, मित्रप्रेम कशाला म्हणतात याची निर्विवाद साक्ष एनडीए कार्यकर्त्यांनी दिली. प्रत्येक एनडीए कार्यकर्त्याच्या तोंडावर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे नाव होते.
बिहारमध्ये राहुल गांधींच्या कथित मतचोरीच्या रडगाण्याला मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवून चपराक दिली. एनडीएच्या पारड्यात ऐतिहासिक बहुमत टाकून मोदीविरोधकांची बोलती बंद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर जनतेने अतूट विश्वास दाखवला.
काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि त्यांचे मित्र पक्ष स्वत:चा पराभव पचवू शकलेले नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. सलग २० वर्ष सत्तेत असलेले नितीश कुमार निवडणुकांना सामोरे जात होते. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला ही निवडणूक अतिशय सोपी वाटली होती. भारतीय निवडणुकांचे शास्त्रोक्त विश्लेषण करणाऱ्यांनाही भाजप आणि नितीश कुमार सहज पराभूत होतील असे वाटत होते. बिहारच्या निकालांनी मात्र भारतातील जनतेचे नरेंद्र मोदींवर असलेले प्रेम दाखवून दिले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचे एकमेकांप्रति असलेले समर्पण बिहारच्या निवडणुकीत दिसले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व नेत्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नासमोर नतमस्तक होण्याखेरीज विरोधी पक्षांकडे पर्याय राहिला नाही. जेव्हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन, तेजस्वी यादव यांच्या प्रचारासाठी बिहारमध्ये आले तेव्हा दुसऱ्या बाजूला अण्णाद्रमुकचे कार्यकर्तेही तमिळनाडूहून एनडीएला विजयी करण्यासाठी बिहारमध्ये तळ ठोकून बसले होते. पराभवानंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना घरचा अहेर दिला आहे.
राजकीय स्पष्टता, युती आघाडीतील शिस्त आणि कल्याणकारी योजनांमुळे निवडणुकांचा निकाल लागतो, असे एम. के. स्टालिन म्हणाले आहेत. ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर तरी राहुल गांधी आत्ममग्नतेतून बाहेर येतील का, हा प्रश्नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यशस्वी नेतृत्व, गृहमंत्री अमित शाह यांच्या समन्वयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांचा परस्परांवरील विश्वास अधिक दृढ होतो आहे. प्रत्येक निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडी एक टीम म्हणून लढते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रत्येक पक्ष संघटित भावनेने काम करतो.
बिहारमधील भाजपच्या विजयाचे मराठमोळे शिल्पकार विनोद तावडे यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप, नितीश कुमार, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, जीतन राम मांझी म्हणजे पाच पांडव होते. पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केला. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपची मैत्री म्हणजे राम लक्ष्मणाचे आणि श्रीकृष्ण बलरामाचे बंधुप्रेम आहे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीप्रमाणे आमचे जे विरोधक विश्वासघातकी आहेत त्यांना विश्वासघाताची स्वप्ने पडतात.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी व शिवसेना भाजपसह सर्वच घटक पक्ष एकमेकांना सोबत घेऊन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वार्थापोटी खुर्चीसाठी एकत्र आलेल्यांमध्ये एकमेकांप्रति विश्वास नसतो, भांडणतंटे असतात तर काही समान ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून उदात्त हेतूने एकत्र आलेले लोक इतिहास घडवतात आणि समाजाचेही कल्याण करतात.
समान वैचारिक तत्त्व स्वीकारून शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा नेण्यासाठी, या देशातील प्रत्येकाला त्याचा स्वाभिमान मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भगीरथ प्रयत्न अविरत सुरू आहेत. हे प्रयत्न अधिक प्रभावीपणे कसे करता येतील, यावर मतमतांतरे असू शकतात; पण त्यात कधीही ध्येयाचा विसर पडत नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. आगामी निवडणुका नेत्यांच्या नाही कार्यकर्त्यांच्या आहेत.
महायुती एकसंध लढली पाहिजे. नाइलाजास्तव काही ठिकाणी वेगळी गणिते झाली तरीही निकालाच्या दिवशी कोणतीही कटुता राहता कामा नये. प्रत्येकजण जसा पक्षाचा कार्यकर्ता आहे तसाच तो व्यापक परिप्रेक्ष्यात एनडीएचा घटक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. निवडणुकांमधील विजय हे साध्य नसून साधन आहे. भारतातील मतदार राजा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सदैव आशीर्वाद देत राहील, हा विश्वास अधिक दृढ झाला.
खासदार(ठाणे लोकसभा मतदार संघ-शिवसेना)
