श्रीरंजन आवटे

महायुद्ध, मुसोलिनीचा फॅसिझम, कोरियन युद्ध, अणुऊर्जा यांबाबत वेळीच स्पष्ट भूमिका घेऊन नेहरूंनी वैश्विक दृष्टी स्पष्ट केली होती..

Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
disagreement between joe biden benjamin netanyahu marathi news
विश्लेषण: गाझावरून अमेरिका-इस्रायल मैत्री संपुष्टात येईल का? यूएन ठरावातून स्पष्ट संकेत?
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

प्रिय नेहरू,

‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे तुमचं भन्नाट पुस्तक वाचलं. माझ्यासारख्या पाश्चात्त्य माणसाला या पुस्तकाचा पूर्वार्ध समजून घेणं जड गेलं. मात्र त्यातून तुमच्या देशाचा वैभवशाली बौद्धिक आणि आध्यात्मिक वारसा समजावून घेता आला. पुस्तकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांचं वर्चस्व त्यातून झालेला बौद्धिक, नैतिक आणि आर्थिक ऱ्हास यासह ब्रिटिशांनी भारतीय लोकांचं केलेलं शोषण या संदर्भातल्या तुमच्या विश्लेषणाने मी प्रभावित झालो. असहकार आणि अहिंसा याद्वारे देशाला मुक्तिदायी वाटेवर नेण्याबाबतच्या तुमच्या आणि गांधींच्या कामाबाबतचा आदर द्विगुणित झाला.

सस्नेह,

अल्बर्ट आइनस्टाइन

अल्बर्ट आइनस्टाइन यांचं हे १९५० सालचं पत्र आहे. त्याआधीही नेहरू-आइनस्टाइन पत्रसंवाद झालेला आहे. १९४७ साली लिहिलेल्या पत्रात नेहरू आइनस्टाइन यांना अस्पृश्यतेच्या प्रथेविषयी लिहितात. या प्रथेचं निर्मूलन करण्याबद्दल भारत करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केलेलं होतं. नेहरू याबाबत सांगताना, हिटलरने ज्यू समुदायाच्या केलेल्या वंशविच्छेदाचा निषेध करतात, युरोपीय सभ्यतेविषयी शंका उपस्थित करतात आणि ज्यूंविषयी सहानुभूती व्यक्त करतात. पुढे पॅलेस्टाइन प्रश्नाविषयी चर्चा करताना ज्यू अरबांवर करत असलेल्या अन्यायाचा संदर्भ देत नेहरू ज्यूंवर टीकाही करतात. ‘व्हाय सोश्ॉलिझम?’ सारखा निबंध लिहिणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाइनसोबतचा नेहरूंचा पत्र-संवाद हा विसाव्या शतकातला अमूल्य ठेवा आहे. 

हिटलरच्या नाझी पार्टीच्या भीषण क्रौर्याचा निषेध नेहरूंनी अनेकदा केलेला होता. एवढंच नव्हे तर याविषयी आपल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सावध केलेलं होतं. रा.स्व.संघ नाझींच्या धर्तीवर वाढत असल्याबाबत सतर्क केलं होतं. मुसोलिनीसोबतची भेट नेहरूंनी नाकारली होती आणि स्पेनचा हुकूमशहा जनरल फ्रॅन्कोच्या विरोधात असलेल्या डाव्या चळवळीला पाठिंबाही दिला होता. १९३६ सालच्या काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी स्पेनमध्ये माजलेल्या यादवीबाबत चिंता व्यक्त करतानाच, ‘राष्ट्रसंघाने (लीग ऑफ नेशन्स) याप्रकरणी हस्तक्षेप केला नाही,’ या संदर्भात टीका केलेली आहे.

एका बाजूला फॅसिझम, हुकूमशाही या प्रवृत्तींना विरोध करत असतानाच ब्रिटिशांसारख्या साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधात तर नेहरूंचा थेट लढा सुरू होता. १९२७ सालच्या मद्रास काँग्रेसमध्ये नेहरू म्हणतात, सध्या युरोपात प्रचंड भीतीचं आणि द्वेषाचं वातावरण आहे. भीतीमुळे द्वेष निर्माण होतो आणि द्वेषातून हिंसा आणि रानटीपणा जन्म घेतो. मला आताचा युरोप हा १९१४ हून अधिक प्रमाणात युद्धासाठीचं आगार आहे, असं वाटतं. हे सांगून ब्रिटिशांनी भारताला युद्धात लोटू नये, असं विधान नेहरू करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातही आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात नेहरू स्वत:कडे, भारताकडे पाहतात.

नेहरूंचं युद्धाबाबतचं म्हणणं किती खरं ठरलं हे १९३९ साली उदभवलेल्या दुसऱ्या महायुद्धावरून लक्षात येतंच. त्या वेळी महायुद्धाच्या उंबरठय़ावर असताना नेमकी काय भूमिका घ्यायची असा पेच निर्माण झालेला दिसतो. या निर्णायक क्षणी नेहरूंचं आंतरराष्ट्रीय भान आणि अंतर्दृष्टी किती प्रगल्भ होती, याचा पुरावाच आपल्याला मिळतो. सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे नेते जेव्हा ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ अशा आकलनातून अक्ष राष्ट्रांशी युती करून ब्रिटिशांना आव्हान देत होते तेव्हा फॅसिझम आणि साम्राज्यवाद या दोहोंचा तरतमभावाने विचार करत नेहरू ब्रिटिश साम्राज्यवादाला धोरणी विरोध करत ‘चले जाव’च्या चळवळी करतानाच तहाच्या दिशेने जात भारतीय स्वातंत्र्याची वाट प्रशस्त करतात. बोस यांचा प्रयत्न किती प्राणघातक होता हे जपानने अंदमान काबीज केल्यानंतर घडवलेल्या नरसंहारातून लक्षात येते. बोस आणि नेहरू यांचे दुसऱ्या महायुद्धाच्या परिप्रेक्ष्यात ब्रिटिशांशी लढण्याच्या मार्गाबाबत मतभेद असले तरी बोस यांनी स्थापन केलेल्या पलटणींना त्यांनी गांधी, नेहरूंची नावं दिलेली होती आणि बोसांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांच्या बचावार्थ युक्तिवाद करणारे वकील नेहरूच होते !

स्वातंत्र्यानंतरही नेहरूंच्या या वैश्विक दृष्टीचा प्रभाव आणि परिणाम दिसतो. कोरियाच्या पेचप्रसंगातून नेहरूंचं द्रष्टेपण ध्यानात येतं. दुसऱ्या महायुद्धातल्या पराभवानंतर जपानचा कोरियावरील कब्जा संपुष्टात आला; मात्र कोरियाच्या उत्तर भागावर रशियाचे तर दक्षिण भागावर अमेरिकेचं वर्चस्व होतं. १९४८ साली उत्तर आणि दक्षिण कोरिया अशी विभागणी झाली. मात्र सीमारेषेवरील वादावरून १९५० साली उत्तर कोरियाने आक्रमण केल्याने युद्ध सुरू झालं. जपान, चीन, रशिया आणि अमेरिका अशा बलाढय़ सत्ता या प्रकरणात थेट गुंतल्या होत्या. अशा वेळी नव्याने स्वतंत्र झालेला भारत अवघा तीन वर्षांचा. भारताने कोणत्याच गटात सामील न होता दोन्ही बाजूच्या जखमी सैनिकांसाठी वैद्यकीय पथक पाठवले. कोरियाच्या भूभागामध्ये कोणताही लाभ किंवा धोरणी हित नसतानाही भारताने याप्रकरणी निर्णायक भूमिका पार पाडली.

पं. नेहरूंनी सुरुवातीला अमेरिकेच्या हस्तक्षेपावर टीका केली. चीनने हे प्रकरण वाढवू नये, याकरता प्रयत्न केले. तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगी असू शकते आणि असं युद्ध हे कोणालाच परवडणारं नाही, याची जाण नेहरूंना होती. संयुक्त राष्ट्राला (युनायटेड नेशन्स) याप्रकरणी जलद गतीने निर्णय देण्यास भाग पाडलं. रशिया, चीन यांचा रोष पत्करून दुसरीकडं अमेरिकेलाही सुनावत शांततापूर्ण तहाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यात नेहरूंची भूमिका लक्षणीय ठरली आणि १९५३ ला हे युद्ध थांबले. या संदर्भातला तह शांततेत पार पडावा याकरता तटस्थ राष्ट्रांचा जो आयोग संयुक्त राष्ट्राने गठित केला त्यामध्ये स्वीडन आणि स्वित्र्झलड अमेरिका-प्रणीत गटाचे प्रतिनिधित्व करत होते तर पोलंड आणि झेकोस्लोव्हाकिया रशिया-प्रणीत गटाचे प्रतिनिधित्व करत होते. संयुक्त राष्ट्राने नेमलेल्या या आयोगाचा अध्यक्ष होता नव्याने स्वतंत्र झालेला (हा देश टिकणार की नाही, अशी संभावना केला गेलेला) भारत! रॉबर्ट बार्नस या ब्रिटिश इतिहासकाराने २०१३ साली ‘जर्नल ऑफ कोरियन स्टडीज’ या नियतकालिकात नेहरूंच्या लक्षणीय, निर्णायक भूमिकेबाबतची सप्रमाण मांडणी केली आहे.

कोरियाच्या या पेचप्रसंगातला मुत्सद्दीपणा ही नेहरू मांडत असलेल्या अलिप्ततावादाची एक प्रकारे ‘लिटमस टेस्ट’ होती. यात नेहरू उत्तीर्ण झालेच शिवाय काही प्रमाणात तिसऱ्या जगातल्या देशांची मोट बांधत जागतिक व्यवस्थेला पर्यायी रचना देण्याचा प्रयत्नही त्यातून आकाराला आला. ‘महासत्ता’ बनण्याची ना त्यांची इच्छा होती ना ‘विश्वगुरू’ बनण्याची.  मात्र जगातले महत्त्वाचे नेते म्हणून त्यांचा उदय झाला. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावर प्रतिमा नक्कीच उंचावली. 

गमाल अब्दुल नासेर (इजिप्त), मार्शल टिटो (युगोस्लाविया) यांसारख्या नेत्यांसमवेत अलिप्ततावादाची चळवळ पुढे नेत असतानाच आशियाई राष्ट्रांची आघाडी उघडून रशिया-अमेरिका या ध्रुवांमध्ये अडकलेल्या जगासमोर नवी पर्यायी रचना उभी करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. अर्थात या पर्यायी रचनेतही जागतिक शांतता हेच त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीच आयसेनहॉवरसोबत भेट घेणारे आणि स्वातंत्र्यानंतर आण्विक ऊर्जा आयोगाची स्थापना करणारे नेहरू अण्वस्त्रप्रसाराला विरोध करतात आणि जागतिक स्थैर्य, शांतता याकरता आग्रही राहतात. यातूनही नेहरू केवळ स्वप्नाळू, रोमँटिक प्रकारे पाहात नव्हते तर वास्तवाची नेमकी जाण त्यांना होती, हे लक्षात येते. चीनसोबतही ‘पंचशील’ करार करतानाही नेहरूंची हीच उदार, व्यापक भूमिका होती. पुढे चीनसोबतच्या त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं असलं तरी त्यामुळे प्रयत्नांमागच्या भूमिकेचं मोल कमी होत नाही.

शांततेच्या दिशेने..

फॅसिझम, हुकूमशाहीला नकार, साम्राज्यवादाला विरोध, वसाहतवाद-विरोधी देशांची आघाडी उभारण्याचा प्रयत्न, संयुक्त राष्ट्रांना अधिकाधिक उत्तरदायी बनवण्याचा प्रयत्न, युद्धाला टाळत, अण्वस्त्रप्रसाराला विरोध करत जागतिक शांततेचा पुरस्कार करण्याची भूमिका या सगळय़ातून नेहरूंची आंतरराष्ट्रीय दृष्टी समजून घेता येते.

वरील सर्व उदाहरणांमधून नेहरूंच्या आस्थेचा परीघ वैश्विक होता, हे सहज लक्षात येते. नोबेलसाठी अनेकदा नामांकन होऊनही केवळ गांधींनाच नव्हे तर नेहरूंनाही हा सन्मान प्राप्त झाला नाही, हे खरं असलं तरीही त्यांचं काम कोणत्याही सन्मानाहून मोठं आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मधून भारताचा शोध, ‘ग्लिम्प्सेस ऑफ वल्र्ड हिस्ट्री’ तून भारतीय चष्म्यातून जगाचे आकलन आणि या सगळय़ातून भविष्याचा वेध, त्यामुळे त्रिकालवेधी हे विशेषण नेहरूंसाठी यथार्थ आहे. त्रिकालवेधी दृष्टी आणि वैश्विक भान या दोन्हीमधून मांडलेला नेहरूंचा विचार जगाला जोडत शांततेच्या दिशेने जाणारा होता. बुद्धाचं बोट पकडून नेहरूंनी केलेली ही ‘विश्व जोडो यात्रा’ नव्या जगाचं स्वप्न पाहणारी होती. देशांच्या काटेकोर सीमारेषांना भेदत शांततेचं पसायदान मागणारी होती. त्यात त्यांना आलेलं यश मर्यादित होतं, हे खरं असलं तरी हा जोडण्याचा प्रयत्न लक्षणीय, लक्षवेधक होता. जोडण्याचे प्रयत्न सर्वानाच तारणारे असतात, हे या निमित्तानं लक्षात ठेवायला हवं.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन करतात. 

poetshriranjan@gmail.com