दुखणी मानसिक असू शकतातच, पण नेहमी तसंच असेल असा अंदाज बांधणं ‘कीआरी मालफॉर्मेशन’सारख्या आजारांबाबत चुकू शकतं..

डॉ. जयदेव पंचवाघ

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?
Budaun murder
“चकमकीत ठार झाला हे योग्यच झालं”, दोन मुलांची गळा चिरून हत्या करणाऱ्या साजिदच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया

‘‘डॉक्टर तुम्ही मला त्या दिवशी तपासलं नसतं तर मी आत्तापर्यंत वेडय़ाच्या इस्पितळात भरती झाले असते..’’ रोहिणी मला सांगत होती आणि तिचं म्हणणं तंतोतंत खरं होतं. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा ती नवऱ्याबरोबर मला भेटायला आली होती, ती घटना मला आठवली. त्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये मी राऊंड घेताना माझी विद्यार्थ्यांशी चर्चा चालली होती. ‘शारीरिक वाटणाऱ्या पाठदुखीचं कारण कधी कधी मानसिक कसं असू शकतं, याविषयी बोलणं चाललं होतं. त्याच वेळी मी हे नमूद केलं की, ‘व्यक्तीची संपूर्ण तपासणी केल्याशिवाय आपण एखाद्याच्या वेदनेचा उगम मानसिक द्वंद्वात आहे असा निष्कर्ष कदापि करता कामा नये.’ योगायोगानंच म्हणावं लागेल, पण अगदी त्याच दिवशी रोहिणी माझ्या क्लिनिकमध्ये प्रथम आली. रोहिणीचा नवरा शेखर तिला घेऊन आला होता. शेखरनेच रोहिणीबद्दल सांगायला सुरुवात केली.. ‘‘डॉक्टर, गेल्या चार वर्षांपासून हिला मान दुखण्याचा त्रास होतो आहे. डोक्याच्या मागच्या भागापासून ते खांदे व पाठीच्या मध्यापर्यंत दुखणं पसरतं. दुखायला लागले की अगदी कासावीस होऊन वेडय़ासारखी वागते..’’ मी रोहिणीकडे नीट बघितलं. साधारण तीस वर्षांच्या या स्त्रीच्या चेहऱ्यावर मला कुठेही चिंता करणारा किंवा कुढणारा स्वभाव दिसत नव्हता. ती शांतपणे म्हणाली, ‘‘डॉक्टर, मला होणारं दुखणं खरं आहे. अनेक डॉक्टरांकडे मी गेले आहे आणि प्रत्येक जण मला कसे ‘मानसिक टेन्शन आहे’ आणि या लक्षणांना काही अर्थ नाही हे समजावून थकला आहे. माझ्या नवऱ्याचंसुद्धा हळूहळू हेच मत झाले आहे. मी वेडी आहे असे त्याला वाटतं. पण मी तुम्हाला सांगते की मला खरंच काहीतरी शारीरिक आजार आहे..’’ ..तेव्हा शेखरच्या चेहऱ्यावर, ‘पाहिलं? आता तुम्हीच बघा’ असा भाव होता. परिस्थिती ‘गंभीर’ होती.

अशा वेळी पेशंटची कहाणी नीट आणि पूर्वग्रह न ठेवता ऐकणं महत्त्वाचं असतं. ‘‘रोहिणी तुला इतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते क्षणभर विसरून जा आणि अगदी मोकळय़ा मनाने माहिती सांग..’’ मी म्हणालो. ‘‘डॉक्टर चार ते पाच वर्षांपूर्वीपासून हा त्रास आहे. डोक्याच्या मागचा भाग, मान आणि खांदे अचानक दुखून येतात. दुखणं सुरू झालं की या भागात मुंग्यापण येतात. जोरात शिंक आली किंवा खोकला आला तर हे दुखणं सुरू होतं. मानेचे स्नायू कडक होतात. कधी कधी शिंका आल्यावर चेहरा, मागचं डोकं व हातापायात मुंग्या येतात आणि त्या काही काळ टिकतात.’’ रोहिणी मला तिला होत असलेला त्रास सांगत होती.. ‘‘खरं तर गेल्या सहा महिन्यांत कधी कधी चालतानासुद्धा पाय अडखळतात.. पण गेल्या काही दिवसांत नवीन कोणतीही तक्रार सांगायला मी घाबरत होते. विशेषत: मागच्या आठवडय़ात जेव्हा दिवे गेले होते तेव्हा चालताना माझा चांगला झोक जात होता.’’ रोहिणीला आता थोडाफार धीर आला होता. ‘‘आणखी एक गोष्ट, हल्ली जेव्हा ठसका किंवा शिंक आल्यावर मानेत कळ येते, तेव्हा घाम येऊन घाबरल्यासारखं होतं..’’  या तिच्या कथनाच्या पार्श्वभूमीवर मी तिची तपासणी केली. तपासताना माझ्या लक्षात आलं की तिच्या दोन्ही हाता-पायातील ‘रिफ्लेक्स’ ‘ब्रिस्क’ आहेत व डाव्या तळव्याचा ‘प्लांटर रिफ्लेक्स’ गडबडलेला आहे. या दोन्ही तपासण्या मज्जारज्जूच्या अगदी वरच्या भागात दाब असल्याचे सूचित करतात. त्यानंतर मी तिला तोंड उघडायला सांगून तिच्या घशातला रिफ्लेक्स बघितला (अन्न, पाणी गिळण्यासाठी ज्या नसा आवश्यक असतात, त्या या चाचणीत तपासल्या जातात.). रोहिणीच्या डाव्या बाजूच्या अन्न गिळण्याच्या नसा नीट काम करत नव्हत्या.

अर्थात याचा तिला अजून तसा त्रास जाणवला नव्हता, पण तिचं एकूण कथन आणि मी केलेली तपासणी विचारात घेऊन एकच निदान मला स्पष्ट दिसायला लागलं, ‘कीआरी मालफॉर्मेशन’.. हा आजार खरंतर जन्मजात दोषामुळे झालेला असतो. आपला लहान मेंदू (सेरेबेलम) हा कवटीच्या अगदी खालच्या भागात असतो. या भागाच्या तळाला एक छिद्र असतं ज्याला ‘फोरमेन मॅग्नम’ (मोठं छिद्र) म्हणतात. या छिद्रातून मेंदूचा ‘मेडय़ूला’ हा एखाद्या झाडाच्या बुंध्यासारखा भाग बाहेर पडतो व मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) म्हणून मणक्यात प्रवेश करतो. या भागाला क्रेनिओ (कवटी) व्हर्टिब्रल (मणक्याचा) जंक्शन (जोड भाग) म्हणतात. या विशिष्ट आजारात लहान मेंदूचा खालचा भाग (टॉन्सिल्स) मोठय़ा छिद्रातून खाली येतो व मज्जारज्जूच्या या अतिशय नाजूक भागावर दाब निर्माण करतो. वय वाढेल तसा हा दाब वाढत जातो व लक्षणं दिसू लागतात. किआरीच्या आजाराची लक्षणं सुरुवातीला विचित्र असू शकतात. उदाहरणार्थ शिंकल्यावर डोक्यात, मानेत कळ येणं, घाम येणं, घाबरल्यासारखं वाटणं, हातापायात करंट येणं इत्यादी. या आजाराचा वैद्यकीय शास्त्राला उलगडा होण्याआधी या रुग्णांना ‘मानसिक रुग्ण’ समजलं जाई. कधी कधी नातेवाईकांचं मत, इतर डॉक्टरांची मतं, तुमचं पेशंटबद्दलचं वरकरणी झालेलं मत, या गोष्टी तुमचं निदान चुकवू शकतात, पूर्वग्रहदूषित करू शकतात. अशा वेळी स्वत:च्या तर्कशक्तीवर लक्ष पूर्ण केंद्रित करणं आवश्यक असतं. रोहिणीच्या आजाराचं पक्कं निदान करण्यासाठी एमआरआयची गरज होती. त्यामुळे कवटी व मणक्याच्या ‘जंक्शन’चा एमआरआय करायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी रोहिणीचा एमआरआय झाल्यावर ‘किआरी मालफॉर्मेशन’ अगदी स्पष्टपणे दिसत होतं. तिला मानसिक नव्हे तर शारीरिक आजार होता. या आजारात ऑपरेशन करून दाब काढण्याची गरज असते. कवटीचा मागचा भाग, मानेचा पहिला व दुसरा मणका या भागात हा दाब असतो. आपला आजार हा मानसिक नसून शारीरिक आहे, ऑपरेशननं बरा होण्यासारखा आहे हे ऐकून रोहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. ऑपरेशनचा सल्ला दिल्यावर आनंदित झालेला रुग्ण मी पहिल्यांदाच पाहिला. या शस्त्रक्रियेत मणक्यात उतरलेला लहान मेंदू व मज्जारज्जू यांना त्यावरचा दाब काढून मोकळं करणं आणि कवटीच्या खालच्या मागच्या भागातील जागा वाढवणं असा उद्देश असतो. रोहिणीची शस्त्रक्रिया नेहमीपेक्षा थोडी अधिक कठीण होती, कारण कवटीतल्या छिद्राचा आकारच जन्मजात लहान होता.

पण ही शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. ऑपरेशननंतर तिसऱ्या दिवशी रोहिणी हॉस्पिटलच्या आवारात चालत असताना मी तिला भेटलो तेव्हा ती म्हणाली, ‘‘डॉक्टर दोन गोष्टी – एक म्हणजे चालताना मला चांगलाच आत्मविश्वास आला आहे आणि डोक्यात अचानक येणारी कळ त्याबरोबर येणारा घाम आणि छातीवरचं दडपणसुद्धा कमी झालं आहे.’’ पाठीची- किंवा खरंतर इतरही काही प्रकारची दुखणी कधी कधी मानसिक ताणामुळे असू शकतात हे खरं आहे. मी त्याविषयी लिहिलंसुद्धा आहे, पण कधी कधी अक्षरश: मानसिक वाटावीत अशी दुखणी शारीरिक असू शकतात हेसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ‘फारच टेन्शन घेते’, ‘ड्रामा किंग आहेत’ अशा प्रकारची बिरुदं लावण्याआधी डोळसपणे तपासणी करणं कधी-कधी आवश्यक असतं या शक्यतेची जाणीव करून देण्यासाठी हा लेख.

माझ्या काही वर्षांच्या अनुभवात अशा प्रकारची घटना घडू शकणारे इतर आजार म्हणजे काही प्रकारच्या मेंदूच्या गाठी (ब्रेन टय़ूमर), ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हेमिफेशिअल स्पाझम, मानेच्या मज्जारज्जूवरच्या दाबानं झोकांडय़ा जाणं (या सर्व आजारांबद्दल मी या वर्षांत गेल्या काही लेखांमध्ये सविस्तर लिहिलं आहे). हे आजार शंभर टक्के शारीरिक आहेत आणि न्यूरोसर्जरीनं बरे होऊ शकतात.

या लेखमालेच्या सर्वात शेवटी जर मला असं कोणी विचारलं की, चेतासंस्थेबद्दलची सर्वात महत्त्वाची अशी कोणती एकच गोष्ट समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे?

मला वाटतं सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे ‘एकदा नाहीशा झालेल्या चेतापेशी बहुतांशी वेळा नव्याने तयार होत नाहीत.’  स्पायनल कॉर्ड म्हणजेच मज्जारज्जूवरचा दाब असो किंवा मेंदूतला रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे होणारा ‘स्ट्रोक’ असो.. चेतासंस्थेच्या आजारांमध्ये ‘वेळे’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे  त्यामुळे या आजारांमध्ये ‘त वरून ताकभात’ समजणारा आणि ‘शितावरून भाताची परीक्षा’ करू शकणारा डॉक्टर तर असायला हवाच, पण त्यांनी दिलेला सल्ला एक रुग्ण म्हणून वेगाने अमलात आणणारा प्रगल्भ रुग्णसुद्धा हवा.

आधीच चेतासंस्थेच्या अनेक आजारांमध्ये आजही अगदी रामबाण उपाय नाहीत. उदाहरणंच घ्यायची झाली तर प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग (मोटर न्यूरॉन डिसिझ), ख्रिस्तोफर रीव्हज् हा सुपरमॅनची भूमिका करणारा नट (मज्जारज्जूला इजा), मायकेल शूमाखर (मेंदूची इजा).. तिघेही प्रगत राष्ट्रांत राहाणारे, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध असलेले लोक! तरीही बरे होऊ शकले नाहीत; कारण मरण पावलेल्या किंवा झडून गेलेल्या चेतापेशी पुन्हा तयार होत नाहीत. म्हणूनच चेतासंस्थेचे जे आजार गंभीर रूप धरण्याआधी उपचार करून बरे होऊ शकतात त्यात ‘वेळे’ला फार महत्त्व आहे हे लक्षात ठेवावं हे उत्तम!

 (ही लेखमाला या लेखासह समाप्त होत असली, तरी मेंदू व मणक्याचे आजार, नवीन संशोधन, भविष्यातील शक्यता या विषयांसबंधी प्रत्येक आठवडय़ात लोकशिक्षण करणारे व्हिडीओ ‘Dr Jaydev Panchwagh’ या यूटय़ूब चॅनेलवर पाहता येतील.)