चेतासंस्थेच्या विशिष्ट भागावरल्या उपचारांपैकी औषधे तीच राहिली पण शस्त्रक्रियांची तंत्रे सुधारली..

डॉ. जयदेव पंचवाघ

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

मेंदू व मणक्याच्या काही आजारांमध्ये विशिष्ट शस्त्रक्रिया ही औषधांपेक्षा अधिक उपयुक्त कशी ठरू शकते या विचाराचा मागोवा घेण्यासाठी हा लेख आहे. हा लेख लिहिण्यामागचं कारण म्हणजे याबद्दल बरंच अज्ञान फक्त जनसामान्यांमध्येच नाही तर इतर विषयांच्या डॉक्टरांमध्येसुद्धा आढळतं.

बऱ्याच वेळेला औषध देणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा विशिष्ट शस्त्रक्रियेचं प्रगत तंत्रज्ञान आणि तिच्या उपयुक्ततेबद्दल संपूर्ण माहिती असतेच असं नाही. ‘‘औषधांचा उपयोग झाला नाही तर शस्त्रक्रियेचं बघू’’, ‘‘शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय आहे’’..  ‘‘शस्त्रक्रियेत फारच धोके असतात’’.. असे सल्ले किंवा, ‘‘कशाला चिरफाड करायची आहे त्यापेक्षा औषध घेत राहा’’, ‘‘आमच्या शेजारच्यांच्या मावशीच्या मानलेल्या भावाची मणक्याची शस्त्रक्रिया दिल्लीला जाऊन केली पण फेल झाली बरं का! तू आपला औषध आणि व्यायामावरच राहा.’’ – अशी उपदेशपर वाक्यं त्यांना वारंवार कशी ऐकावी लागतात, असं रुग्ण मला सांगत असतात .

सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया ही आजार गंभीर झाल्यावरच करावी असा सूर समाजात आणि औषध देणाऱ्या काही डॉक्टरांमध्ये दिसतो. कोणाचं काहीही वैयक्तिक मत असलं तरी शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीचं स्थान नेमकं काय आहे आणि त्याकडे नेमकं कसं बघायला हवं हे आजच्या परिस्थितीच्या संदर्भात नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गेल्या दहा एक वर्षांत सुधारित तंत्रज्ञानामुळे योग्य प्रकारे केल्या गेलेल्या शस्त्रक्रियांची उपयुक्तता आणि परिणाम यांत अनेक पटींनी सुधारणा झाली आहे याचा संदर्भसुद्धा डोक्यात ठेवणं गरजेचं आहे.

विशेषत: ज्या आजारांवर प्रलंबित काळासाठी औषध लागतात आणि ही औषधं मूळ आजार दूर न करता फक्त आजारांच्या लक्षणांवर उपाय करत राहतात अशा आजारांमध्ये शस्त्रक्रियेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र आजाराचं मूळ कारण दूर करू शकणारी समर्थ शस्त्रक्रिया उपलब्ध हवी. उदाहरणार्थ चेहऱ्याच्या नसेचं तीव्र दुखणं किंवा ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजाराचं विस्तृत वर्णन मी खरंतर आधीच्या लेखांमध्ये केलेलं आहे रुग्णाचं आयुष्य पूर्ण बदलून टाकणारा असा हा गंभीर वेदनांचा आजार; याचं मूळ बहुतांशी वेळा मेंदूमध्ये खोलवर असतं. ट्रायजेमिनल नस ज्या ठिकाणी मेंदूतून बाहेर पडते अगदी त्याच ठिकाणी रुतून बसलेल्या रक्तवाहिनीच्या स्पंदनांचा दाब नसेवर पडल्यामुळे हा आजार होतो, हे आपण पाहिलं होतं. हा दाब मायक्रोस्कोप आणि एन्डोस्कोप वापरून करण्यात येणाऱ्या ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रियेनं दूर करता येतो आणि त्यामुळे ही जीवघेणी कळ कायमची नाहीशी होते. ही शस्त्रक्रिया अस्तित्वात येऊन परिपूर्ण अवस्थेत येण्यापूर्वी, नसा बधिर करणारी औषधं या आजारासाठी दिली जायची, तीच आजही दिली जातात. या औषधांना अर्थातच हे माहीत नसतं की फक्त या विशिष्ट नसेलाच बधिर करायचं आहे त्यामुळे संपूर्ण चेतासंस्था बधिर होते. विस्मरण होणं, तोल जाणं, अति झोप किंवा ग्लानी येणं, यकृतावर गंभीर परिणाम होणं, रक्तपेशींवर परिणाम होणं.. हे व इतर दुष्परिणाम अनेक महिने किंवा वर्ष घेत गेलेल्या औषधांमुळे वाढत जातात. हा आजार तर मुळापासून दूर होत नाहीच पण त्याची तीव्रता आणि औषधाची मात्रासुद्धा वाढत जाते. आयुष्याच्या संपूर्ण दर्जावरच याचा परिणाम होतो.

सांगायचा मुद्दा असा की, अशा प्रकारच्या आजारात शस्त्रक्रिया उपलब्ध असेल व ती योग्य पद्धतीनं- काटेकोरपणा आणि कौशल्यानं- केली गेली तर तिच्यात असे आजार मुळासकट दूर करण्याची क्षमता असते. फक्त वेदना किंवा इतर कारणांसाठीच नव्हे तर औषधांचे दुष्परिणाम शरीरावर कायमचे होऊ नयेत यासाठीसुद्धा या शस्त्रक्रियेचा योग्य वेळेला विचार करण्याची गरज असते, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

शस्त्रक्रियांमध्ये काही धोके असू शकतात हे खरं आहे. तसं पाहू गेलं तर धोकामुक्त असलेली कुठलीही उपचार पद्धती माझ्या ऐकिवात नाही. आयुष्य सुरळीत चालण्यासाठी, त्याचा दर्जा अबाधित राखण्यासाठी काही धोके पत्करावे लागतात. वर्षांनुवर्ष मज्जासंस्था औषधांनी बधिर करून जगायचं की कायमचं बरं होण्याचा उद्देश ठेवायचा याचं उत्तर नीट विचार करून ठरवणं गरजेचं आहे.

दुसरें उदाहरण एपिलेप्सी किंवा अपस्मराच्या आजाराचं. एपिलेप्सी या आजारात काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून झटके येणं पूर्णपणे थांबू शकतं किंवा त्या झटक्यांची तीव्रता आणि संख्या खूपच कमी करता येऊ शकते. विशेषत: लहान मुलांना होणाऱ्या एपिलेप्सीच्या आजारात हे निश्चितपणे खरं आहे. मेंदूच्या ज्या भागापासून झटके सुरू होतात तो भाग आणि त्याच्या आजूबाजूचे भाग यांची रचना विशिष्ट रुग्णांमध्ये नेमकी कशी आहे याची माहिती ‘एमआरआय’ चित्रांकन करून निश्चित करता येते. 

शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतल्या महत्त्वाच्या आणि स्थान-माहात्म्य असणाऱ्या भागांचा शोध ‘इलेक्ट्रो कॉर्टिकोग्राफी’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं लावता येतो. संगणकीय नॅव्हिगेशन उपकरणांच्या साहाय्यानं वरकरणी सारख्याच दिसणाऱ्या मेंदूवरच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणजेच महत्त्वाच्या भागांना धक्का न लावता फक्त झटके उत्पन्न करणारा भाग कायमचा काढून टाकता येऊ शकतो. याउलट याच मुलांना अनेक वर्ष झटके न येण्याची औषधं दिली गेली तर त्यांची बौद्धिक वाढ आणि शालेय प्रगतीत बाधा निर्माण होते. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास खुंटतो. औषधांमुळे डोळय़ावर झापड वा ग्लानी राहण्याची परिस्थिती निर्माण होते. एपिलेप्सी झालेल्या सर्वानाच शस्त्रक्रियेचा उपयोग होतो असा माझा दावा नाही परंतु अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेचा उपयोग होऊ शकतो आणि औषधं टळू शकतात हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे.

तिसरं उदाहरण मज्जारज्जू व मणक्याशी संबंधित आहे. ‘लंबर कॅनॉल स्टेनॉसिस’ या आजारात स्पोंडिलोसिसची प्रक्रिया अतिरिक्त झाल्यामुळे कंबरेच्या मणक्यातील नसांच्या पुंजक्यावर दाब येतो. या दाबामुळे कंबर दुखणं आणि पायात कळा येणं सुरू होतं. दोन्ही बाजूच्या मांडय़ांचा मागचा भाग, पोटऱ्या आणि पावलात जडपणा व कळा येऊ लागतात. थोडं अंतर चालल्यावर मांडय़ा व पोटऱ्या भरून येतात, मुंग्या येऊन बधिर होतात आणि चालणं थांबवून विश्रांती घ्यावी लागते. या आजारात गरज असताना, योग्य वेळेला आणि योग्य प्रकारे केलेल्या शस्त्रक्रियेनं नसांवरचा दाब जाऊन चालणं परत सुरू होतं. दुर्दैवानं या आजारात अनेक दिवस कर्णोपकर्णी पसरत गेलेल्या, ‘शस्त्रक्रियेतल्या धोक्यांच्या बातम्यां’ना घाबरून अनेक रुग्ण शस्त्रक्रिया टाळतात. पायातली शक्ती कमी होईपर्यंत थांबतात. तोपर्यंतचं आयुष्य वेदनाशामक गोळय़ा खात जगत राहतात आजारानं चालणं बंद झाल्यामुळे मधुमेह, रक्तदाबासारखे आजार बळावतात. समाजात मिसळण्याची इच्छा कमी होते, आयुष्याचा दर्जा खालावतो. हे सगळं का? तर शस्त्रक्रिया टाळण्याच्या अट्टहासामुळे. मला वाटतं शस्त्रक्रियेत असणारे धोके जितक्या तपशिलात जाऊन विचारले जातात त्याच तपशिलात शस्त्रक्रिया न करण्याचे धोके विचारले गेले पाहिजेत. असो.

काही ठळक उदाहरणं अगदी थोडक्यात दिली. या संदर्भात आपल्या चालू असलेल्या विषयाला धरून ‘पार्किंसन्स’ म्हणून ओळखला जाणारा जो आजार आहे त्याविषयी बघू. या आजाराच्या काही रुग्णांना ‘डीबीएस’ शस्त्रक्रियेचा उपयोग होतो. किंबहुना अमेरिकन वैद्यकीय नियमक मंडळाकडून ‘डीबीएस’नं उपचार करण्यास परवानगी देण्यात आलेला हा पहिला आजार. या आजारात सुरुवातीला हातांची बोटं आणि पायांची बोटं यांची बारीक थरथर होऊ लागते. ती सुरुवातीला अगदी सूक्ष्म असते. अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये एखादी छोटी गोळी वळताना जशी हालचाल होते तशीच पण झपाटय़ानं होत राहते; याला ‘पिल रोलिंग ट्रेमर’ म्हणून ओळखलं जातं. रुग्णाच्या शरीराची हालचाल मंद होते. चेहऱ्यावरचे भाव कमी होऊन चेहरा एखाद्या मुखवटय़ासारखा मख्ख दिसू लागतो. चालायला सुरुवात केल्यावर रुग्ण एकदमच भरभर छोटी छोटी पावलं टाकत पुढे चालतो. आता कधीही पुढे पडणार की काय असं बघणाऱ्याला वाटतं. जणू, पडण्याआधी पुढचा एखादा आधार जाऊन पटकन धरण्यासाठी तो चालतो आहे असं दृश्य दिसतं. मेंदूत खोलवर स्थित असलेल्या ‘सबस्टॅन्शिया निग्’रा या समूहातील पेशी बिघडल्यामुळे हा आजार होतो. या पेशींमधून नेहमी डोपामिन नावाचं चेताउद्दीपक रसायन (न्यूरोट्रान्समिटर) तयार होतं. या आजारात ते कमी होतं. या आजारावर गेल्या ४० वर्षांत निरनिराळी उपयुक्त औषधं आली. ही औषध आजाराच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये फारच उत्तम काम करतात; पण काळ जाईल तशी या औषधांची मात्रा वाढत जाते आणि दुष्परिणाम डोकं वर काढू लागतात. काही काळाने औषधांचा उपयोग होणं अगदीच कमी होत जातं. ‘डीबीएस’ ही शस्त्रक्रिया आजाराच्या या स्थितीत औषधांविनाच काही लक्षणं कमी करण्यास सक्षम ठरते. मेंदूच्या खोलवर स्थित ‘ग्लोबस पॅलिडस’ (Gp) आणि सबथॅलॅमिक न्यूक्लिअस (STN) या पेशीसमूहांत इलेक्ट्रोड घालून ठेवून त्यातून या पेशींचं उद्दीपन केलं जातं. मेंदूच्या या दुर्धर आजारात काही रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया वरदान ठरत आहे.

थोडक्यात जिथं शस्त्रक्रिया आजाराचं मूळ कारण दूर करू शकते त्या आजारात योग्य प्रकारे निवडलेली आणि पार पाडलेली शस्त्रक्रिया ही औषधांपेक्षा सरस असू शकते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ‘आजार फार वाढल्यास शस्त्रक्रिया करावी,’ हे शंभर वर्षांपूर्वीचं गृहीतक आज प्रत्येक वेळेला खरं असेलच असं नाही. पुढच्या काही वर्षांत ‘डीबीएस’सारख्या उपचारपद्धती मेंदू व मज्जारज्जूच्या आजारांवर वरदान ठरू शकतील, हे निश्चित.