इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. धावांच्या राशी, चौकार-षटकारांचा पाऊस यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत. परंतु स्पर्धेतील नियम आणि परिस्थिती पूर्णपणे फलंदाजांच्या पक्षात असल्याने गोलंदाज मात्र हतबल होताना दिसतात. त्यामुळे भविष्यात भारताला झहीर, बुमरा आणि शमी यांच्या तोडीचे वेगवान गोलंदाज मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट आता व्यवसाय आणि मनोरंजनाचे साधन बनले आहे. ‘आयपीएल’ची रचनाही त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. या स्पर्धेत फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या तयार केल्या जातात. स्पर्धेतील फिरकीपटू चेंडू वळवण्याचा प्रयत्नच करत नाहीत. केवळ धावा रोखण्यावर त्यांचे लक्ष असते.’’ अशी वक्तव्ये एखाद्या टीकाकाराने केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्र, या स्पर्धेतील एका संघाशी (सनरायजर्स हैदराबाद) जोडला गेलेला आणि सर्वकालीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना होणारा मुथय्या मुरलीधरन जेव्हा असे शब्द उच्चारतो, तेव्हा ते नक्कीच विचार करायला भाग पाडते.
एकेकाळी ‘आयपीएल’ म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील तगडी स्पर्धा मानली जायची. मात्र, गेल्या काही हंगामांत हे चित्र बदलून गेले आहे. आता २०० धावांचा टप्पाही सामान्य झाला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९०च्या पुढे गेली, तर विजयासाठी लागणारी सरासरी धावसंख्या २१५ पर्यंत पोहोचली आहे. या हंगामात तब्बल १४०० हून अधिक षटकार मारले गेले आहेत. ‘आयपीएल’साठी हा नवा विक्रम ठरतो. यात एकट्या वैभव सूर्यवंशीचे १६ सामन्यांत विक्रमी ७२ षटकार. ही फटकेबाजी प्रेक्षकांना मनोरंजन देत असली, तरी भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा ‘ट्रेंड’ गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. सपाट खेळपट्ट्या, बॅट्सचा वाढता आकार, ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा प्रभाव, हे घटक गोलंदाजांसाठी मारक ठरत आहेत.
फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्ट्या
‘‘क्रिकेटमध्ये आता प्रायोजक आणि प्रेक्षक यांचाही विचार करावा लागतो. संतुलित खेळपट्ट्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाण्या ठरू शकतात. चेंडू सातत्याने सीमारेषेबाहेर जात नसल्यास प्रेक्षक सामन्यात रस घेणार नाहीत. त्यामुळे प्रायोजकही जाण्याची भीती आहे. या सगळ्याकडेही लक्ष द्यावे लागते,’’ असे मुरलीधरन यंदाच्या हंगामातील एका सामन्यानंतर म्हणाला. ‘आयपीएल’मध्ये प्रेक्षकांना मनोरंजन हवे. त्यामुळे बहुतांश मैदानांवर फलंदाजांसाठी नंदनवन ठरणार्या खेळपट्ट्या तयार केल्या जातात. अलीकडे लाल आणि काळ्या मातीचा एकत्रित वापर करून खेळपट्ट्या तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा खेळपट्ट्यांवर चेंडूला सीम किंवा स्विंग मिळणे कठीण होते. पूर्वी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १७०-१८० धावा स्पर्धात्मक मानल्या जायच्या. आता २२० धावाही सुरक्षित वाटत नाहीत. परिणामी गोलंदाजांवर मानसिक दडपण वाढते. प्रत्येक चूक महागडी ठरते आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास ढासळतो. यात नुकसान भारतीय क्रिकेटचे होत आहे.
गोलंदाजांच्या मानसिकतेत बदल
खेळपट्ट्यांचे स्वरूप, फलंदाजांचे वर्चस्व यामुळे आता गोलंदाजांच्या मानसिकतेतही मोठा बदल झाला आहे. पूर्वी फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाज विशिष्ट योजना आखायचे. आता मात्र त्यांचे मुख्य उद्दिष्ट धावा रोखणे इतकेच असते. बळी मिळवण्यासाठीची आक्रमक वृत्ती कमी होत चालली आहे. अखेरच्या हाणामारीच्या षटकांत जवळपास प्रत्येक गोलंदाज ‘वाइड यॉर्कर’ किंवा ‘स्लोअर बॉल’वर अवलंबून असतो. विविधता कमी झाली आहे. फलंदाजांना त्यामुळे गोलंदाजांचा अंदाज सहज बांधता येतो. आखूड टप्प्याचे चेंडू टाकणे किंवा टप्पा धरून ठेवून गोलंदाजी करणे हे आता अतिशय दुर्मीळ झाले आहे. मात्र, भुवनेश्वर कुमार, शमी आणि जोश हेझलवूड यांसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज, जे अजूनही पारंपरिक शैलीला प्राधान्य देतात, ते आजही प्रभावी ठरत आहेत.
फिरकीपटूंचाही संघर्ष
लहान मैदाने आणि दवाचा परिणाम यामुळे फिरकी गोलंदाजही संघर्ष करताना दिसत आहेत. एकेकाळी सामन्याचे पारडे फिरवणारे फिरकीपटू आता कर्णधारांच्या योजनांमध्ये दुय्यम ठरतात. युजवेंद्र चहलसारख्या अनुभवी फिरकीपटूला एका सामन्यात (दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध) एकही षटक टाकण्याची संधी मिळत नाही, ही गोष्ट या बदलत्या प्रवाहाची साक्ष देते. ‘आयपीएल’ इतिहासातील सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजावरच विश्वास दाखवला जात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुलदीप यादवसारखा गुणवान आणि कौशल्यसंपन्न फिरकीपटूही फलंदाजधार्जिण्या ‘आयपीएल’मध्ये यशापासून वंचित राहतो. त्यातच कर्णधार सावध पवित्रा अवलंबताना डावखुर्या फलंदाजांविरुद्ध डावखुरे फिरकीपटू आणि लेग-स्पिनर यांना गोलंदाजी देणे टाळतात. हे अपयश केवळ भारतीय फिरकीपटूंपुरते मर्यादित नाही. अफगाणिस्तानच्या रशीद खानची विश्वातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. मात्र, शुक्रवारी
(२९ मे) झालेल्या क्वालिफायर-२च्या सामन्यात डावखुरा वैभव सूर्यवंशी खेळपट्टीवर असल्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने रशीदला सुरुवातीला केवळ एक षटक टाकू दिले. मग त्याला थेट डावातील सर्वांत अवघड अर्थात शेवटचे षटक टाकण्यास मिळाले. या दोन षटकांत मिळून त्याने ४५ धावा खर्ची केल्या. यंदाच्या हंगामात फिरकीपटू षटकामागे ९.२५ हून अधिक धावा देत आहेत. ‘आयपीएल’मधील ही आजवरची सर्वांत वाईट कामगिरी!
‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा प्रभाव
‘इम्पॅक्ट प्लेअर’ (प्रभावी खेळाडू) नियमामुळे संघांना अतिरिक्त फलंदाज खेळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे फलंदाजीची खोली ८-९ क्रमांकापर्यंत वाढते. पूर्वी फलंदाजांमध्ये बाद होण्याची भीती असायची, कारण खालची फळी मर्यादित होती. आता मात्र पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत फटकेबाजी, हेच प्रत्येक संघाचे धोरण असते. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्वही कमी झाले आहे. अनेक युवा खेळाडूंचा वापर केवळ फलंदाज म्हणून केला जातो. त्यामुळे त्यांच्यातील गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण कौशल्य विकसित होण्याची संधी कमी होत आहे. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मासह विद्यमान कर्णधार गिल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आदी नामांकित खेळाडूंनी या नियमाला विरोध दर्शवला आहे. यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या कर्णधारांच्या बैठकीत हा नियम मागे घेण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, नियम २०२७ पर्यंत कायम राहणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले.
भारतीय गोलंदाज मागे पडण्याची भीती
भारताला जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व टिकवायचे असेल, तर दर्जेदार वेगवान गोलंदाजांची फळी आवश्यक आहे. बुमरा, शमी, सिराज, इशांत, भुवनेश्वर, उमेश यादव यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध परदेशात कसोटी सामन्यांत विजय मिळवले. आता मात्र भारताच्या युवा गोलंदाजांचा दर्जा ढासळलेला दिसतो. ‘आयपीएल’मध्ये सातत्याने धावा खर्ची केल्यास गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी होतो. युवा गोलंदाज जोखीम घेण्याऐवजी बचावात्मक क्रिकेटला महत्त्व देतात. याचा परिणाम भारताच्या कसोटी क्रिकेटवरही होऊ शकतो. ट्वेन्टी-२० खेळून विकसित होणार्या गोलंदाजी कौशल्याचा प्रभाव बहुदिवसीय प्रारूपात पडतो.
‘दीर्घकालीन’ कार्यक्रम आवश्यक
जागतिक दर्जाचे गोलंदाज घडवायचे, तर त्यासाठी संयम, तंदुरुस्ती आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. रणजी करंडकात प्रदीर्घ स्पेल टाकण्याची सवय लागायला हवी. अकीब नबीसारख्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये चमक दाखवणार्या गोलंदाजाला योग्य मानही मिळायला हवा. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि राज्य संघटनांनी आता गोलंदाजांसाठी स्वतंत्र ‘दीर्घकालीन’ कार्यक्रम तयार करण्याची गरज आहे. (बीसीसीआयने २०२४ मध्ये उदयोन्मुख वेगवान गोलंदाजांसाठी स्वतंत्र करार सुरू केले होते. मात्र, वर्षभरातच ते इतिहासजमा झाले.) याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक स्पर्धात्मक खेळपट्ट्या तयार करणे अत्यावश्यक आहे. बॅट आणि चेंडू यांच्या द्वंद्वात समतोल न राखल्यास त्याचा सर्वांत मोठा फटका भारतीय क्रिकेटला बसेल. ‘आयपीएल’ मनोरंजक ठरेल पण भविष्यातले झहीर, बुमरा, शमी मिळणे अशक्यप्राय होईल.
anvay. sawant@expressindia.com
