नायजेरिया हा गेल्या दीड-दोन दशकात साहित्य-कला-संगीत आणि चित्रपट प्रांतात अधिकाधिक पुढे जात असलेला आफ्रिकी देश. डझनांहून अधिक लेखक अमेरिकी आणि ब्रिटिश नियतकालिकांमधून आंतरराष्ट्रीय ओळख मिळविलेले. इथल्या इंग्रजी लेखकांची नवी पिढी अमेरिकेत साहित्य विषय शिकवतदेखील आहे. स्थानिक भाषांमध्ये गेल्या दशकभरात बायकांनी खास बायकांसाठी लिहिलेल्या शृंगार कादंबर्‍यांचा प्रचंड सुळसुळाट झाला. शरियाचा कायदा येथील काही भागांमध्ये लागू असल्यामुळे या कादंबर्‍यांना जाळण्याचा उद्योग करण्यात आला. पण त्यावर शक्कल काढत महिलांनी या कादंबर्‍यांचा लेखन आणि वाचनप्रवाह आटू दिलेला नाही. मोबाइलमधील ‘व्हॉट्सॲप’ यंत्रणाच त्यांनी या कामासाठी राबविली.

अत्यल्प वर्गणी भरून या कादंबर्‍या प्रकरणांमध्ये दर आठवड्याला कशा वाचल्या जातात त्याची गोष्ट न्यू यॉर्क टाइम्सने तपशिलात दिलीय. जपानमध्ये असा मोबाइल फोनवरून कादंबरी लिहिण्याचा आणि ती पसरवण्याचा समांतर प्रयोग २००० च्या दशकात लोकप्रिय होता. त्या लेखक आणि वाचकांचे समांतर साहित्याला पूरक विश्व तयार झाले होते. ताजा नायजेरियावरील शृंगार कादंबर्‍यांवरील लेख आणि न्यू यॉर्करने घेतलेला जपानी मोबाइल कादंबरी क्रांतीवरचा २००८ सालातील रसाळ आढावा येथे वाचता येईल.

https://tinyurl.com/mu9d4x2v 
https://tinyurl.com/3f74746k

पुस्तकालयांची युद्धकालीन स्थिती…

माजिद माजिदी यांच्या दीड-दोन दशकांपूर्वीच्या सिनेमांतून इराण पाहिलेल्या जगाला गेल्या वर्षी इस्रायलविरोधात दंड थोपटलेला इराण पाहून धक्का बसलेला. कारण इराण इतका प्रगत असेल, याची तोवर अध्र्याहून अधिक जगाला बिलकूल कल्पना नव्हती. याच स्तंभात गेल्या वर्षी इराणमधील पुस्तकालयांची स-चित्रफीत माहिती देण्यात आलेली. ‘बुकसिटी’ ही तिथली पुस्तक दुकानांची साखळी अमेरिकी ग्रंथदालनाच्या तोडीची. शहराशहरांत विखुरलेली. ताज्या युद्धात हल्ल्यांमुळे या पुस्तकालयांचे काय हाल होत आहेत, त्यावरचे वृत्त या दुव्यावर वाचता येईल.

 https://tinyurl.com/5d42fsd8

आंतरराष्ट्रीय कथापटल…

‘द पेंग्विन बुक ऑफ इण्टरनॅशनल शॉर्ट स्टोरी’ हा ग्रंथ चार दिवसांपूर्वी प्रकाशित झाला. लेबॅनॉनी-अमेरिकी लेखक रबी अल् मदीन आणि अमेरिकी लेखक-संपादक जॉन फ्रीमन यांच्या संपादनाखाली हा कथागुच्छ तयार झालाय. पैकी जॉन फ्रीमन यांनी ‘ग्रॅण्टा’ या मासिकाच्या संपादकपदी असताना काही वर्षांतच त्याचे रूपडे बदलले ते त्यात जगभरातील कथालेखकांना आवर्जून लिहिते करून. पुढे ‘फ्रीमन्स’ हे नवे मासिक काढून त्यांनी शोधून काढलेल्या कित्येक नव्या लेखकांना त्यात लिहिते ठेवले. या कथासंग्रहात सहा खंडातील लेखकांच्या कथांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यातील संपादकीय भागाचा अंश येथे वाचता येईल. ज्यात आंतरराष्ट्रीय कथापटलावर दोघांनी चर्चा केली आहे.  

https://tinyurl.com/5bktj6sr