कोहिमाच्या विमानतळावर १९ ऑगस्ट रोजी मोठा मंडप उभारण्यात आला होता. निकेतु इरालु यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने इथे येणार होते. नागालॅण्ड सरकारतर्फे पुष्पचक्र घेऊन प्रतिनिधी तयार होतेच पण नागालॅण्डमधील बहुतेक सार्या संस्था- संघटनांचे प्रतिनिधी तसेच मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि अरुणाचलहूनही अनेकजण केवळ ‘अंकल निकेतु’ यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. कोण होते निकेतु इरालु? ईशान्येतील अनेक वृत्तपत्रांनी त्यांना ‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवन वाहणारे’ असे म्हटले आहेे. पण अनेक तरुणांना, ईशान्य भारताबाहेरही अनेकांना प्रेरणा मिळावी, असे काय होते निकेतु इरालु यांच्या जीवन-कार्यात?
यासाठी आधी इरालु यांच्या वंशावळीतले दोन तपशील लक्षात घ्यायला हवेत. स्वतंत्र नागा राष्ट्राची मागणी करणारे ए. झेड. फिझो हे त्यांच्या आईचे वडील. तर, निकेतु यांचे वडील सेव्हिल हे नागालॅण्डमधले प्रतिष्ठित डॉक्टर. वडिलांनी बाहेरचे जग पाहिलेले आणि शांततावादी; तर आजोबा दुर्गम खोनोमा गावात वाढलेले, कुणाही सरकारचा वाराच न लागलेले आणि कदाचित म्हणूनच, ‘स्वातंत्र्या’ची मागणी किती असमंजस ठरेल हे ध्यानातच न घेता ती रेटणारे! या दोन प्रवृत्तींचा झगडा निकेतु यांना लहानपणापासून दिसला. माध्यमिक शिक्षणासाठी ते शिलाँगला राहिले, तिथे अन्य राज्यांचे सहपाठी भेटले उच्च शिक्षणासाठी ‘मद्रास ख्रिश्चन कॉलेज’मध्ये गेल्यावर जीवनाची दिशा त्यांना सापडली.
हे ‘मद्रास ख्रिश्चन कॉलेज’ म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, टी. एन. शेषन, राजा रामण्णा आदींसह अनेक महनीय माजी विद्यार्थी असलेली संस्था! सदाचरणासाठी नीतिमत्ता महत्त्वाची- ती कुणाही धर्मावर अवलंबून नसते- हा संस्कार निकेतु यांना इथे मिळालाच; पण धर्मातीत नितिमत्तेचा प्रसार करणार्या ‘मॉरल री-आर्मामेंट’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संपर्कात ते कॉलेजात असताना आले. जीनिव्हा येथे या संस्थेचे मुख्यालय असून आता ती ‘इनिशिएटिव्ह फॉर चेन्ज’ म्हणून ओळखली जाते. संस्थेच्या विचाराने भारून जाऊन नागालॅण्डला परतलेल्या निकेतु यांनी शैक्षणिक कार्य सुरू केले, पण खरे काम मनपरिवर्तनाचे आहे, हे त्यांना पटत होते. संस्थेलाही त्यांच्या कामाचे महत्त्व दिसत होते. मग त्यांना काही वर्षासाठी ‘इनिशिएटिव्ह फॉर चेन्ज’चे भारतीय प्रमुखपद देण्यात आले. महाराष्ट्रात- पाचगणी येथे संस्थेच्या मुख्यालयात निकेतु राहिले होते!
नागलॅण्डमध्ये अमली पदार्थांचा प्रसार वाढत असताना ‘नागा मदर्स असोसिएशन’च्या साथीने ‘कृपा फाउंडेशन’ या नशामुक्ती संस्थेचे काम निकेतु इरालुंनी नागालॅण्डमध्ये सुरू केले. अमली पदार्थाची इंजेक्शने घेणार्यांत पहिला ‘एचआयव्ही’ बाधित सापडला तेव्हा ईशान्येची सारी राज्ये पिंजून काढून अमली पदार्थ व एड्सविरोधी कामांना इरालुंनी प्रेरणा दिली. ‘सरकार का नाही काही करत’ हा प्रश्न बिनतोड असेल… पण पर्याय आपणच शोधले पाहिजेत, हे या राज्यांतील त्रस्त सामाजिक/ राजकीय नेत्यांच्या गळी उतरवणे सोपे नसूनही, ते निकेतुंनी केले. राजकीय शांततेसाठी २००४ मध्ये ‘नागा होहो’ने त्यांच्यावरच विश्वास ठेवला. तो सार्थ करून, १९९६-९७ मधल्या शांतताचर्चांना भक्कम आधार मिळवून देण्याचे काम इरालु यांनी केले.
