डॉ. रूपा रेगे नित्सुरे
भारताचा आर्थिक प्रवास घडविणारे महत्त्वाचे विचार व वादविवाद कथाकथनाच्या स्वरूपात उलगडून दाखवतानाच; प्रत्येक गोष्ट स्वत: निर्माण करण्याची ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद नव्हे, याची जाणीव करून देणार्‍या पुस्तकाविषयी… निरंजन राजाध्यक्ष यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘द आयडियाज दॅट शेप्ड मॉडर्न इंडिया अँड इट्स इकॉनॉमी’, हे पुस्तक भारताच्या गेल्या दीडशे वर्षांतील आर्थिक प्रवासावर, एका वेगळ्याच पद्धतीने प्रकाशझोत टाकते. सामान्यपणे आर्थिक इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा भर हा संस्थात्मक संरचना तसेच विविध हितसंबंधी गटांचे वर्तन, यांवर असतो. तुलनेने अशा पुस्तकांत ‘कल्पनां’कडे (विचार) कमी लक्ष दिले जाते. कारण संस्था व हितसंबंधी गट यांच्यात आर्थिक बदलांची गती मंदावण्याची किंवा ते बदल पूर्णपणे रोखून धरण्याची क्षमता असते. हे दोन्ही घटक परिस्थितीला ‘जैसे थे’ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

मात्र राजाध्यक्षांचे पुस्तक, विविध आर्थिक विचारांना केंद्रभागी ठेवून भारताच्या आर्थिक प्रवासाची मांडणी करते. या पुस्तकातील मुख्य युक्तिवाद असा आहे की, ज्याप्रमाणे एखादी प्रचंड मोठी नदी, घर्षणाच्या संथ प्रक्रियेतून अत्यंत कठीण असे पाषाण कालांतराने फोडून काढते, त्याचप्रमाणे संस्था आणि हितसंबंधी गटांमुळे जडशीळ बनलेल्या अर्थव्यवस्थेला हळूहळू बदलविण्याचे काम ‘विचार’ करत असतात. आधुनिक समाजांमध्ये, विचारांची शक्ती केवळ सरकारी सत्तेच्या गुप्त वर्तुळांतच नव्हे, तर व्यापक सार्वजनिक क्षेत्रातही महत्त्वाची ठरते.

या पुस्तकात १८७० ते २०१७ या प्रदीर्घ काळात भारताचा आर्थिक प्रवास घडविणारे महत्त्वाचे विचार व वादविवाद, कथाकथनाच्या स्वरूपात लेखकाने उलगडून दाखवले आहेत. त्यामुळे पुस्तकाचे वाचन हा एक अतिशय रंजक अनुभव ठरतो. लिखाणाच्या या शैलीवर, आधुनिक नर्सिंगची संस्थापक फ्लॉरेन्स नाईिंटगेल हिच्या एका पत्राचा प्रभाव पडल्याचे लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. भारतातील एका मित्राला लिहिलेल्या पत्रात, नाईिंटगेलबाई म्हणतात, ‘‘इंग्रज लोकांना सामान्यपणे अहवाल वाचावयास आवडत नाहीत तसेच ज्या लिखाणात सामान्य विधाने, अमूर्त संकल्पना, आकडेवारी किंवा मते असतात, त्यातही त्यांना रस नसतो. त्यांना ‘तथ्ये’ हवी असतात.

विशिष्ट घटना, प्रत्यक्ष जीवन आणि त्यांचे परिणाम यांच्याशी संबंधित अशी ठोस तथ्ये वाचणे त्यांना आवडते’’. नाईिंटगेलबाईंचा हा सल्ला प्रस्तुत पुस्तकासाठी लेखकाने तंतोतंत पाळला आहे.  पुस्तकाच्या प्रस्तावनेत लोकहितवादींच्या (गोपाळ हरी देशमुख) ‘लक्ष्मीज्ञान’ या १८४९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे, ज्याद्वारे लोकहितवादींनी ॲडम स्मिथचे अर्थशास्त्र मराठी वाचकांसमोर आणले. त्या वेळी अर्थशास्त्र हा शब्दही मराठीत रूढ झाला नव्हता. निरंजन राजाध्यक्षांनीदेखील त्यांच्या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय ‘लक्ष्मीच्या शोधाची कथा’ हाच ठेवला आहे.

पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. भारताची औद्योगिक ध्येय-दृष्टी, आर्थिक स्वराज्यासाठीचा लढा, पर्यावरणपूरक पर्याय, राष्ट्रीय नियोजनाचा मार्ग, नेहरूयुगाचा सुवर्णकाळ, आत्मपरीक्षणाचा काळ, आर्थिक विश्रांतीचा काळ, सुधारणांचे वारे आणि १९९१ च्या पलीकडे- अशी नऊ विस्तृत प्रकरणे यात आहेत. व त्यानंतर ‘निष्कर्षा’चे एक सविस्तर प्रकरण त्यांनी लिहिले आहे.

या पुस्तकात भारताच्या आर्थिक परिस्थिती संबंधित अनेक महत्त्वाचे वाद कालानुरूप मांडले आहेत. उदाहरणार्थ, भारतातील सुरुवातीच्या राष्ट्रवाद्यांनी केवळ ब्रिटिशांच्या भारत-विषयक आर्थिक धोरणांवरच कडक टीका केली नव्हती तर आपल्या देशासाठी औद्योगिक गुंतवणूक, तांत्रिक शिक्षण, आधुनिक बँकिंग आणि सामाजिक सुधारणा अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेला एक समृद्ध कार्यक्रमही आखला होता. त्यांनी एकत्रितपणे मांडलेल्या या कार्यसूचीचे, पुढील दशकांमधील आर्थिक विचार व धोरणांवर अत्यंत खोलवर परिणाम झाले. पुस्तकात या कार्यसूचीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.

देश उभारणीच्या काळात भारतात जे महत्त्वाचे आर्थिक वाद घडले, त्याचेही सखोल परीक्षण या पुस्तकात करण्यात आले आहे. मुक्त व्यापार हितकारक की संरक्षणवाद हितकारक, पारंपरिक अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे विरुद्ध नवीन अर्थव्यवस्थेची उभारणी, उद्योगांमध्ये जास्त गुंतवणूक करणे श्रेयस्कर की शेतीमध्ये, भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तू यांच्यावरील साक्षेपी भर, बाजारपेठांच्या तुलनेत नियोजनाची भूमिका, अर्थव्यवस्थेच्या पुरवठा बाजूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे की मागणी बाजूवर तसेच जलद आर्थिक विकास आणि आर्थिक स्थैर्य यांच्यातील समतोल साधण्यासाठी काय केले पाहिजे, अशा अनेक मुद्द्यांवर भारतात जे तीव्र मतभेद व चर्चा झडल्या आहेत, त्याचा सखोल आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे.

लेखकाच्या मते प्रत्येक कालखंडाने नवीन वादविवाद, दृष्टिकोन आणि उपाययोजना समोर आणल्या आहेत. अनेक धाग्यांपासून एखादी गुंतागुंतीची गोधडी विणली जावी, त्याचप्रमाणे इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवासात भारतीय आर्थिक चर्चांची अनेक समान सूत्रे एकत्र आली आहेत. आणि आजही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, ती आपल्या काळातील आर्थिक विचारांना आकार देत आहेत. तसेच लेखक सांगतात की भारतातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांनी सार्वत्रिक आर्थिक तत्त्वांकडे (युनिव्हर्सल इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स) कधीच पाठ फिरवली नाही, परंतु त्यांना हेदेखील भान होते की या तत्त्वांना विशिष्ट भारतीय परिस्थितीनुसार जुळवून घेणे आवश्यक होते. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीच्या काळात भारताकडे स्वत:ची अशी पुरेशी ‘बचत’ नव्हती, ज्यातून औद्योगिक गुंतवणुकीला भारत चालना देऊ शकला असता. यातूनच भारतामध्ये ‘तुटीच्या वित्तव्यवस्थापना’बद्दलच्या (डेफिसिट फायनान्सिंग) चर्चा व त्याचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम यावर वाद झडू लागले.

आयातीवर जबरदस्त अवलंबित्व असलेल्या भारताकडे नेहमीच विदेशी चलनाचा तुटवडा होता, ज्यामुळे आयात पर्यायन (इम्पोर्ट स्स्टिटट्युशन) अधिक श्रेयस्कर की निर्यात संवर्धन (एक्स्पोर्ट प्रमोशन) याबद्दलच्या वादविवादांना ऊर्जा मिळाली. ‘अन्नाचा अभाव’ ही केवळ एक मानवी शोकांतिका नव्हती तर औद्योगिक विकासातील एक अडथळा म्हणूनही ती ओळखली जात होती. पण हळूहळू हे अडथळे दूर करण्यात भारताची आर्थिक धोरणे यशस्वी झाली. भारताची ही आर्थिक कामगिरी निश्चितपणे गौरवली गेली. कालानुरूप अनेक जुने अडथळे दूर झाले पण नवीन अडथळे निर्माण होत गेले उदाहरणार्थ- ऊर्जा, पायाभूत सुविधा व कौशल्ये यांचा तुटवडा.

भारतातील इतर महत्त्वाचे आर्थिक वादाचे विषय म्हणजे येथे प्रबळ असलेल्या कृषी अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक परिवर्तन व या परिवर्तनासाठी सरकारकडून अपेक्षित असलेली पुढाकाराची भूमिका- मग ती भूमिका थेट सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीद्वारे असो किंवा खासगी क्षेत्राला गुंतवणूक अनुदाने, आयात शुल्क व स्वस्त कर्जे यांसारखे प्रोत्साहनपर लाभ देऊन असो. भारताचे हे आर्थिक धोरणदेखील इतर अनेक देशांच्या, विशेषत: उशिरा औद्योगिकीकरण झालेल्या देशांच्या धोरणाशी सुसंगत असेच होते.

याचे मूलभूत उद्योग निर्माण करण्यासाठी निश्चितपणे फायदे झाले असले तरीही अर्थव्यवस्थेवरील सरकारी नियंत्रणाने हळूहळू प्रजेचे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात आणले. यातून निर्माण झालेल्या ‘लायसेन्स-परमिट-राज’मुळे खासगी उद्योग व मुक्त बाजारपेठा यांचा कोंडमारा झाला. यातून निर्माण झालेल्या समस्यांमुळे (अकार्यक्षमता, मक्तेदारी, चढ्या किमती, भ्रष्टाचार आणि यांमुळे उद्भवणारी आर्थिक अरिष्टे) हे लक्षात आले की सरकारी कृती ही तेव्हाच उत्तम ठरते जेव्हा ती खासगी उद्योगांची जागा घेण्याऐवजी त्यांना पूरक ठरते. तसेच आर्थिक सुधारणा एका धडाक्यात कराव्यात की टप्प्याटप्प्याने कराव्यात- विशेषत: भारतासारख्या सामाजिक सुरक्षा जाळे नसलेल्या देशात- याचे आकलन प्रत्यक्ष अनुभवातून व त्यातून सुरू झालेल्या आर्थिक वादविवादांतून येत गेले.

भारतीय आर्थिक धोरणांकडे ‘आर्थिक राष्ट्रवादाचा एक भाग’ म्हणून पाहणे सर्वात योग्य ठरेल, असे लेखकाचे म्हणणे आहे. राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक सुधारणा व आर्थिक विकास हे मुख्य प्रवाहातील आर्थिक राष्ट्रवादाचे पूर्वीच्या काळी जसे आधारस्तंभ होते तसेच आजही आहेत. म्हणूनच भारतीय अर्थशास्त्राचा इतिहास भारतीय राष्ट्रवादाच्या व्यापक संदर्भात समजून घेणे उपयुक्त ठरते. मात्र आर्थिक राष्ट्रवादाचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाठ फिरविणे असा खचितच होत नाही.

प्रत्येक गोष्ट स्वत:च निर्माण करण्याची ‘आत्मनिर्भरता’ म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद नव्हे, हे लेखक स्पष्ट करतात. उलट ‘कुठल्या गोष्टींची निर्मिती आपण स्वत: करायची, कुठल्या गोष्टी निर्यात करून, आयातीकरता आवश्यक असे परकीय चलन मिळवायचे आणि प्रगत देशांच्या दबावाखाली न येता, आपली वित्तीय धोरणे स्वयंभूपणे राबविण्याची क्षमता प्राप्त कशी प्राप्त करायची’, यासंबंधीचे विचार आर्थिक राष्ट्रवादासाठी महत्त्वाचे ठरतात. एकोणिसाव्या शतकातील युरोपीय राष्ट्रवादाचे आणि भारतीय राष्ट्रवादाचे स्वरूप भिन्न होते, हे राजाध्यक्ष स्पष्ट सांगतात. युरोपातील लोकांना मोठ्या राजकीय सत्तांपासून स्वतंत्र असे स्वत:चे राजकीय अस्तित्व हवे होते.

याउलट भारतीय राष्ट्रवाद हा मुळातच एक प्रकारची एकीकरणाची शक्ती होता. एका अशा भूभागाला एकत्र आणले जाणार होते ज्याचे वर्णन नेहरूंनी घटनासभेत मांडलेल्या ‘उद्दिष्ट ठरावा’त (ऑब्जेक्टिव्ह्ज रेझोल्युशन) ‘प्राचीन भूमी’ असे केले होते- अशी भूमी जी जगामध्ये आपले यथोचित व सन्माननीय स्थान प्राप्त करत होती. भारतीय संविधान हा प्राचीन संस्कृती आणि आधुनिक प्रजासत्ताक यांच्यामधील एक दुवा ठरणार होता. भारतीय अर्थकारण हे या एकीकरणाच्या दृष्टिकोनाचाच एक भाग होता.

त्यानंतर जे जे घडत गेले, ते ते सर्व या ‘विचारा’वर आधारित होते. जटील संघराज्याला एकत्र ठेवण्यासाठीचे प्रबळ केंद्रीय सरकार असो वा निरनिराळ्या प्रांतांमधील मुक्त व्यापार टिकवून ठेवणार्‍या घटनात्मक तरतुदी असोत वा देशाचे विविध भाग एकमेकांस जोडणार्‍या लोहमार्ग (आगगाड्यांचे) व रस्त्यांमधील भल्यामोठ्या गुंतवणुकी असोत वा अगदी अलीकडच्या काळातील जीएसटी लागू करण्यासाठी केलेला संघीय समझोता असो- या सर्वांतून भारताने स्वीकारलेले आर्थिक एकीकरणाचे तत्त्वच दिसून येते. विखुरलेल्या प्रादेशिक अर्थव्यवस्थांच्या जागी एक सामायिक बाजारपेठ निर्माण करणे हा भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचा मुख्य उद्देश होता व अजूनही आहे.

तसेच आर्थिक राष्ट्रवादाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विवादांचा मध्यवर्ती विषय हा सामान्य भारतीयांचे जीवनमान सुधारणे हाच कायम होता. मग ते दादाभाई नवरोजी यांचे दारिद्र्यावरील संशोधन असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीव्यवस्थेसाठीचे काम असो वा राधाकमल मुखर्जी यांचे पर्यावरण क्षेत्रातील काम असो वा जे. के. मेहता यांचे अभावमुक्ततेच्या स्वातंत्र्यासाठीचे काम असो वा राष्ट्रीय नियोजन समितीमध्ये लैंगिक समानता व आर्थिक विकास यावर झडलेल्या चर्चा असोत- या सगळ्यांचा रोख हा सामान्य भारतीयांचे जीवनमान सुधारणे हाच होता.

या पुस्तकासाठी राजाध्यक्षांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. पौर्वात्य व पाश्चिमात्य अभ्यासकांची शेकडो पुस्तके, अहवाल तसेच जर्नलमधील लेखांचा सखोल अभ्यास करून, भारताच्या आर्थिक इतिहासावरील हा उत्कृष्ट ग्रंथ त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या लेखनशैलीबद्दल तर बोलायलाच नको. ‘राजाध्यक्ष’ आडनावाचा समृद्ध वारसा त्यातून सततच जाणवतो. या ग्रंथात भारतीय आर्थिक विचारांच्या संदर्भात जसे महात्मा गांधी, म. गो. रानडे, डॉ. आंबेडकर, सी. डी. देशमुख, पी. सी. महालानोबिस, धनंजयराव गाडगीळ यांचे विचार व संकल्पना सविस्तर वाचावयास मिळतात तसेच कौटिल्य, संत तुकाराम, लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याही अर्थविषयक वैचारिक योगदानाविषयी समजते.

वानगीदाखल उदाहरण द्यायचे झाले तर राजाध्यक्ष संत तुकारामांचा एक अभंग उद्धृत करतात ज्यात तुकारामांनी म्हटले आहे की कशी मुक्त बाजारपेठ, सामान्य लोकांना समतेच्या भावनेने एकत्र आणते आणि सरंजामी अधिकार व पदश्रेणींचे स्तर दूर ठेवते. भारताचा आर्थिक इतिहास समजून घेण्यास उत्सुक असलेल्या सर्वांसाठीच हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो ‘विचारां’च्या सामथ्र्यावर लक्ष केंद्रित करतो. शेवटी बाजारपेठा, अर्थविषयक कायदे, वित्तीय संस्था यांची निर्मिती पोकळीतून होत नाही; ती अनेक बौद्धिक चर्चांची प्रत्यक्ष रूपे असतात.

द आयडियाज दॅट शेप्ड मॉडर्न इंडिया अँड इट्स इकॉनॉमी

लेखक- निरंजन राजाध्यक्ष

प्रकाशक- पेंग्विन रँडम हाऊस इंडिया

पृष्ठे- ४८०, किंमत- १२९९ रु.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, बँकिंग व फायनान्स

ruparege@gmail.com