पैशांच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, कोणालाही चुरगळून फेकून देऊ शकतो, गरीब हे पैसेवाल्यांच्या मनोरंजनासाठी, पायदळी तुडवले जाण्यासाठीच असतात, ज्यांच्याकडे पैसा-सत्ता-प्रतिष्ठा असते त्यांच्या विरोधात कोणी तोंड उघडून ब्र काढू शकत नाही, अशी खात्री बाळगणार्यांच्या मुस्काटात मारली ती महासत्तेला हादरे दिलेल्या एपस्टीन फाइल्स प्रकरणाने. लैंगिक शोषणाची भीषणता अनुभवल्यानंतर बहुतेक मुली स्वत:ला जगापासून लपवू पाहतात, स्वत:ची काहीच चूक नसतानाही अपराधी भावना त्यांना ग्रासून टाकते. पण व्हर्जिनिया रॉबर्ट्स ज्युफ्रे थोडी वेगळी होती. आपल्या अमानुष शोषणाविषयी आवाज उठवणारी, तो आवाज ऐकला जावा यासाठी आटापिटा करणारी. तिचा आवाज जगापर्यंत पोहोचणारे ‘नोबडीज गर्ल’ हे आत्मकथन यंदा ‘ब्रिटिश बुक अवॉर्ड्स’मध्ये बुक ऑफ द इअर ठरले आहे.
व्हर्जिनिया तीच मुलगी आहे, जिने दिलेल्या लढ्यामुळे जेफरी एपस्टीन आणि त्याची साथीदार गिलेन मॅक्सवेलला तुरुंगात जावे लागले. जिच्या प्रिन्स अँड्र्यूबरोबरच्या छायाचित्रामुळे ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, त्याला आपली प्रिन्स ही उपाधी आणि त्याजोडीने येणार्या ऐश्वर्यावर पाणी सोडावे लागले. ‘नोबडीज गर्ल’ ही तिची कहाणी आहे. खडतर बालपण, एपस्टीनच्या संपर्कात आल्यानंतरचा काळ आणि त्यानंतर न्यायासाठी दिलेला प्रदीर्घ लढा याची तपशीलवार वर्णने यात आहेत.
बड्या लोकांसमोर एखाद्या वस्तूप्रमाणे ‘पेश’ केले गेल्याच्या, वापरले गेल्याच्या, अपमान आणि असाहय्यतेच्या वेदना तिने शब्दबद्ध केल्या आहेत. त्यासाठी तिला साहाय्य केले आहे, पत्रकार एमी वॉलेस यांनी. वॉलेस या तब्बल चार वर्षे व्हर्जिनियाच्या संपर्कात होत्या. मृत्यूच्या तीन आठवडे आधी व्हर्जिनियाने वॉलेसला सांगितले होते की, पुढच्या काळात माझी अवस्था कशीही असो, हे पुस्तक प्रकाशित झालेच पाहिजे.
काहीही झाले तरी हे पुस्तक प्रकाशित होणे गरजेचेच आहे, असे व्हर्जिनियाला वाटत होते. पुस्तक २१ ऑक्टोबर २०२५ला प्रकाशित झाले, मात्र त्यापूर्वीच २४ एप्रिल २०२५ रोजी व्हर्जिनियाने आपल्या ऑस्ट्रेलियातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अवघ्या सतराव्या वर्षी एपस्टीनच्या कॅरिबियन बेटावरील प्रासादात एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप व्हर्जिनियाने पुस्तकात केला आहे, मात्र त्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले नाही. पुस्तकाच्या अमेरिकी आवृत्तीत या प्रभावशाली व्यक्तीचा उल्लेख ‘एक सुप्रसिद्ध पंतप्रधान’ असा करण्यात आला आहे, तर ब्रिटनमधील आवृत्तीत त्या व्यक्तीचे वर्णन ‘माजी मंत्री’ या शब्दांत केले आहे.
पुस्तकाच्या सहलेखिका एमी यांनी सांगितले होते की, व्हर्जिनियाला सतत धमक्या देणारे कॉल येत. तिला स्वत:च्या सुरक्षिततेची खात्री नव्हती. त्यामुळे तिने प्रिन्स अँड्र्यूचे नाव आपल्या आत्मकथनातून वगळले. अँड्र्यूने व्हर्जिनियाला भरभक्कम भरपाई देऊ केली, मात्र आपला गुन्हा मान्य केला नाही. त्या दोघांचे छायाचित्र जगभर प्रसारित झाल्यानंतरही त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र त्याला त्याचे पद गमावावे लागले. ‘बीबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार अँड्र्यूला मिळालेल्या या शिक्षेत या पुस्तकानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अनेक निरपराध मुलींची आयुष्य धुळीला मिळवणार्या एपस्टीन आणि मॅक्सवेल यांना कोर्टात खेचण्यात आलेल्या यशाबद्दल व्हर्जिनिया समाधानी होती, मात्र लैंगिक हिंसाचार झालेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीएवढीच तीदेखील आयुष्यभर असाहाय्य राहिली. झालेला छळ तिने जगासमोर आणला, पण त्यासाठी केलेला संघर्ष अनेक शारीरिक-मानसिक व्याधी देऊन गेला. तिच्या वकिलांच्या मते लहान वयातील छळामुळे तिच्या मनावर जे ओरखडे उमटले, त्यातून तिची आयुष्याचा आनंद घेण्याची क्षमताच नाहीशी झाली होती.
व्यवस्थेविरोधात उभ्या ठाकणार्या व्यक्तीला काय किंमत मोजावी लागते आणि आपले म्हणणे ऐकले जाण्यासाठी काय काय करावे लागते, याची जाणीव व्हर्जिनियाचे हे आत्मकथन करून देते. माझे म्हणणे ऐकून घ्या म्हणून आयुष्यभर लढत राहिलेल्या त्या किशोरवयीन मुलीची इच्छा या पुस्तकाने पूर्ण केली. तिच्या धैर्याला पोचपावती मिळाली, पण फारच उशीर झाला.
