एनटीएच्या कार्यालयातच फोन, टॅब, लॅपटॉप, घड्याळ, पेन अशा सार्‍या वस्तू काढून घेतल्यानंतर डोळ्यावर काळी पट्टी बांधून केलेला दीड तासाचा प्रवास संपला तेव्हा पेपर सेटर, मॉडरेटर व ट्रान्सलेटरचा समूह दगडी भिंत असलेल्या एका भव्य इमारतीसमोर उभा होता. ‘आता २१ जूनपर्यंत तुमचे वास्तव्य इथेच’ असे एका अधिकार्‍याने सांगताच सार्‍यांचे चेहरे पडले. यापेक्षा नीटचा पेपर फोडून तुरुंगात जाणे परवडले असते, अशी भावना काहींच्या मनात आली.

दुसर्‍या दिवशी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. एनटीएचे अधिकारी यायचे. चित्रीकरण करणारा एक जण असायचा. त्यांच्यासमोर प्रश्न काढायचे. तो कागद लगेच त्यांच्या हाती सोपवायचा. प्रत्येक सेटरला वेगळी खोली. पर्यवेक्षक स्वतंत्र खोलीत. अनुवादक समोरच्या इमारतीत. एकमेकांचा संपर्कच येऊ द्यायचा नाही अशीच ही रचना. प्रश्न काढण्यासाठी आवश्यक असलेली पुस्तके अधिकारी घेऊन यायचे व काम झाले की परत न्यायचे. ही टाळेबंदीसदृश व्यवस्था बघून धर्मेंद्र प्रधान उत्साहात आले. एकदा परीक्षा व निकाल लागू दे, मग दाखवतोच त्या झुरळांना असे मनाशी म्हणत त्यांनी स्वत:ला आवरले. तिसर्‍या दिवशी रात्री पर्यवेक्षकाच्या खोलीत टकटक असा आवाज आला. उठून त्यांनी दाराकडे बघितले. ते वाजत नव्हतेच. आवाज पलंगाच्या खालून येतोय हे लक्षात येताच ते खाली बघू लागले. अचानक जमीन दुभंगली व त्यातून एक हात बाहेर आला. त्यांनी आधार दिल्यावर एक व्यक्तीच वर आली. ‘घाबरू नका, आम्ही भुयार खोदून तुमच्यापर्यंत पोहोचलो. काहीही करून या पुनर्परीक्षेचा पेपर फोडायचाच असे आम्ही ठरवलेले.’

पर्यवेक्षकाची भंबेरी उडाली. घाबरत त्यांनी विचारले. ‘तुम्ही नेमके इथेच कसे पोहोचलात?’ पेपरफोड्या हसत म्हणाला. ‘जिथे मानवी हाताळणी असते तिथे आम्हाला हमखास यश मिळते. या ठिकाणाची माहिती एका सुरक्षारक्षकाने दिली. आम्ही तुम्हाला पाच कोटी देऊ. हो म्हणालात की अर्ध्या तासात रक्कम तुमच्या घरी. तुम्ही एकच करायचे अंतिम प्रश्न निवडताना आम्ही दिलेली अंगठी डाव्या हातात घालायची. उजव्या हाताने प्रश्न लिहिताना अंगठीचा वरचा भाग कागदाकडे ठेवायचा. बाकीचे काम त्यातला कॅमेरा करेल. कडक सुरक्षाव्यवस्थेत असल्याने तुमच्यावर फुटीचा आळ येणार नाही.’ हे ऐकताच पर्यवेक्षक सुखावले. आयुष्यभर नोकरी करूनही पाच कोटी कमावू शकलो नाही. सारेच भ्रष्ट होत असताना मी तरी का नीतिमान राहावे असा विचार मनात येताच त्यांनी हो म्हटले. ‘फक्त आधीच्यासारखा १० लाखात पेपर विकू नका. ५० लाखाचे ग्राहक बघा. मुलाला समव्यवसायी करण्यासाठी कितीही खर्च करायला तयार असलेले भरपूर डॉक्टर्स आहेत देशात.’

दिलेली अंगठी पर्यवेक्षकांनी पटकन बोटात घातली. इतर पर्यवेक्षकांनाही द्या म्हणून अधिकच्या काही अंगठ्या त्याने दिल्या आणि त्याच भुयारातून अंतर्धान पावला. दुसर्‍या दिवशी इतर पर्यवेक्षकांनीही आनंदाने अंगठ्या घातल्या. मग ठरल्याप्रमाणे परीक्षेच्या दोन दिवस आधी पेपर फुटला. हे झालेच कसे हेच तपास यंत्रणांना समजेना! या फुटीमुळे देशभर हाहाकार उडाला. झुरळांना चेव आला. त्यांचे आंदोलन होण्याआधीच धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला.