अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात इराणला त्यांची संस्कृती समूळ नष्ट करण्याची धमकी दिली आणि सार्‍या जगाचे धाबे दणाणले. ट्रम्प यांच्या या धमकीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली. या धमकीनंतरही इराण तसूभरही मागे हटला नाही; उलट अशी धमकी प्रत्यक्ष कृतीत उतरवली, तर तिला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पडद्यामागून निश्चितच सूत्रे हलली असणार! पण, ट्रम्प यांची धमकी, ही धमकीच राहिली. ट्रम्प यांना नंतर एका पत्रकार परिषदेत अणुबॉम्बचा वापर करणार का, या विषयी एका पत्रकाराने थेट विचारले असता, त्यांनी अणुबॉम्ब कधीच वापरू नये, तो कुणाला वापरूही देता कामा नये, अशा आशयाचे विधान केले.

पश्चिम आशियातील अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमाची नोंद केली आहे. युद्धे होऊ नयेत आणि मानवाच्या आक्रमक स्वभावाला युद्धाच्या निर्णयापर्यंत येण्यावर एक प्रकारे जरब बसावी, हिंसा टळावी या उदात्त हेतूंनी (!) ज्या महासंहारक अस्त्राची, अण्वस्त्रांची निर्मिती झाली, तो हेतू आज पूर्णपणे यशस्वी झालेला दिसत नाही. अण्वस्त्रे आल्यानंतर युद्धे होणार नाहीत, या समजुतीला त्यामुळे छेद गेला आहे.

अण्वस्त्रे आणि त्यामुळे संभाव्य शांतता हा वाद जुना आहे. अमेरिकेने १९४५ मध्ये जपानविरुद्ध अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा वापर झाला नाही आणि होऊही नये. प्रामुख्याने शत्रूवर जरब बसावी, यासाठीचे अण्वस्त्र हे एक प्रमुख अस्त्र आहे. मात्र, अण्वस्त्रांच्या छायेतही आज पारंपरिक युद्धे होताना दिसतात. या ठिकाणी ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्यांच्या अण्वस्त्रधोरणाकडे पाहिले, तर अण्वस्त्रांची ही जरब किती मर्यादित आहे, हे कळते.

अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रसज्ज आहेत. इस्रायलकडेही अण्वस्त्रे असल्याचे मानले जाते. या प्रत्येक देशाच्या अण्वस्त्रवापराच्या धोरणांकडे पाहिल्यास, साधारणत: पुढील बाबी कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात. अण्वस्त्र नसलेल्या देशांवर अणुबॉम्बचा वापर नाही; अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही; देशावर मोठ्या संकटाची चाहूल लागली आणि अस्तित्वच पणाला लागले, तर अण्वस्त्राचा वापर; अण्वस्त्रांनी प्रथम कुणी हल्ला केला, तर प्रतिहल्ला म्हणून (सेकंड स्ट्राइक) अण्वस्त्राचा वापर; अण्वस्त्राचा प्रामुख्याने जरब (क्रेडिबल डिटरन्स) म्हणून वापर; आदी मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. ही धोरणे सरसकट सर्व देशांची सारखी नसून, यातील कमी-अधिक मुद्द्यांचा समावेश या देशांच्या धोरणांत आहे. यातील आशयाच्या दृष्टीने पाहिले, तर सामान्यत: लक्षात येते, की एखाद्या अण्वस्त्रसज्ज देशाच्या अस्तित्वालाच धोका असेल, तर संबंधित देश कदाचित अण्वस्त्रांचा वापर करील. ही धोरणे पाहिली, तर ट्रम्प यांच्या इराणची संस्कृती नष्ट करण्याच्या (अण्वस्त्रवापराच्या?) धमकीतील पोकळपणा लक्षात येतो. पाकिस्तानच्या नेत्यांनीही अण्वस्त्रवापराच्या बाबतीत अनेकदा बेजबाबदार विधाने केली आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पाकिस्तानने मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये ‘आमच्या अस्तित्वाला धोका झाला, आणि आमचा विनाश अटळ असेल, तर आमच्याबरोबर निम्म्या जगाला घेऊन आम्ही मरू,’ असे आक्षेपार्ह विधान केले होते. अशी बेजबाबदार विधाने टाळायला हवीत. अण्वस्त्रांची जरब खरे तर इतकी आहे, की सामरिक क्षेत्रात अण्वस्त्रे हा शब्दच कुणी उच्चारत नाही. स्ट्रॅटेजिक बॉम्ब, स्ट्रॅटेजिक कमांड असे पर्यायी शब्द त्यासाठी वापरले जातात.

या सार्‍या बाबी लक्षात घेतल्यानंतरही आता प्रश्न उरतो, तो म्हणजे मग युद्धे का होत आहेत? एखाद्या देशाकडून (उदा. इराण) भविष्यात अण्वस्त्राचा (पर्यायाने अस्तित्वाचा) धोका निर्माण होऊ नये; एखाद्या देशाचे (अमेरिकेचे) वर्चस्व आपल्या (रशियाच्या) उंबरठ्यापर्यंत येऊ नये (रशिया-युक्रेन युद्ध); जागतिक महासत्तेचा, आर्थिक महासत्तेचा मुकुट अन्य कुणी हिरावून घेऊ नये; आंतरराष्ट्रीय ‘ऑर्डर’ आपल्याला हवी तशी असावी; या आणि अन्य राष्ट्रीय (आणि आंतरराष्ट्रीय) हितसंबंधांच्या चौकटीत सध्याची युद्धे होत आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

युद्ध (आण्विकही) आणि शांतता यांमधील चर्चेच्या विश्लेषणात जितके खोलवर जाऊ, तितकी ही चर्चा तत्त्वज्ञानाकडे वळून मानवी स्वभाव, भावभावना आणि प्रत्येकाचा मानवी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथवर जाते. युद्धासाठी आधुनिक शस्त्रे, आधुनिक तंत्रज्ञान, भक्कम अर्थव्यवस्था आदी मुद्दे महत्त्वाचे असतातच; पण युद्धाचा उगम एखाद्या व्यक्तीच्या, समूहाच्या मनातच प्रथमच तयार होतो. तसेच, सर्व आधुनिक सुसज्जतेबरोबरच युद्धे जिंकण्यात मानसिक आणि सामूहिक कणखरपणा अधिक महत्त्वाचा ठरतो. यालाच उत्तम सामरिक कौशल्याची, सामरिक नीतीची जोड मिळाली, तर युद्धातील विजय कुणीही थांबवू शकत नाही. एखादे युद्ध जिंकणे अथवा हरणे हे त्यामुळेच केवळ एखाद्या प्रदेशाचा भूगोल, त्या देशाकडील आधुनिक अद्ययावत प्रणाली यांवर ठरत नाही. तर, त्यासाठी इतर अनेक निकषांबरोबरच संबंधित देशांमधील सामूहिक मानवी जडणघडण आणि सामरिक नीतीवर ते ठरते.

या सार्‍या बाबी लक्षात घेतल्या, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या होत असलेल्या उलथापालथी थोड्या स्पष्ट होतील. अण्वस्त्रनिर्मितीनंतर लगेचच शीतयुद्धाला सुरुवात झाली. हे शीत असले, तरी दीर्घकाळ सुरू असलेले युद्धच होते. एका वेळी त्याचे थेट युद्धात रूपांतर होता होता टळले. अण्वस्त्रांच्या बाबतीतील अनेक संकल्पना या काळात तयार झाल्या. फर्स्ट स्ट्राइक, सेकंड स्ट्राइक, क्रेडिबल डिटरन्स, म्युच्युअल ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन या त्यातीलच काही संकल्पना. अण्वस्त्रांवर मर्यादा घालण्यासंबंधी, शस्त्रास्त्रनियंत्रणासंबंधीही चर्चा झाल्या. एकीकडे हे सारे होत असताना जगभरात प्रत्यक्ष संघर्षही होत होते. याच काळात भारत-पाकिस्तानमध्ये १९६५, १९७१ मध्ये युद्ध झाले. बांगलादेशाची निर्मिती झाली.

शीतयुद्धकाळाच्या तुलनेत सध्याची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. संघर्षाची व्याप्ती वाढून अनेक आयाम त्याला तयार झाले आहेत. अण्वस्त्रांची जरब असली, तरी ती मर्यादित (देशाच्या अस्तित्वाला धोका असेल, तरच या शक्तीचा वापर) असल्यामुळे युद्धे पूर्ण थांबतील, असे मानणे चुकीचे राहील. तसेच, एखाद्या युद्धात, एखाद्या महासत्तेलाही दीर्घकाळ लढत राहावे लागू शकते. सीरिया, इराक, अफगाणिस्तान आणि आता इराण या देशांमधील युद्धे आपल्याला लक्षात घ्यावी लागतील.

अणु-तंत्रज्ञान वास्तविक मानवाच्या खूप फायद्याचे आहे. या क्षेत्राला त्यामुळे केवळ अण्वस्त्रे आणि प्रतिबंधात्मक शक्ती (deterrence) आणि विनाशासाठीचा वापर यांपुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही. वैद्यकीय, ऊर्जा आणि कृषी क्षेत्रांतही या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. ऊर्जेच्या बाबतीत सांगायचे तर, अणुभट्ट्या संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीला गती देऊ शकतात. १९५० च्या दशकात अमेरिकेने ‘ॲटम्स फॉर पीस’ (शांततेसाठी अणुशक्ती) या कार्यक्रमाद्वारे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अणु-तंत्रज्ञानाचा वापर लष्करी कारणांसाठी करण्याचा मोह रोखता आला नाही. अणु-तंत्रज्ञानाच्या लष्करी वापरासाठीचा विचार आणि सामरिक नीतीची व्याप्ती इतकी वाढली आहे, की विकासासाठी त्याचा वापर करण्याच्या अत्यंत व्यावहारिक कल्पनेवरही त्याचे सावट पडले आहे.

अणु-तंत्रज्ञानाचा वापर लष्करी कारणांसाठी करण्यापासून इतर देशांना रोखण्यासाठी अमेरिका अजूनही धडपडत अण्वस्त्रनिर्मितीपासून आतापर्यंत त्यामुळेच सार्‍या मानवजातीला या तंत्रज्ञानाची गोड फळे चाखता आलेली नाहीत. राजकीय संघर्ष, परस्परांवरील अविश्वास आणि भीतीचे वातावरण असलेल्या या गुंतागुंतीच्या परिस्थितीत, संपूर्ण मानवजातीच्या जलद आर्थिक विकासासाठी अणु-तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. सत्तासंघर्षाच्या या खेळात चिरकाल टिकणारी शांतता अनुभवायची असेल, तर तत्त्वज्ञानाच्या अभेद्य अशा मानवी मूल्यांवर आधारित ‘ग्रँड स्ट्रॅटेजी’ जागतिक महासत्तांना तयार करावी लागेल. मानवाच्या समृद्धीचा मार्ग युद्धापेक्षा शांततेतून गेला, तर ते सार्‍या सृष्टीच्याच हिताचे आहे.