ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यात रखडलेल्या २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका ५० टक्क्यांच्या मर्यादेतच घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महायुती सरकारची पंचाईत झाली आहे. राज्यातील स्थानिक निवडणुकांत ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले जाईल असे जाहीर आश्वासन भाजपने सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात दिले होते. त्याचा मोठा फायदा या पक्षाला मिळून, कधीकाळी काँग्रेसकडे असलेला हा प्रवर्ग भाजपकडे झुकला व सध्या तो या पक्षाची मतपेढी म्हणून ओळखला जातो. न्यायालयाच्या निर्णयामुळे या पेढीलाच दुखावण्याची वेळ भाजपवर आली आहे. देशात पंचायत राज कायदा लागू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू झाले. ओबीसींसाठी हा निकष लागू करण्यात आला नाही कारण या प्रवर्गाची स्वतंत्र गणनाच होत नव्हती. नंतर ओबीसींना आपल्या बाजूने वळवण्याच्या नादात अनेक राज्य सरकारांनी मंडल आयोगाच्या शिफारशींचा आधार घेऊन स्थानिक पातळीवर २७ टक्के आरक्षण देणे सुरू केले. यामुळे अनुसूचित जाती वा जमातींचे लोकसंख्या प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा आरक्षित राहू लागल्या. ‘मंडल’ विषयी सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ आदेशांचे हे उल्लंघन, म्हणून काहींनी याचिका केल्यावर ओबीसींना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचा इम्पीरिकल डेटा गोळा करा असे न्यायालयाने सांगितले. आजवर अनेक याचिका झाल्या पण हे २७ टक्क्यांचे आरक्षण न्यायालयाने मान्य केले नाही. या संवर्गाची स्वतंत्र जनगणना किंवा पंचायतराज कायद्यातील ‘कलम २४३’ मध्ये सुधारणा करून स्थानिक पातळीवर आरक्षणाची मर्यादा वाढवणे हे दोनच पर्याय असल्याचे स्पष्ट झाले. मात्र भाजप या दोन्ही पर्यायांना तयार नाही.

देशभरातील ओबीसी संघटनांनी जनगणनेत या संवर्गाचा स्वतंत्र रकाना ठेवण्याची मागणी केली. ती अनेक केंद्रीय मंत्र्यांनी ‘मान्य’ केली, पण आता सुरू झालेल्या गणनेत हा रकानाच नाही. कलम २४३ मध्ये सुधारणा करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हा निकष काढून टाका व अनुसूचित जातींना १५, जमातींना ७.५ टक्के तसेच ओबीसींना २७ टक्के निश्चित आरक्षण लागू करा अशी या संघटनांची दुसरी मागणी होती. त्यावरही सत्ताधारी मौन आहेत. ओबीसी आरक्षण नेमके किती द्यायचे याचा सोक्षमोक्ष न लावता त्यावरुन या संवर्गाला केवळ लालूच दाखवण्याचे काम वेगवेगळ्या राज्यातील भाजपची सरकारे करु लागली आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातही, पहिल्या टप्प्यात झालेल्या पालिका निवडणुकीत अनेक जिल्ह्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेली. त्यावरून पुन्हा कोर्टबाजी सुरू झाली. सर्वोच्च न्यायालयात याचा निकाल लागेपर्यंत पालिका निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन बरीच पुढे गेल्याने, न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला नाही व वाढीव आरक्षणासह या निवडणुका पार पडल्या. नंतर होणार्‍या जि. प. निवडणुकांसाठी मात्र न्यायालयाने ५० टक्क्यांचा दंडक घालून दिला. त्यामुळे राज्यात ३२ पैकी १२च जिल्ह्यांत निवडणूक होऊ शकली. कारण येथे आरक्षणाने मर्यादा ओलांडली नव्हती. आता विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील २० ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणूका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सर्व ठिकाणी ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले तर मर्यादा ओलांडली जाते.

या पेचावर उत्तर शोधण्याऐवजी आता राज्य सरकार दुष्काळाचे कारण सांगून निवडणूक पुढे ढकलत राहील; हा नवा आदेश देताना न्यायालयाने निवडणूक घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घालून न दिल्याचा फायदा घेईल, हीच शक्यता अधिक. जि. प. निवडणुका पक्षचिन्हावर होत असल्याने सरकार पुन्हा ओबीसींना दुखावण्याची जोखीम घेईल का हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारने आरक्षणाची मर्यादा ओलांडून ओबीसींना खूश करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर पराभूत उमेदवार न्यायालयात गेल्याने या प्रवर्गातील निवडणुका रद्द कराव्या लागल्या. आता पालिकांबाबतही काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने तेच घडण्याची शक्यता आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर २७ टक्के आरक्षणाचा मुद्दा धरून ठेवला तरी पंचाईत व सोडून दिला तरी अडचण असा पेच प्रामुख्याने भाजपसमोर असल्याने ओबीसींना दिलेली आश्वासने अधांतरी ठेवली जातील, असे दिसते.