मारूफ रझा यांची ओळख संरक्षणविषयक लेखक अशी असली, तरी सर्वसामान्यांमध्ये ते अधिक परिचित होते चित्रवाणी वृत्तवाहिन्यांतील चर्चांतही त्यांचा अभ्यासूपणा दिसल्यामुळे. संरक्षणविषयक लिखाणाआधीच लष्कराचा १९८० ते १९९४ असा दीर्घकाळाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना होता. त्यामुळेच, ‘लष्कराची बाजू व संरक्षण-अभ्यास यांचा मेळ घालणारा विश्लेषक गेला’ अशी खंत २६ फेब्रुवारीस त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली.

मारूफ यांचे वडील ब्रिगेडियर एम. एम. रझा हेही भारतीय लष्करातील ‘ग्रेनेडिअर्स’ या आद्य तोफदलात होते. मारूफ यांचे बालपण लष्करी उच्चाधिकार्‍यांच्या मुलांप्रमाणेच सुख/शिस्तीचे होते. अजमेरच्या प्रख्यात ‘मेयो कॉलेज’मधून १९७५ मध्ये शालान्त परीक्षा दिल्यावर दिल्लीच्या उच्चभ्रू ‘स्टीफन्स कॉलेजा’त इतिहास विषय घेऊन बीए, लंडनच्या ‘किंग्ज कॉलेज’मध्ये उच्चशिक्षण व लष्करासाठी निवड झाल्यावर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतून (आयएमए)१९८० साली ‘ग्रेनेडिअर्स’च्या सहाव्या तुकडीत मारूफ रुजू झाले. पुढे या तुकडीचे नाव ‘१४- मेकॅनाइज्ड इन्फंट्री’ असे झाले. ईशान्येतली घुसखोरी रोखण्याचा अनुभव त्यांनी मिळवला. लष्करात असतानाही शिक्षण त्यांनी सोडले नाही. ते एम.फिल. झाले. ‘आयएमए’मध्येच शिकवू लागले. तिथून १९९४ मध्ये निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर पुढल्याच वर्षात मारूफ रझा यांचे ‘लो इन्टेन्सिटी कॉ्फ्लिलक्ट्स’ हे पुस्तक बाजारात आले, याचे कारण एम.फिल.साठी त्यांनी केलेला अभ्यास. ‘कमी क्षमतेच्या- पण तात्कालिक राजकीय/ मानसशास्त्रीय दबाव आणणार्‍या चकमकी’ हाच मोठ्या आक्रमणाऐवजी युद्धांचा मार्ग राहणार, असा इशारा देणारे हे पुस्तक. काश्मीर सीमाभागात बर्फ वितळताना होणारी घुसखोरी आणि १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका अशा कारवाया पाकिस्तानी ‘आयएसआय’ करत असल्याचा तत्कालीन संदर्भ या लिखाणाला असला तरी, जगभरातल्या संघर्षाचे भान ठेवून मारूफ रझा यांची मांडणी होती. त्यामुळे त्यानंतर चार वर्षांनी पाकिस्तानी लष्कराने घडवलेली कारगिलची कुरापत; सरत्या २००१ मध्ये संसद भवनाच्या आवारात अतिरेक्यांचे घुसणे, २००८ चे ‘२६/११’ आणि पुढे उरी, पुलवामा, पहलगाम… अशा प्रत्येक वेळी या पुस्तकाचा संदर्भ येत राहिला. पण लगेच १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘वॉर्स ॲण्ड नो पीस इन कश्मीर’मधून मारूफ रझा यांचे व्यक्तित्वही दिसले. आधीचे पुस्तक विद्वत्तापूर्ण, काहीसे कोरडे; तर हे पुस्तक तोच इशारा लोकांपर्यंत पोहोचवणारे ठरले. यानंतरचे ‘काश्मीर्स अनटोल्ड स्टोरी’ हे इक्बालचंद्र मल्होत्रा यांच्यासह लिहिलेले पुस्तक त्रुटीपूर्ण असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला. पण तोवर ‘सॅल्यूट’ नियतकालिक सुरू करून त्याचे संपादन, ‘हर-आनंद पब्लिकेशन्स’ या प्रकाशन संस्थेसाठी संरक्षणविषयक पुस्तकाचे संपादन अशा कामांत ते गढून गेले होते.

कोविडकाळ सरता-सरता चीन-भारत सीमावादाबद्दल त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले, त्यात ‘ब्रिगेडियर थोरात व नेहरू’ प्रकरणाचा रसभरित उल्लेख होता; ‘डोकलामच्या तिढ्यात संरक्षणदृष्ट्या आपण अधिक चांगली कामगिरी करू शकलो’ अशी प्रशस्तीही होती- त्यासाठी ‘पर्वतराजीतल्या संघर्षात जो वरच्या भागात असतो तो अधिक चांगली कामगिरी करणारच’ असे कारण त्यांनी दिले होते. अशा वेळोवेळी मांडलेल्या मतांसाठी आणि ‘मेजर (निवृत्त)’ असे बिरुद लावण्याचा आग्रह न धरता ‘सिव्हिलियन’ नावानेच वावरले, म्हणूनही ते लक्षात राहतील!