scorecardresearch

Premium

खेळ, खेळी खेळिया : उसन्या उत्साहाची ‘नकोशी’ स्पर्धा!

ज्या एकदिवसीय क्रिकेटविषयी व्यवस्थेतील बहुतांना कोणतीही आस्था उरलेली नाही, त्या प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य फार उज्ज्वल नाही. विश्वचषक स्पर्धा चतुर्वाषिक जत्रेपलीकडे फार काही राहिलेली नाही.

batball

सिद्धार्थ खांडेकर
जगातील बहुतेक प्रमुख खेळांमध्ये- ज्यांना मोठा रसिकाधार आणि अखंड उत्पन्नस्रोत आहे- सांघिक विश्वचषक स्पर्धा म्हटली, की टप्प्याटप्प्याने सहभागी संघांची संख्या वाढवण्याकडे कल दिसून येतो. फुटबॉलचे खणखणीत उदाहरण सर्वासमोर आहेच. १९८२पासून (२४) पुढील २०२६ विश्वचषकापर्यंतच्या (४८) ४४ वर्षांत सहभागी संघांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. इतरही खेळांची उदाहरणे देता येतील. अपवाद क्रिकेटचा! १९७५मध्ये पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकात आठ संघांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काही स्पर्धामध्ये आठच संघ सहभागी झाले. हा आकडा पुढे १०, १२, १४, १६ असा वाढत गेला. परंतु २०१९मधील स्पर्धेपासून ही संख्या पुन्हा १० वर आली. यंदाही भारतातील स्पर्धेत १० संघच खेळतील. यावेळी माजी विजेते वेस्ट इंडिज, तसेच झिम्बाब्वे, आर्यलड हे संघ दिसणार नाहीत. ते पात्रता फेऱ्यांमध्ये पराभूत झाले.

एका अर्थी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चुरस वाढल्याचा पुरावा मानला जाऊ शकतो. पण यंदा नेदरलँड्स वगळता सर्वच संघ हे कसोटी दर्जा मिळालेले म्हणजेच प्रस्थापित संघ आहे. शिवाय चुरस वाढू लागल्याचा पुरावा ठरलेले अनेक संघ एव्हाना विस्मृतीत गेले, त्याचे काय? चुरस वाढल्याने एकदिवसीय क्रिकेटचा पसारा काही वाढला नाही. उलट २०१९ आणि २०२३ अशा दोन विश्वचषकांमध्ये तो आक्रसतानाच दिसतो आहे. झिम्बाब्वे, केनिया, आर्यलड, बांगलादेश अशा काही धक्कादायी संघांपैकी केवळ बांगलादेशच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये स्थिरावला. बाकीचे परिघावर किंवा परिघाबाहेरच राहिले. तेव्हा दोन वेळच्या माजी विजेत्या वेस्ट इंडिजची अनुपस्थिती ही ‘गुणात्मक वाढ’ नसून ‘संख्यात्मक’ घट ठरते. सन २०२७मधील विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होत आहे. नामिबिया यापूर्वी २००३मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियामध्ये झालेल्या विश्वचषकात सहभागी झाला होता. त्यानंतर लुप्त झाला. पुढील विश्वचषकाच्या निमित्ताने तो पुन्हा प्रकट होईल. पण हे प्रकटणे सहयजमान म्हणून असेल. इतक्या काळात नामिबियातील क्रिकेट विकासाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कोणती पावले उचलली, केनियासारख्या झुंजार संघाला क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय प्रयत्न केले, हे आता विचारण्याची सोय नाही. तथाकथित दुबळय़ा संघांचे सामने म्हणजे प्रेक्षकवर्ग नाही आणि टीव्ही तसेच डिजिटल प्रसारणादरम्यान जाहिरातींमधून उत्पन्न नाही, असे क्रिकेट प्रशासनातली कॉर्पोरेट मंडळी अलीकडे वारंवार सांगत असतात.

Limited overs cricket matches
क्रिकेटला संजीवनी देणारे मर्यादित षटकांचे सामने…
ahamdabad stadium
अग्रलेख: पितृपक्षातला क्रिकेटोत्सव!
19th Asian Games in Hangzhou 2023
Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव
World Cup 2023: Big blow to Team India from World Cup 2023 Akshar Patel may be out BCCI hints
World Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! वर्ल्डकप २०२३ मधून ‘हा’ खेळाडू होऊ शकतो बाहेर, BCCIने दिले संकेत

असाच ‘दुबळा’ संघ एके काळी भारताचा होता. कोणे एके काळी अशाच दोन ‘दुबळय़ा’ संघांतील सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याचीदेखील तसदी त्यावेळच्या संयोजकांनी घेतली नव्हती. त्या सामन्यात काही विक्रम मोडीत निघाले आणि नवीन विश्वविजेता होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊलही टाकले गेले. भारत वि. झिम्बाब्वे सामन्याची पूर्ण व अधिकृत चलचित्रफीत निव्वळ संयोजकांच्या बेफिकिरीमुळे आणि अज्ञानामुळे जगासमोर येऊ शकली नाही. भारताने स्वयंप्रेरणेने आणि स्वबळावर क्रिकेटमध्ये स्वत:चे अस्तित्व आणि दरारा निर्माण केला. परंतु व्यवस्थेचे असे दुर्लक्ष झुगारून उभे राहण्याची क्षमता प्रत्येक संघात नसते. हेच थोडय़ाफार प्रमाणात श्रीलंकेनेही करून दाखवले. १९९२मध्ये त्यांचा भारताविरुद्धचा सामना अत्यंत दुय्यम मैदानावर खेळवला गेला, तो पावसामुळे धुवून निघाला. श्रीलंकेने पुढील स्पर्धेत विश्वचषक जिंकून दाखवलाच.

बांगलादेश हा इतर ‘दुबळय़ां’च्या तुलनेत अधिक नशीबवान ठरला. बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश तत्कालीन आयसीसी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या वरदहस्तामुळे सुकर झाला. पण हा अपवाद. शिवाय बांगलादेश आज एक बऱ्यापैकी गुणवान संघ म्हणून ओळखला जातो. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ही आजही क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. पण या स्पर्धेच्या भवितव्याविषयीच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तेव्हा इंग्लंड आणि भारत या प्रमुख देशांमध्ये आधुनिक काळात झालेल्या व होत असलेल्या विश्वचषकांमध्ये संघांची संख्या आक्रसते आहे, हा निव्वळ योगायोग नाही.

अलीकडे आयसीसीमार्फत टी-२० विश्वचषक स्पर्धाही वरचेवर भरवली जाते. शिवाय एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारांमध्ये महिला विश्वचषक स्पर्धाही खेळवल्या जातात. पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे कवित्व फारसे नाही, कारण टी-२० या प्रकारात जगभर आयपीएलसह अनेक लीग सुरू असतात. परंतु एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे तसे नाही. बदलत्या काळात, नवीन पिढीसाठी, नवीन ग्राहकांसाठी टी-२० हाच आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे जाहिरातीही अधिक आणि मार्केटिंग याच प्रकाराचे अधिक करावे लागते याकडे लक्ष वेधले जाते. त्यात तथ्य आहे. वेस्ट इंडिजचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. या संघातील मुख्य प्रवाहातील बहुतेक खेळाडू जगभर टी-२० फ्रँचायझी क्रिकेट खेळत असतात. ही मंडळी म्हणजे खऱ्या अर्थाने ‘भाडोत्री क्रिकेटपटू’च. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची कामगिरी सुमार होते आणि यंदा तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत या संघाला पात्रता फेरीचा टप्पाही ओलांडता येत नाही यात फार आश्चर्य नाही. परंतु फ्रँचायझी क्रिकेटमुळे एका माजी विजेत्या संघाची अशी वाताहत लागत असेल, तर तक्रार कोणाकडे करायची? कारण आयसीसीच्या सदस्य मंडळांच्या संमतीशिवाय जगात कुठेही फ्रँचायझी क्रिकेट खेळवले जाऊ शकत नाही. हे क्रिकेट सध्या जवळपास १२ महिने सुरू असते, त्यामुळे द्विराष्ट्रीय मालिकांना फारसा अवकाशच (विंडो) उरलेला नाही. त्या झाल्याच तर त्यातही टी-२० सामन्यांना प्राधान्य मिळते. ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या संघांचा समावेश असल्यास त्यानंतरचे प्राधान्य कसोटी सामन्यांना. एकदिवसीय क्रिकेट प्राधान्यक्रमातही तिसऱ्या क्रमांकावर. त्यामुळे चँपियन्स करंडक किंवा विश्वचषक सोडल्यास एरवी एकदिवसीय सामने खेळवण्याचे प्रयोजनच संपुष्टात येऊ लागले आहे.

मध्यंतरी मेरिलिबॉन क्रिकेट क्लब (एमसीसी) या प्रतिष्ठित संस्थेने आयसीसीकडे एक प्रस्ताव पाठवला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आधीचे वर्ष वगळता, एरवीच्या काळात एकदिवसीय क्रिकेट खेळवलेच जाऊ नये असा त्या प्रस्तावाचा एकंदरीत सूर! म्हणजे ज्या संस्थेकडे या खेळातील नियम बनवण्याचे आणि विकसित करण्याचे काम आहे, त्या संस्थेनेच एकदिवसीय क्रिकेटचे ‘नकोसेपण’ अधोरेखित केले. ज्या प्रकाराविषयी क्रिकेट व्यवस्थेतील बहुतांना कोणतीही आस्था उरलेली नाही, त्या प्रकारातील विश्वचषक स्पर्धेचे भवितव्य फार उज्ज्वल नाही. एकदिवसीय क्रिकेट अधिक रंजक बनवण्यासाठी काही बदलांचा विचार आवर्जून करावा, असे सचिन तेंडुलकरसारख्यांनी वेळोवेळी सुचवून पाहिले. सचिनने स्वत: २५ षटकांच्या छोटय़ा इिनगचा प्रस्ताव मांडला होता. ५० षटकांच्या दोन डावांऐवजी २५-२५ षटकांचे चार डाव खेळवले जावेत, अशी ती सूचना होती. इयन चॅपेल यांनी किमान एक गोलंदाजाला दहापेक्षा अधिक षटके टाकू द्यावीत, अशी सूचना मांडली होती.

गेल्या ५० वर्षांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये जे बदल झाले, ते बरेचसे ‘कॉस्मेटिक’ किंवा वरवरचे असेच होते. बदल हे दोन प्रकारचे असतात. कालानुरूप आणि परिस्थितीनुरूप. कालानुरूप बदल एकदिवसीय क्रिकेटमध्ये आले, परंतु टी-२०च्या उदयानंतर बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणारे बदल या प्रकारात अजूनही दिसत नाहीत. एके काळी एकदिवसीय क्रिकेटला रंजक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ऑस्ट्रेलियाचे प्राधान्य बदलले. भारत आणि इंग्लंडही त्याच मार्गाने गेले. आयपीएलने या प्रमुख मंडळांचा आणि त्यांच्या मागोमाग इतर मंडळांचा प्राधान्यक्रमच बदलून टाकला. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटला कोणी वाली उरला नाही. त्यामुळेच या प्रकारातील सर्वात मोठा उत्सव अर्थात विश्वचषक स्पर्धा ही चतुर्वाषिक जत्रेपलीकडे फार काही राहिलेली नाही. यंदा ती भारतात भरत आहे. या स्पर्धेत भारत जिंकला, तर ठीक. नाहीतर एकदिवसीय विश्वचषक आणि यानिमित्ताने एकदिवसीय क्रिकेटचाच अपमृत्यू फार दूर नाही!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odi cricket of the world cup tournament competitions ysh

First published on: 30-09-2023 at 03:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×