‘ऑलिम्पिक आख्यान’ या सदराच्या माध्यमातून आधुनिक उन्हाळी ऑलिम्पिकचा उगम आणि विकास कसा होत गेला याचा धावता धांडोळा घेतला गेला. मूळ ऑलिम्पिकची संकल्पना ग्रीक. ती वाढवण्यात, जतन करण्यात योगदान राहिले रोमनांचे. तिचे पुनरुज्जीवन केले पिअर द कुबर्ता या फ्रेंच व्यक्तीने. आधुनिक ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा मानही पुन्हा एकदा अथेन्स १८९६च्या निमित्ताने ग्रीसलाच मिळाला. तरी या खेळांच्या मागे प्रेरणा होती ब्रिटिश क्रीडाप्रेमी संस्कृतीची आणि खर्‍या अर्थाने पहिले यशस्वी ऑलिम्पिकही (लंडन १९०८) भरवले ते ब्रिटननेच. युद्धोत्तर विध्वंसानंतर पहिले आशादायी ऑलिम्पिक भरले, तेही १९४८ मध्ये लंडनलाच. युरोपच्या भूमीवर जन्माला आलेला हा अस्सल मानवी अभिव्यक्तीचा आविष्कार संपू नये, विझू नये, मिटू नये यासाठी किती-किती व्यक्तींनी योगदान दिले याची निव्वळ यादीच एखाद्या शब्दकोशापेक्षा मोठी व्हायची. दोन महायुद्धे, महासत्तांमधील प्रदीर्घ शीतयुद्ध, दहशतवाद, आर्थिक मंदी, महासाथी या संकटांनी काही वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खंड पडला किंवा तसा धोका उत्पन्न झाला. पण हे खंड तात्कालिक ठरले, ठरवले गेले. म्युनिच १९७२ मध्ये दहशतवाद्यांच्या शस्त्रांनी खेळाडूंचा जीव घेतला. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्तांचे शीतयुद्ध ऑलिम्पिकच्या मैदानावर पसरले आणि १९८० व १९८४ या स्पर्धांचे अस्तित्वच धोक्यात घालणारे ठरले. ऑलिम्पिकच्या माध्यमातून सामर्थ्य दाखवण्याची आणि त्यानिमित्ताने प्रतिमासंवर्धन करण्याची गरज नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरला वाटली. प्रतिमासंवर्धन याच उद्देशापायी आद्य कम्युनिस्ट रशियाने १९८० मध्ये आणि आधुनिक कम्युनिस्ट चीनने २००८ मध्ये ऑलिम्पिक भरवले. पहिला प्रयत्न फसला, दुसरा कमालीचा यशस्वी ठरला. सेंट लुईस १९०४ ऑलिम्पिकमध्ये एक्स्पोझिशनच्या बरोबरीने क्रीडा स्पर्धा भरवण्यात आल्या. त्या प्रदर्शनाच्या एका विभागात ‘सॅव्हेज’ किंवा मूळ निवासी, आदिवासी समुदायातील नागरिकांचे ‘प्रदर्शन’ मांडले गेले. युरोपबाहेरील आणि अमेरिकेतील ते पहिलेच ऑलिम्पिक अशा रीतीने डागाळलेले ठरले. त्याच अमेरिकेने पुढे आणखी तीन ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या आणि आगामी ऑलिम्पिकही तेथेच होत आहे. गौरेतर आणि गुलामगिरीच्या जोखडातून गतशतकाच्या मध्यमावर स्वतंत्र झालेले आशियाई आणि आफ्रिकी देश यांनी ऑलिम्पिककडे केवळ गोर्‍यांनी गोर्‍यांसाठी निर्माण केलेली स्पर्धा म्हणून पाहिले नाही. त्यांतील अनेक देश, खेळाडू आत्मविश्वासाने, अभिमानाने ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. भारतीय हॉकी संघाने १९२८ ते १९४८ या काळात प्राधान्याने गोर्‍या संघांना धूळ चारून सोने लुटले. या ‘नेटिव्हां’शी भिडायला कधी काळी थेट ‘साहेब’ कचरला. ऑलिम्पिक पदके मिळूनही मेक्सिको सिटी १९६८ स्पर्धेत भर वितरण समारंभात टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस या दोन अमेरिकी खेळाडूंनी त्या देशातील कृष्णवर्णीयांच्या अव्हेराचा हाताच्या मुठी उंचावून निषेध व्यक्त केला. त्याच स्पर्धेत बॉब बीमन या आणखी एका कृष्णवर्णी खेळाडूने ८.९० मीटरची ‘अमानवी’ लांब उडी मारून गौरेतरांचा ध्वज फडकवत ठेवला. तर १९७६ मधील माँट्रिएल ऑलिम्पिकवर दोन डझन आफ्रिकी देशांनी बहिष्कार घातला, ज्याचा संबंध दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांशी होता.

ऑलिम्पिक चळवळीने तगून, टिकून राहताना असे अडथळे, आव्हाने पाहिली, तसेच भावनांच्या हुंकारासाठी हक्काचे व्यासपीठही मिळवून दिले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची वार्षिक अधिवेशने, अमेरिकी अध्यक्षांची ‘स्टेट ऑफ द युनियन’ वार्षिक भाषणे, पूर्वीच्या सोव्हिएत रशियातील मे महिन्यातली संचलने, अलीकडच्या चीनमधील एकल सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय अधिवेशने या विशाल व्यासपीठांवरून जितके राजकीय विचार नि हुंकार व्यक्त होत नाहीत, तितके ते बराच काळ ऑलिम्पिकमधून व्यक्त व्हायचे, हे या चळवळीचे यश नक्कीच. कारण या ऑलिम्पिकवर खेळाडूंनी, सरकारांनी, विचारवंतांनी, विश्लेषकांनी, उद्योगपतींनी प्रेम केले. मानवजातीने प्रेम केले. यातूनच हा पसारा उभा राहिला नि टिकला. पण तो आता अवाढव्य झाला आहे. अमर्याद आणि अनिर्बंध वाढतो आहे. सुरुवातीच्या स्पर्धा (ग्रीसचा अपवाद वगळता) प्रामुख्याने उद्योगप्रधान आणि वसाहतींच्या लुटीतून फुगलेल्या महासत्तांनी भरवल्या. गतशतकाच्या दुसर्‍या पन्नाशीत तत्कालीन जपान, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, दक्षिण कोरिया या देशांनी ऑलिम्पिक भरवून दाखवले. यजमानपद ही केवळ युरोप वा अमेरिकेतील देशांची मक्तेदारी राहिली नाही. तर उद्योगप्रधान, व्यापारप्रधान, प्रगत असूनही स्वीडन, बेल्जियम, नेदरलँड्स, फिनलंड, कॅनडा हे देश दुसर्‍यांदा ऑलिम्पिक भरवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. महाकाय आणि संसाधनसमृद्ध असूनही सोव्हिएत रशियाला एकदाच ऑलिम्पिक भरवता आले. नवीन सहस्रकात ग्रीस (अथेन्स २००४), चीन (बीजिंग २००८) आणि ब्राझील (रिओ २०१६) या विकसनशील देशांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या. भारताच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या आकांक्षांकडे या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल.

ऑलिम्पिक २०३६… काही आव्हाने!

भारताच्या आधी जपान, दक्षिण कोरिया आणि चीन या आशियाई देशांनी ऑलिम्पिक भरवलेले आहे. पण हे तीनही देश गेल्या शतकापासूनच ऑलिम्पिक पदकतालिकेत अस्तित्व दाखवू लागले होते, नवीन शतकात तर चीन हा ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेला टक्कर देतो. जपान आणि सोल ऑलिम्पिक १९८८ नंतर दक्षिण कोरिया हेदेखील चीनइतके नाही तरी अनेक खेळांमध्ये सुवर्णपदकाचे दावेदार मानले जातात. यांच्या तुलनेत आपल्याकडील चित्र काय आहे? नॉर्मन प्रिचार्ड यांनी पॅरिस १९०० मध्ये दोन रौप्यपदके जिंकली. त्यानंतर हॉकीमध्ये सलग सहा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकांचा सुवर्णकाळ वगळता भारत आणि ऑलिम्पिक हे समीकरण फार यशस्वी ठरू शकलेले नाही. खाशाबा जाधवांचे १९५२ मधील कुस्ती पदक लखलखीत अपवाद होता. पुढे वैयक्तिक पदक मिळण्यासाठी आणखी ४४ वर्षे वाट पाहावी लागली. या काळात हॉकीतील हक्काची पदकेही आटली. नवीन शतकात अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा यांच्या वैयक्तिक सुवर्णपदकांमुळे झाकोळ काहीसा प्रकाशमान झाला इतकेच. भारताच्या खात्यात १९०० पासून इनमिन ४१ पदके जमा झालेली आहेत. यात १० सुवर्ण, १० रौप्य आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. सुवर्णपदकांमध्ये ८ हॉकीतील (या खेळात एकूण १३ पदके) आहेत. याशिवाय ॲथलेटिक्स (४), कुस्ती (८), नेमबाजी (७), बॉक्सिंग (३), बॅडमिंटन (३), वेटलिफ्टिंग (२), टेनिस (१) या खेळांमध्ये आपली पदककमाई आहे. यात आता टेनिसमध्ये नजीकच्या काळात पदक मिळण्याचा संभव नाही. तरीदेखील ४१ पदके चीन, जपान आणि कोरियासमोर फिकी ठरतात हे मान्य करावे लागेल. ऑलिम्पिक भरवण्याची क्षमता म्हणजे निव्वळ पायाभूत सुविधांची उभारणी नव्हे. उद्या फिफा विश्वचषक फुटबॉल आपण भरवला, तरी त्यात फुटबॉलच्या मैदानावर आपण काय दाखवतो यालाही महत्त्व असते. तेव्हा ऑलिम्पिक भरवायचे असेल, तर लॉस एंजलिस (२०२८), ब्रिस्बेन (२०३२) या स्पर्धांमध्येच एक आकडी पदककमाईवर जल्लोष करण्याची सवय सोडावी लागेल. परिस्थिती थोडीफार आशादायी आहे. विशेषत: ॲथलेटिक्समध्ये अलीकडच्या काळात ज्युनियर आणि सीनियर पातळीवर अशा क्रीडाप्रकारांमध्ये आपण चमकलो जेथे यापूर्वी भारताचे अस्तित्वही नव्हते. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन या देशांनी ऑलिम्पिकच्या मैदानांवर सामर्थ्य दाखवले. हे सामर्थ्य केवळ सामरिक आघाडीवर दाखवता उपयोगाचे नाही, याचे भान आपल्याला यायला पाहिजे. इतर बहुतेक सर्व ऑलिम्पिक यजमानांच्या तुलनेत भारतात दारिद्र्य, बेरोजगारी, रोगराई, विषमता अधिक आणि रौद्र आहे. पण इतक्या समस्या असलेले फारच थोडे देश ऑलिम्पिक भरवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. विकसित भारत २०४७ हे विद्यमान राज्यकर्त्यांचे लाडके स्वप्न आहे. त्या मार्गावर विकसित क्रीडासत्ता म्हणून २०३६ मध्ये झळकणे हे महत्त्वाचे पाऊल ठरते. भारताची ही भरारी ऑलिम्पिक चळवळीलाही समृद्ध करणारीच ठरेल. पिअर द कुबर्तांच्या स्वप्नातील व्यापकता आणि अर्थ ऑलिम्पिकला प्राप्त होईल.