सर्गेइ बुब्का हा ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध पोल व्हॉल्टपटू. त्याने तब्बल ३५ वेळा स्वत:चाच विश्वविक्रम मोडला! पण त्याच्या दृष्टीने ऑलिम्पिक सुवर्णपदक हाच त्याच्या आयुष्यातील सर्वांत महान क्षण…
‘तुझ्या दृष्टीने तुझ्या आयुष्यातील सर्वांत आवडता क्षण कोणता?’… ‘मला १९८८ च्या सोल (सेऊल) ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले, तो.’ इति सर्गेइ बुब्का. कोण हा बुब्का? ‘जेन झी’चा जन्म व्हायच्या आधीच ज्याने, ‘कदाचित २१व्या शतकात शक्य होईल,’ असे म्हटले जाई, असा इतिहास हे शतक उजाडण्यापूर्वीच रचला, तो. त्याने कारकीर्दीला सुरुवात केली, तेव्हा तो सोव्हिएत महासंघाच्या झेंड्याखाली खेळला, सोव्हिएत महासंघ कोसळल्यानंतर तो युक्रेनियन झाला. आताही आहे.
सर्गेइ बुब्का नावाचा हा अवलिया ८० आणि ९०च्या दशकातील प्रसिद्ध पोल व्हॉल्टपटू, ज्याने तब्बल ३५ वेळा स्वत:चाच विश्वविक्रम मोडला. गंमत अशी, की त्याला जेव्हा जेव्हा त्याच्या क्रीडा आयुष्यातील सर्वांत आवडता क्षण कोणता, असे विचारले गेले, तेव्हा त्याला या लागोपाठ विक्रम रचण्या-मोडण्याचे फार अप्रूप वाटले नाही. त्याच्या दृष्टीने ऑलिम्पिक सुवर्णपदक हाच आयुष्यातील सर्वांत महान क्षण. असे का?
सर्गेइ बुब्काचा जन्म ४ डिसेंबर १९६३ चा, लुहान्स्कमधला. आता युक्रेनमध्ये असलेले शहर, तो जन्मला तेव्हा सोव्हिएत महासंघाचा भाग होते. बुब्का अवघ्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला. १९८३ च्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावून त्याचा पोल व्हॉल्टमधील दर्जा सिद्ध केला. तोवर या खेळात आघाडी होती फ्रेंच पोल व्हॉल्टपटू थिओरी व्हिनेरॉनची, ज्याचा उल्लेख बुब्काने आपल्या पाच सर्वांत कणखर स्पर्धकांत केला आहे.
रोममध्ये १९८४ मध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत या दोघांनी एकमेकांचे विक्रम मोडण्याचीच स्पर्धा केली होती. त्यात अखेर बुब्का विजेता ठरला होता. बुब्काचे वैशिष्ट्य असे, की त्याने १९८३ नंतर पुढे १४ वर्षांत झालेल्या पाचही जागतिक स्पर्धा सलग जिंकल्या. हाही विक्रमच. आणि सोव्हिएत महासंघातील कम्युनिस्ट राजवटीने प्रत्येक क्षेत्रात आपणच श्रेष्ठ आहोत, हे दाखवण्यासाठी क्रीडा क्षेत्रात घेतलेल्या प्रचंड मेहनतीचे फळही. ‘विक्रम रचा आणि रोख पैसे मिळवा,’ अशा चक्क योजनाच आणून या काळात सोव्हिएत महासंघाने खेळाडू तयार केले. बुब्काही त्याच योजनेचा लाभार्थी.
निराळे तंत्र
पोल व्हॉल्टसारख्या खेळात एखाद्या जिम्नॅस्टसारखी ताकद व चपळता, धावपटूसारखा वेग आणि नेमबाजासारखी अचूकता लागते. ‘पोल’च्या म्हणजे ज्या लवचीक काठीच्या आधारे खेळाडू उडी मारतो, ती विशिष्ट ठिकाणी रोवून किती वाकवली, की शरीर हवेत उंच फेकले जाईल, याचा अभ्यास करून सराव केला जातो.
बुब्का आणि त्याचा प्रशिक्षक व्हिताली पेत्रोव्ह यांनी थोडे वेगळे तंत्र वापरले. उडीच्या वेळी काठी घट्ट रोवून, वाकवून त्या आधारे उडीची उंची वाढवण्याऐवजी, ती अलगद रोवून, अधिक उभी ठेवून अधिक उंची गाठायची असे तंत्र त्यांनी तयार केले. त्यात उडी मारण्यासाठी येताना धावण्याच्या वेगाचाही विचार केला गेला. बुब्का शालेय जीवनात १०० मीटर शर्यतीतील स्पर्धक म्हणून उत्तम असल्याने त्याचा त्याला फायदा झाला. त्यावरच बुब्काने प्रचंड यश मिळविले. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत खरे तर त्याची स्पर्धा स्वत:शी, स्वत:च्या विक्रमांशीच होत राहिली.
बुब्काने पहिला विश्वविक्रम रचला १९८४ मध्ये. त्या वेळेस त्याने ५.८५ मीटर एवढ्या उंचीवरून उडी मारली. हा तो काळ होता, जेव्हा पोल व्हॉल्टमध्ये सहा मीटर उंचीचे अंतर कुणी पार करू शकेल, असे वाटतही नव्हते. बुब्काने मग तेच लक्ष्य ठेवले. त्याला नाव दिले, ‘मिशन इम्पॉसिबल’. एकेक सेंटीमीटरने आपली कामगिरी सुधारत बुब्काने वर्षभरातच म्हणजे जून १९८५ मध्ये सहा मीटरची उंची गाठली.
अशक्य वाटणारे असेच हे लक्ष्य. त्यातही सुधारणा करत दहा वर्षांत बुब्काने आणखी विक्रम रचले. त्यातील १९९४ मध्ये रचलेला ६.१४ मीटरचा विश्वविक्रम पुढे दोन दशके अबाधित राहिला. विक्रम मोडण्यासाठीच असतात, त्यामुळे बुब्काचा हा विक्रम कधी तरी मोडला जाणारच होता. पण, बुब्का स्वत: खेळत असताना बुब्काचे विक्रम बुब्कानेच मोडण्यासाठी रचलेले असतात, असे समीकरण होते, इतकी बुब्काने पोल व्हॉल्टमध्ये निर्विवाद ‘उंची’ गाठली होती. म्हणूनच तो सार्वकालिक महान.
पदकांच्या हुलकावण्या
अशा सार्वकालिक महान खेळाडूला तरीही ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकच का सर्वांत महत्त्वाचे वाटले असेल? कारण, कारकीर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर असतानाच्या तीन ऑलिम्पिक्समध्ये त्याला ते एकदाच मिळाले. कोणत्याही खेळाडूचे स्वाभाविक स्वप्न असते, तसे बुब्काचेही स्वप्न कायम ऑलिम्पिक सुवर्णपदकाचेच होते. त्याला ते मिळविण्याची पहिली संधी होती १९८४ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक्समध्ये. पण, सोव्हिएत महासंघाने या स्पर्धेवरच बहिष्कार घातल्याने त्याला स्पर्धेलाच जाता आले नाही.
नंतर १९८८ मध्ये झालेल्या सेऊल ऑलिम्पिक्समध्ये ही संधी मिळाली, जिचे त्याने सुवर्णपदक जिंकून सर्वार्थाने ‘सोने’ केले. पण, ही स्पर्धा जिंकताना त्याने नोंदवलेली ५.९० मीटर उंची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नव्हती. कारण, त्यापूर्वी तीनच वर्षांपूर्वी त्याने जागतिक स्पर्धेत सहा मीटर उंची गाठून ‘मिशन इम्पॉसिबल’ फतेह केले होते. ही ‘उंची’ आपल्याला ऑलिम्पिकमध्ये गाठता आली नाही, याची सल बुब्काच्या मनात राहूनच गेली.
ती काढून टाकण्यासाठी त्याने १९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिक्ससाठी खडतर मेहनत घेतली होती. पण, या स्पर्धेतील अंतिम फेरीत त्याचे ५.७० मीटर उंची गाठण्याचे पहिले दोन आणि नंतर ५.७५ मीटरचा एक, असे तिन्ही प्रयत्न फोल ठरले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मॅक्सिम तारासोव्ह हा बुब्का ज्या तालमीत तयार झाला, त्याच सोव्हिएत काळातील प्रशिक्षण सुविधांत शिकलेला. बुब्का म्हणतो, ‘मी त्याच्याकडून हरलो, कारण मी कशा प्रकारे स्पर्धेला सामोरे जाईन, याबाबतचे सगळे अंदाज त्याला सहज बांधता आले. माझ्यासाठी हा मोठा धडा होता.’ मग पुढचे लक्ष्य १९९६ चे ॲटलांटा ऑलिम्पिक्स.
लक्षात घ्या, या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू व्हायच्या आधीची दहा वर्षे सर्गेइ बुब्का पोल व्हॉल्ट प्रकारात अक्षरश: राज्य करत होता. त्याचा ६.१४ मीटरचा विश्वविक्रम १९९४ मध्येच प्रस्थापित झाला होता. एका अर्थाने अटलांटातील ऑलिम्पिक स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम काळात होत असलेली स्पर्धा होती. पण स्पर्धेला सुरुवात व्हायच्या काही काळ आधी बुब्काला दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला फ्रान्सचा जीन गाल्फिओनी काय, किंवा बार्सिलोनात जिंकलेला मॅक्सिम तारासोव्ह काय, आता हे खेळाडू कुणाला फारसे माहीतही नसतील.
पण, बुब्काच्या सर्वोत्तम काळात त्यांनी पोल व्हॉल्टमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले, याची नोंद इतिहासात कधीचीच झाली आहे. ऑलिम्पिक पदकाची ‘उंची’ ही अशी असते. बुब्काने या घटिताचे खूप छान विश्लेषण केले आहे. तो म्हणतो, ‘ऑलिम्पिक ही कायमच विशेष स्पर्धा असते. त्यात काय होईल, याचा अंदाज कधीच बांधता येत नाही. एखाद्या क्रीडा प्रकारात तुम्ही तुमची कितीही महानता सिद्ध केलेली असो, ऑलिम्पिकच्या वेळी तुम्ही यशस्वी व्हालच असे नाही. ही स्पर्धा अशाच खेळाडूला ‘यशस्वी भव’ म्हणते, जो नेमक्या क्षणी कामगिरी उंचावतो.’
पुढे २००० चे सिडनी ऑलिम्पिक्स येईपर्यंत बुब्काची कारकीर्द ओसरत आली होती. या स्पर्धेत त्याला ५.७० मीटरची प्राथमिक उंचीही गाठता न येऊन तो स्पर्धेबाहेर पडला. नव्या शतकाची ती नांदी होती. अर्थात, त्याचा ६.१४ मीटरचा विश्वविक्रम मोडण्यासाठी नव्या शतकाची १४ वर्षे खर्ची पडावी लागली. बुब्काच्याच मायदेशात – युक्रेनमधील डोनेत्स्कमध्ये- बुब्काच्याच उपस्थितीत २०१४ साली तो मोडला गेला. फ्रेंच पोल व्हॉल्टपटू रेनाँ लॅविलेनीने ही कामगिरी केली.
सुरुवातच ‘६’पासून…
आजघडीला पोल व्हॉल्टमध्ये राज्य करतो आहे स्वीडनचा अर्मांड डुप्लान्तिस. त्याने याच वर्षी मार्चमध्ये ६.३१ मीटर इतकी उंची गाठून स्वत:चाच विश्वविक्रम १५ व्यांदा मोडला! तो बुब्काचा खरा वारसदार. बुब्काचा ६.१४ मीटरचा विक्रम मोडताना लॅविलेनीने ६.१६ मीटर उंची गाठली होती, पण ती एकदाच. ती पार करायला पुढची सहा वर्षे जावी लागली. २०२० मध्ये डुप्लान्तिसने ६.१७ मीटरचा विश्वविक्रम रचला. तो मोडत मोडत आता हा विक्रम ६.३१ मीटर या उंचीला पोहोचला आहे.
डुप्लान्तिसचा जन्म १९९९ सालचा. म्हणजे, ज्या काळात बुब्काची कारकीर्द शेवटाकडे आली होती, त्या वेळचा. बुब्काने आपल्या सर्वोत्तम पाच स्पर्धकांत शेवटचा, पाचवा सर्वांत कठीण स्पर्धक म्हणून उल्लेख केला होता, तो त्याच्यानंतर येणार्या पुढच्या पिढीचा. बुब्का म्हणतो, ‘मी सहा मीटर उंची पार केली, तेव्हा ती अशक्य कोटीतील बाब वाटत होती. पण एकदा ती पार केल्यावर तो इतरांसाठी प्रारंभबिंदू झाला. माझ्यानंतर आलेल्या प्रत्येक पोल व्हॉल्टपटूने शून्यापासून नाही, तर सहा मीटरपासून सुरुवात केली.’
डुप्लान्तिसने तर असे १५ नवे प्रारंभ रचले आहेत, तेही दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकत, म्हणजे खर्या अर्थाने बुब्काच्या एक पाऊल पुढे. कोणत्याही खेळात अशा नवनव्या प्रारंभाच्या प्रथाच आवश्यक असतात. कारण, त्यामुळे व्यक्तीपेक्षाही खेळ जिंकत राहतो!
siddharth.kelkar @expressindia.com
