ऑलिम्पिकमधले लिएंडर पेसचे (अटलांटा १९९६) कांस्यपदक, अभिनव बिंद्रा (बीजिंग २००८) आणि नीरज चोप्रा (टोकियो २०२०) यांचा सुवर्णपराक्रम दूरचित्रवाणीवर पाहिला गेल्याने त्यांची ‘फोटो मेमरी’ तयार झाली. ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी मिळविलेले यश, त्या वेळच्या सगळ्या प्रतिमा डोळ्यांपुढे नसल्याने स्मृतिपटलावर उमटत नाही.
आपल्याला ऑलिम्पिक खर्या अर्थाने कधीपासून जवळचे वाटायला लागले? आपल्या देशाचे खेळाडू त्यात चमकायला लागले तेव्हापासून, असे उत्तर द्यावेसे वाटेल. पण, ते अर्धे बरोबर. कारण, आपल्याला पटकन आठवतात, त्या प्रतिमा. आणि, त्याही अलीकडच्या. त्याचे श्रेय दूरचित्रवाणीला. लिएंडर पेस १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक स्वीकारायला पोडियमवर चढला, तेव्हा त्याचा अभिमानाने भरून आलेला चेहरा टीव्हीवर पाहून डोळे पाणावले होते. घटनेला ३० वर्षे होऊनही ही प्रतिमा अमीट. नंतर अभिनव बिंद्रा (बीजिंग २००८) आणि नीरज चोप्राच्या (टोकियो २०२०) सुवर्णप्रतिमाही अशाच कायमच्या मनावर कोरल्या गेलेल्या. गेल्या ३० वर्षांत रौप्य आणि कांस्याच्या अशा आणखीही काही आहेत. त्या तेवढ्याच लक्षात राहिल्या, कारण त्या दूरचित्रवाणीवर पाहिल्या गेल्याने त्यांची ‘फोटो मेमरी’ तयार झाली. म्हणूनच सुरुवातीला म्हटले, की उत्तर अर्धे बरोबर. कारण, आपण ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी मिळविलेले यश, त्या वेळच्या सगळ्या प्रतिमा डोळ्यांपुढे नसल्याने स्मृतिपटलावर उमटत नाही.
आपला हॉकी संघ खरे तर सुमारे शतकभरापूर्वीपासून ऑलिम्पिक गाजवत आला. १९२८ ते १९८० या कालावधीत आपण आठ सुवर्णपदके मिळविली. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये तर खाशाबा जाधव यांनी कुस्तीत, म्हणजे वैयक्तिक क्रीडाप्रकारातही कांस्यपदक मिळविले. आपण ते यश पूर्ण विसरून गेलो असे नाही; फक्त ते आपल्या ‘फोटो मेमरी’त पक्के बसलेले नाही. पण, अशा पराक्रमांवर जेव्हा जेव्हा, त्यातील नाट्यमयता, संघर्षासह चित्रपट येतात, तेव्हा त्यांची उजळणी पक्की होते (आठवा : ‘भाग मिल्खा भाग’, ‘दंगल’, ‘सूरमा’, ‘चंदू चॅम्पियन’ इत्यादी, आता खाशाबा जाधव यांच्यावरही चित्रपट येतो आहे). स्मृतींचे मजकूर पुसट होऊ नयेत, म्हणून हे आवश्यक. ते केवळ दस्तावेजीकरण नाही, ते प्रतिमांचे ठसणेही.
दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असे बरेच प्रयत्न केले गेल्याने अनेक प्रतिमा ठसल्या. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आहेतच; क्रीडा प्रकारांबाबत ठळक आठवणार्या म्हणजे १९८२ च्या दिल्लीतील आशियाई स्पर्धांचे थेट ‘रंगीत’ प्रसारण आणि नंतर १९८६ पासून पुढे फुटबॉल विश्वचषक सामन्यांचे प्रक्षेपण. दूरदर्शनने क्रिकेट बरेच दाखवले, त्या सामन्यांची क्षणचित्रे कायमच दाखविली. इतर खेळांच्या प्रसारणाच्या कोरल्या जातील अशा स्मृती नाहीत. तरीही, काही चित्रपट मालिकांच्या रूपात दाखवले गेले आणि लक्षात राहिले, त्यात होते ‘बॉडी लाइन’ (क्रिकेट), ‘एस्केप टू व्हिक्टरी’ (फुटबॉल), ‘नादिया’ (जिम्नॅस्टिक्स), ‘द जेसी ओवेन्स स्टोरी’ (ॲथलेटिक्स) आदी. सांगायचा मुद्दा असा, की यातील काही कहाण्यांनी खेळाडूच्या वैयक्तिक प्रवासाच्या निमित्ताने ज्या जागतिक स्पर्धेचे दर्शन घडविले ते होते ऑलिम्पिक. टीव्ही पाहायला लागलेल्या भारतीयांसाठी ऑलिम्पिकच्या त्या पहिल्या लक्षात राहिलेल्या प्रतिमा.
उपरोल्लेखित मालिकांपैकी वानगीदाखल या लेखात एक दाखला. रुमानियाची जिम्नॅस्ट नादिया कोमानीच हिचा. नादियावरील चित्रपट- मालिका पाहताना, ‘इतक्या भन्नाट कसरती एवढ्या लहान वयात करणे शक्य आहे?’ अशा अचंब्याचा ‘आ’ कायम वासलेलाच राहायचा. १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये ‘अनइव्हन बार’ प्रकारावरच्या कसरती करून तिने जे अप्रतिम ‘लँडिंग’ केले, त्या घटनेला गेल्याच महिन्यात ५० वर्षे झाली. तिने ‘लँड’ केले, तेव्हा टाळ्यांचा गजर थांबला नाही. नजरा गुणफलकाकडे लागल्या.
गुणफलक काही क्षण स्तब्ध. या थांबलेल्या क्षणांचेे संचित किती मोठे आहे, त्याचे आकलन तेव्हा झाले असेल का, असा प्रश्न आता पडतो. गुणफलकावर गुण उमटले १.००. अरे, असे कसे? इतक्या अप्रतिम कसरतीचे हे मूल्यमापन? मग काही क्षण गोंधळाचे. नंतर लक्षात आले, ओमेगा एसए या ऑलिम्पिकचे इलेक्ट्रॉनिक गुणफलक तयार करणार्या कंपनीला नादियाचे गुणच दाखवता आले नाहीत. कारण, त्यांनी ही कल्पनाच केली नव्हती, की जिम्नॅस्टिक्ससारख्या प्रकारात कुणाला १० पैकी १० गुण मिळतील. आणि, त्यामुळे तो आकडा उमटविण्याची सोयच त्या फलकाला नव्हती. नादियाने याच ऑलिम्पिक स्पर्धांत पुढे आणखी सहा प्रकारांत १० पैकी १० गुण मिळवून जिम्नॅस्टिक्सच्या गुणफलकाला पुरते हरवले. इतिहास घडतो, तो असा.
जिम्नॅस्टिक्स आणि सोव्हएत महासंघ असे खरे तर तोवर समीकरण. त्या काळात अमेरिकेबरोबरच्या शीतयुद्धात प्रत्येकच बाबतीत स्पर्धा करणारी सोव्हिएत रशिया जिम्नॅस्टिक्समध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवून होती. १९७२ चे म्युनिक ऑलिम्पिक गाजवलेली याच देशाची ओल्गा कोर्बुत माँट्रियलमध्येही सुवर्णपदकांची प्रमुख दावेदार म्हणून आली होती. शिवाय, नेली किमचाही दबदबा होता. सोव्हिएत रशियाचे पुरुष आणि महिलांचे जिम्नॅस्टिक्सचे पूर्ण संघच अतिशय प्रबळ होते. नादियाने ती पोलादी भिंत ओलांडली, ती त्या वेळी कम्युनिस्टच असलेल्या रुमानियाच्या पोलादी भिंतीआड वाढूनही. नादियाने जे विक्रम केले, तो केवळ इतिहास राहिला नाही. अशासाठी, की तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, त्या वेळी ती १४ वर्षांची होती. त्यानंतर जिम्नॅस्टिक्समध्ये सहभागी होण्यासाठी किमान १६ वर्षे पूर्ण केल्याची अट घालण्यात आली. त्यामुळे ही अट हटेपर्यंत तिचा विक्रम वर्तमानातही अबाधित. शिवाय, आता जिम्नॅस्टिक्समधील गुणांकनाच्या बदललेल्या निकषांमुळे १० पैकी १० मिळणे जवळपास दुरापास्त. त्यामुळे नादिया आणि तिच्यानंतरच्या काही मोजक्या सोडल्या, तर हा विक्रमही अजून तरी मोडणे अवघड, भविष्यात काही वेगळे घडेपर्यंत.
अवघ्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिक्स शिकायला सुरुवात केलेल्या नादियाने पुढच्या आठ वर्षांत ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घालणे हा प्रवास खचितच अवघड. एवढ्या लहान वयात दररोज पाच-सहा तास फक्त या खेळाचा सराव इतकेच तिचे आयुष्य मर्यादित होऊन गेले होते. या सरावाचे काठिण्य, जिम्नॅस्टिक्समधील कसरतींमध्ये असलेले शारीरिक इजा होण्याचे धोके, इतक्या लहान वयात एकाग्रता आणण्यासाठी करावा लागणारा त्याग ही साधना सोपी नाही. जिम्नॅस्टिक्समध्ये ताकद आणि तोलाची कायम कसोटी. जोडीला कसरतीत लालित्य हवे, प्रत्येक कृतीत डौल हवा आणि लँडिंग करताना चेहर्यावर हसू ठेवून कृतज्ञता भावही हवा. त्याशिवाय मानवी वक्रता इतकी देखणी होऊ शकत नाही. नादिया त्याचे पूर्ण रूप होती.
नादिया तिकडे हा पराक्रम घडवत असताना या १९७६ च्या ऑलिम्पिकमध्ये आपण कुठे होतो? फार कुठेच नाही. ज्या हॉकीमध्ये दबदबा कायम ठेवून होतो, त्यात १९२८ नंतर प्रथमच पदकाविना परत येत होतो. त्यातही सातव्या स्थानी राहून. या संघाचा भाग असलेले अशोक कुमार हे भारताचे हॉकी दिग्गज ध्यानचंद यांचे पुत्र. आदल्याच वर्षी १९७५ मध्ये हॉकीत भारतीय संघाने जागतिक विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी गोल लगावला होता अशोक कुमार यांनीच! १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये नादियाने पुन्हा दोन सुवर्णपदके पटकावली. तिकडे १९७६ च्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीत झालेल्या नाचक्कीचे सावट घेऊनच भारतीय संघ मॉस्कोत दाखल झाला होता. या वेळी स्पर्धेतील एकूण संघांची संख्या कमी होती. पण, भारतीय संघही नवखा होता. संघात फक्त पाच खेळाडू असे होते, जे परदेशी खेळाडूंच्या संघांशी खेळले होते.
इतक्या नवख्या संघाला तेही गेल्या स्पर्धेतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत न्यायचे, तर प्रेरणेची ठिणगी गरजेची होती. कर्णधार वासुदेवन भास्करन यांनी मग कल्पना सुचविली प्रेरणा संवादाची. बेंगळुरूतील राष्ट्रीय शिबिरात तेव्हा भारतीय हॉकी संघाचा अशा प्रकारचा पहिलाच प्रेरणा संवाद झाला, तो फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याबरोबर! ते संघाशी दोनदा बोलले आणि त्यांनी एक ध्येयही दिले. याचा उपयोग होईल, असे वाटल्याने या आधी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या संघातील लेस्ली क्लॉडियस आणि मुनीस्वामी राजगोपाल यांनाही भास्करन यांनी बोलावून संघाशी संवाद साधण्याची विनंती केली. याचा अपेक्षित परिणाम झाला.
भारताने पहिल्या सामन्यात टांझानियाला तब्बल १८-० अशा फरकाने हरविले. मग पोलंड, स्पेनबरोबर २-२ बरोबरी आणि क्युबाला १३-० अशी धोबीपछाड. यजमान सोव्हिएत रशियाबरोबचा सामना अवघड होता, कारण ते घरच्या मैदानावर खेळत होते. पास मागितलेला ऐकू जाईल की नाही, इतका स्टेडियममध्ये गोंधळ होता. पण, भारतीय संघ इतका आत्मविश्वासात होता, की जिवाच्या आकांताने खेळून संघाने सोव्हिएत रशियाला ४-२ धूळ चारली. अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध पूर्वार्धात भारताकडे २-० अशी आघाडी होती. आघाडीचा मध्यरक्षक म्हणून खेळणार्या सुरिंदरसिंग सोधीने दोन्ही गोल केले.
एम. के. कौशिकने उत्तरार्धाची सुरुवात गोलने केली, पण स्पेनचा कर्णधार जुआन ॲमटने दोन गोल करून सामना ३-२ अशा रोचक स्थितीत आणला. मग भारताने एक हुकमी एक्का खेळला. मोहम्मद शाहिद यांना सेंटर फॉरवर्ड म्हणून खेळविण्याचा. त्यांनी स्पर्धेत तोवर खूप चमकदार म्हणावी अशी कामगिरी केली नव्हती, पण संघाला आणि कर्णधाराला त्यांच्या कौशल्यावर विश्वास होता. भारताचा चौथा आणि विजयी गोल शाहिद यांनीच केला. भारत ४, स्पेन ३. हॉकीतील सुवर्णपदक भारताकडे…
या आठव्या सुवर्णपदकानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीत २०२० मध्ये कांस्य मिळाले. पण, सुवर्णयश मिळविण्यासाठी भारत अजून झगडतो आहे. त्यासाठी कदाचित आणखी एक प्रेरणादायी संवाद लागेल. आपण तोवर या आख्यानाच्या पुढच्या भागात ध्यानचंद यांनी काय कमाल होती, ते पाहू. siddharth.kelkar @expressindia.com
