पहिल्या-दुसर्‍या महायुद्धांच्या खंडानंतर ऑलिम्पिक चळवळ काहीशी विस्कळीत झाली, पण पुन्हा जोमाने उभी राहिली, सुरू राहिली. पण युद्धांनी जितके अडथळे उभे राहिले नाहीत तितके ते शीतयुद्धाने उभे राहण्याचे प्रसंग गतशतकातील उत्तरार्धात अनेकदा आले. युद्धातून पदरात काय पडले आणि नुकसान काय झाले, कुणाला शिक्षा झाली नि कोण जेते ठरले वगैरे मोजदाद पुढे अनेक वर्षे होत राहिली. पण वैरभावातून हाती केवळ वैरभावच मिळतो, मिलिटरी-इंड्ट्रिरयल कॉम्प्लेक्सच्या वर्तुळात किंवा त्याच्या परिघावर राहिलेल्यांचीच धन होते हे आकळण्याच्या मन:स्थितीतच कुणी नव्हते. युद्धोत्तर लंडन ऑलिम्पिकने पाश्चिमात्य जगताची विस्कटलेली फेरस्थापित होण्याचे संकेत दिले. ऑलिम्पिक पुन्हा सुरू झाले, तरी शीतयुद्धाच्या माध्यमातून वैरभावाने नवीन रूप धारण केले. त्यामुळे त्या काळात जवळपास प्रत्येक स्पर्धेवर त्या शीतयुद्धाची छाया पडू लागली. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन बलाढ्य देशांनी आपापले कंपू बनवले आणि कोणत्या कंपूतील देशामध्ये ऑलिम्पिक भरवले जात आहे, याविषयी विरोधी कंपूतील देश सहभागाविषयी निर्णय किंवा बहिष्कार असे निर्णय घेऊ लागले होते. पिअर दा कुबर्ता आणि त्यांच्या समकालीन, समविचारी मंडळींनी १९व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेच्या चळवळीची उभारणी केली आणि पहिल्या दहा पर्वांमध्ये विविध अडचणींवर मात करत ती सुरू ठेवली होती. औद्योगिक क्रांती, साम्राज्यांचा अस्त, वसाहतींचे स्वातंत्र्य, राजशाह्यांकडून लोकशाहीकडे वाटचाल या आधुनिक घडामोडींशी समांतर ऑलिम्पिक चळवळ वाढत गेली. आता नवलाईचे दिवस सरले होते. लंडन ऑलिम्पिक १९४८ नंतर युद्धोत्तर फेरउभारणीचे कवित्वही संपुष्टात आले. आधुनिक काळात देशाचे सामर्थ्य रणभूमीइतकेच क्रीडांगणावरही दिसण्याची/दाखवण्याची स्पर्धा सुरू होण्याचाही हाच काळ. ऑलिम्पिक २.० च्या खुणा दिसू लागल्या होत्या.

खाशाबांचे ऑलिम्पिक

हेलसिंकीला ऑलिम्पिकचे यजमानपद बहाल करण्याविषयी दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटण्यापूर्वी ठरले होते. मात्र युद्धोत्तर ऑलिम्पिक भरवण्याचा प्रथम मान लंडनला मिळाला, त्यामुळे १९५२ मधील ऑलिम्पिक फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे भरवण्याचे ठरले. भारताच्या दृष्टीने या ऑलिम्पिकचे महत्त्व विशेष. कारण मराठमोळे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी या स्पर्धेत स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकले. त्या स्पर्धेतील हॉकीतील सांघिक सुवर्णपदकाबरोबर खाशाबांचे कांस्यपदकही मिळाल्यामुळे भारताच्या नावावर दोन पदके नोंदवली गेली. ती कामगिरी खास आणि त्यात हॉकी संघाइतकेच खाशाबांचे योगदानही खास. कारण एकापेक्षा अधिक पदके पुन्हा एकदा मिळण्यासाठी २००८ मधील ऑलिम्पिकपर्यंत प्रतीक्षा करावी लागली! लंडन १९४८ ऑलिम्पिकमध्ये खाशाबा सहाव्या क्रमांकावर राहिले होते. हेलसिंकीला वरच्या वजनी गटात खेळूनही खाशाबा कुस्त्यांवर कुस्त्या जिंकत होते. उपान्त्यपूर्व फेरीपूर्वी दोन कुस्त्यांमधील नियमाधारित विरामाचा लाभ खाशाबांना मिळाला नाही. त्यामुळे थकलेल्या शरीरानेच त्यांना उपान्त्य फेरीची कुस्ती खेळावी लागली आणि ते पराभूत झाले. यानंतर कांस्यपदकासाठीच्या लढतीविषयी त्यांना सांगितले गेले नव्हते आणि ते फिरायला निघून गेले. नशिबानेच वेळेत परतले आणि त्यांची कुस्ती जिंकून कांस्यपदकविजेते ठरले. दोन्ही वेळी त्यांना भारतीय पदाधिकार्‍यांकडून अपेक्षित मदत आणि मार्गदर्शन मिळाले नाही. भारतीय खेळाडूंपेक्षा अधिक पदाधिकारी ऑलिम्पिकवारीवर जाण्याचा तो काळ. हे पदाधिकारी ऑलिम्पिकच्या निमित्ताने पर्यटन करूनच यायचे. हॉकी संघ काहीही करून पदक जिंकणार आणि बाकीचे खेळाडू काहीही करून पदकाविनाच परतणार असे गृहीत धरण्याचा तो काळ. त्या काळात खाशाबांनी प्रवाहाविरुद्ध पोहून दाखवले नि पदक जिंकले. पुढे महाराष्ट्र आणि भारत सरकारने त्यांचा पुरेसा मान ठेवला नाही हा कटू इतिहास आहे.

सोव्हिएत रशियाला ऑलिम्पिकचे निमंत्रण होते. सुरुवातीस ऑलिम्पिक म्हणजे बूज्र्वा खूळ अशी भूमिका घेणार्‍या सोव्हिएत नेतृत्वाने नंतर मात्र प्रतिमासंवर्धन आणि कौशल्यदर्शनासाठी ऑलिम्पिकचा वापर केला. फिनलंडवर सोव्हिएत आक्रमणाच्या स्मृती ताज्या होत्या. त्यामुळे लेनिनग्राडमध्ये आमचे खेळाडू राहतील आणि दररोज हेलसिंकीपर्यंत विमानाने जाऊन-येऊन सहभागी होतील, असा सोव्हिएत प्रस्ताव होता. तो फेटाळण्यात आला. पण तडजोड म्हणून सोव्हिएत पथकासाठी आणि कम्युनिस्ट देशांसाठी दुसरे ऑलिम्पिक व्हिलेज उभारण्याचा दिलदारपणा फिनलंडने दाखवला.

युरोपबाहेर प्रथमच

फिनलंड १९५२ पर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धा युरोप आणि अमेरिकेतच झाल्या होत्या. नंतरच्या काळात मात्र हा पायंडा मोडण्यात आला. ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे १९५६ मध्ये झालेले ऑलिम्पिक युरोप-अमेरिकेबाहेरील आणि दक्षिण गोलार्धातील पहिलेच ऑलिम्पिक ठरले. तर १९६४ आणि १९६८ मधील ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे जपानमधील टोक्यो आणि मेक्सिकोत मेक्सिको सिटी येथे भरवण्यात आले. जपानमधील ऑलिम्पिक आशियातील पहिलेच, तर मेक्सिको सिटीमधील ऑलिम्पिक उत्तर अमेरिकेबाहेरील पहिलेच. टोक्योने १९४० मधील स्पर्धा भरवण्याची तयारी सुरू केली होती. पण चीन-जपान युद्धाला तोंड फुटल्यामुळे ती योजना बारगळली आणि पुढे ती स्पर्धाच युद्धामुळे होऊ शकली नाही. युद्धखोर देश म्हणून जपानला १९४८ मधील स्पर्धेचे निमंत्रणच नव्हते. दुसर्‍या महायुद्धानंतर दोन अणुबॉम्बच्या तडाख्यानंतर जपानचे अतोनात नुकसान झालेच, पण उभारी घेण्यासाठी तरीही हा देश सिद्ध झाला हे महत्त्वाचे. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेला पहिला आशियाई देश जपानच होता. ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणारा पहिला आशियाई देशही जपानच ठरला. जवळपास दोन दशकांपूर्वी युद्धखोर म्हणून बदनाम झालेला आणि अणुबॉम्बच्या तडाख्याने अतोनात जीवित आणि वित्तहानी भोगावी लागलेल्या या देशाने बदल आणि उभारी या शब्दांना नवीन आयाम प्रदान केले. ऑलिम्पिकच्या निमित्ताने एखाद्या युरोपिय देशाने प्रगतीचे प्रदर्शन मांडणे आणि जपानसारख्या आशियाई देशाने तसे करून दाखवणे यात फरक होता. टोक्यो १९६४ ऑलिम्पिकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, याच स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषी धोरणाबद्दल बहिष्कार टाकण्यात आला होता.

मेक्सिको १९६८ ही स्पर्धा पुन्हा एकदा त्या कालातील बिगर-अमेरिकी, बिगर-युरोपिय विकसनशील देशातील शहरात भरवली गेली. मेक्सिको सिटी हे शहर समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्यामुळे त्याचा परिणाम काही क्रीडास्पर्धांवर झाला. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोघा आफ्रिकी-अमेरिकी खेळाडूंनी निषेधार्थ केलेला जाहीर ‘ब्लॅक पॉवर सॅल्यूट’. टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस या धावपटूंनी २०० मीटर शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. पण पदकप्रदान समारंभात आनंद व्यक्त करण्याऐवजी दोघांनी त्या काळी अमेरिकेत कृष्णवर्णीयांमध्ये प्रचलित ब्लॅक सॅल्यूट निषेध व्यक्त केलेला, तेही अमेरिकी राष्ट्रगीत वाजवले जात असताना. अमेरिकेत त्या काळात गौरधार्जिण्या सरकारी धोरणांच्या आणि मानसिकतेविरोधात कृष्णवर्णीयांचे आंदोलन तीव्र बनले होते. स्मिथ आणि कार्लोस यांनी एक मूठ उंचावत, मान खाली झुकवत निषेधमुद्रा मांडली, जी जगभर विलक्षण प्रतीकात्मक ठरली.

म्युनिक १९७२

नाझी जर्मनीने १९३६ मध्ये ऑलिम्पिक भरवले. आधुनिक जर्मनीने (पश्चिम जर्मनी) १९७२ मध्ये ऑलिम्पिक भरवले, ज्याचे नामकरण ‘चीअरफुल ऑलिम्पिक’ म्हणजे आनंदी ऑलिम्पिक असे केले गेले. प्रत्यक्षात ते ‘टिअरफुल ऑलिम्पिक’ ठरले. कारण ऑलिम्पिक व्हिलेजमधील ११ इस्रायली खेळाडू आणि प्रशिक्षक, तसेच नंतर एक जर्मन पोलीस अधिकार्‍याची हत्या ‘ब्लॅक सप्टेंबर’ या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेकडून झाली. सुरक्षाव्यवस्था, खेळाडूंचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या वाटाघाटी आणि एकूणच या परिस्थितीचे गांभीर्य हाताळण्यात जर्मन व्यवस्थेने दाखवलेला अक्षम्य अजागळपणा आजही नाझी काळानंतर या देशाच्या इतिहासावरील दुसरा मोठा डाग ठरतो. ‘इस्रायलींचे जर्मन भूमीवर शिरकाण’ हा संदर्भ अतिशय दु:खद होता. जर्मनीने त्यानंतर कधीही ऑलिम्पिक भरवण्याचे धाडस केले नाही. यजमान देशाच्या दिरंगाई-दुर्लक्षामुळे परदेशी पाहुण्या खेळाडूंना प्राण गमवावे लागल्याची ती पहिलीच घटना केवळ जर्मनीसाठीच नाही, तर ऑलिम्पिकसाठीदेखील नामुष्कीजनक ठरली.