हीनाकौसर खान
मुस्लीम महिलांबाबतचं एक भिंग, एक चौकट, एकच प्रश्न आणि मग त्याचं एकच उत्तर ही साखळी मोडावी लागेल..
पालिका बागेच्या दोन चकरांमध्येच सुरैय्या थकली. तिला आता उन्हात बसायचं होतं. पण त्याआधी बुरखा काढायचा होता. तिनं इकडंतिकडं बघितलं. सगळेच जण आपल्याकडे बघतायत असं तिला वाटलं. मग एका झाडाच्या दिशेने तोंड करत तिनं हात वर केला तर समोरून एक तरुण धावत येताना दिसला. तिनं पटकन हात खाली केला. तो गेला तसं डोळे मिटून तिनं झटकन बुरखा काढला. पायातल्या जुत्यांची लेस सैल केली आणि लॉनवर पाय लांब करून ऊन खात बसली.
‘‘चाची, धूपमें की बैठे, उधर छांव में जाव्तो,’’ नसरीन सुरैय्याचे जुते न्याहाळत म्हणाली.
‘‘डाक्टरने बोलाय धूप खाने. सुब्बू की कवली धूप में व्हिटामीन रहतेतो. खून क्या कम हाय बई. दवा तो कित्ते खाने के. सैहीनच हुईना तो आने लगी.’’
‘‘हं. अच्चाय तो.. कल आती चाची. बेटी आयलीये भार,’’ म्हणत नसरीन बागेतून बाहेर पडली.
पायानं अपाहिज असलेल्या सय्यदबाबांच्या हातात दोन रुपये देऊन नसरीन बाजारात शिरली. तसं तिच्या पल्लूला ओढत उल्फत म्हणाली, ‘‘मम्मी, सदका देने को पैसेय तेरे पास! मेरेको जूते कऽऽब दिलारी तू?’’
‘‘दसवी की परीक्षा होंदे, फिर’’ नसरीन ठामपणे म्हणाली.
‘‘एकलेकी कमाई में क्या हुताय आजकल. पर कौन सुनताय मेरा. एकेक पैसा संबाल के खर्चा करने में कैशी तारांबळ उडती मुजे मालुम,’’ नसरीन मनातल्या मनात चरफडली.
उल्फतही खट्टू झाली. मम्मीचा दरारा तिला माहीत होता. मम्मी प्रत्यक्ष कमवत नव्हती, पण पैशांच्या निर्णयाबाबत घरातली तीदेखील कर्ती होती. दोघी शांतपणे चालत राहिल्या. बाजारातून बाहेर निघत चौक क्रॉस केला. मम्मीला बाय करत उल्फत तिच्या शाळेत शिरली.
उल्फत वर्गात शिरल्यापासून कविताला तिच्याशी काही तरी बोलायचं होतं. शाळा सुटल्याची घंटा होताच ती बॅग उचलून उल्फतजवळ आली. ‘‘एऽऽ उल्फा, तू माझी बेस्ट बडीये यार. तू हिजाब घालत नाहीस ते बरंय. तिकडं कर्नाटकमध्ये कॉलेजात हिजाबबंदीचा गोंधळ सुरू आहे. तुझ्याशिवाय शाळा, कान्ट इमॅजिन याऽ,’’ असं म्हणत कविताने तिला कवटाळलं. तेवढय़ात तिच्या लक्षात आलं वर्गात आयेशासुद्धा आहे आणि तिनं हिजाब घातला आहे.
‘‘कावे, हिजाबने तुझंमाझं काय नुकसानंय का?’’ उल्फत बाजू सावरत म्हणाली.
‘‘हं, पण माझा तर फुल फायदाय.’’ आयेशा म्हणाली.
‘‘म्हणजे?’’ कविता आणि उल्फत दोघी तिच्याकडे आ वासून बघू लागल्या.
‘‘पढाई की दौड लगाने का पासपोर्ट है ये, मेरी जान!’’ असं म्हणत आयेशानं जागच्या जागी धावून दाखवलं. त्या वेळी तिच्या पायातले काळेकुळकुळीत जूते चमकत होते. तिनं मैत्रिणींना दाखवण्यासाठी धरलेला वेग कायम ठेवला आणि तशीच जूते दाखवत वर्गाबाहेर गेली.
स्कूलबसमधून आयेशा उतरली. तसा तिची वाट पाहत बसलेला रोहन समोर आला. रोहन तिचा बालपणापासूनचा शेजारी.
‘‘आयेशा, तुझ्या सारादीदीचा आजचा खेळ लैच जबरी होता. काही म्हण आपल्या फुटबॉल टीमची शानचंय ती. तिने दोन गोल वाचवले म्हणून टीम जिंकली. आज तर आपण फुल फॅन झालो.’’
‘‘मग आहेच ती तशी! पण हिजाब?’’
‘‘हं! खेळताना काढला होता. तुमचे अब्बा मॅच बघायला होते. पण दीदी काही घाबरली नाही. मॅच झाल्यावर अब्बा गेले आणि तुमचे होणारे जिजाजी राहुलदादा अवतरले. मी दीदीला चिडवणार होतो. पण तिच्या पायात जुते दिसले. म्हंटलं मैं को जूते नहीं खाना है आणि मी कलटी मारली.’’
दोघं हसत इमारतीत शिरले. तेव्हा आयेशाचे अब्बा गॅलरीतून साराला आवाज देत होते.
सारा घरात शिरताच अब्बांनी तिला ऑफिसला दांडी का मारली म्हणून फैलावर घेतलं.
‘‘छोडी मैंने.’’ सारा शांतपणे म्हणाली.
‘‘क्या? क्यूँ?’’
‘‘हुया ना अबी एक साल. माँ-बाप टीचर. बेटी सेल्सगर्ल अच्छा लगता? मेरे अॅस्पिरेशन्स अलग हैं.’’
‘‘क्या है तेरे अॅस्पिरेशन?’’
‘‘फुटबॉल को लाथ मारने का नै तो राहुल्याके साथ घूमने का?’’ साराचा छोटा भाऊ सुहेल म्हणाला.
‘‘छोटाय, छोटे जैसा रेह. फिर्से बोला ना तो याद रख.’’
‘‘मेरा क्या इसमे. सारी दुनिया बोल्ती वो बोलरा.’’ तो असं म्हणत होताच की अम्मानं त्याच्या पाठीत जूता हाणला.
‘‘दुनिया का छोड, तेरे मूँमें आयी ना बात, तो ऐसे जूते पडेंगे की याद रख.’’
अम्मानं तिचा जूता त्याच्या पुढय़ात जोरात आपटला, तसे घरातले सगळेच पांगले.
कुणाही दादी, नानी, अम्मा, चाची, मुमानी, खाला, फुफू, दीदी, छोटी, भाभी यांची ही छोटीशी गोष्ट. त्या सोशीक, रडणाऱ्या, बिचकणाऱ्या, पिचलेल्या आहेत तशाच त्या हसणाऱ्या, चिडणाऱ्या, रागवणाऱ्या, बंड करणाऱ्यादेखील आहेत.
स्त्री कुठल्या धर्मात जन्मते यावरून तिचा सामाजिक-राजकीय-आर्थिक स्तर ठरतो हे सत्य आहे, मात्र त्याच वेळी देशाची सामाजिक- राजकीय भूमिका काय आहे यावरूनही तिचं चित्रण आणि चौकटी शेपअपदेखील केल्या जातात, हेही खरं. मुस्लीम समाजाचा सामाजिक चेहरा फार गडद केल्यामुळं मुस्लीम बाईचा वावर फारच दयनीय होऊन जातो. पण आपण डोळे नीट उघडे ठेवून आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला वास्तव दिसणार नाही का?
सुरैय्या, नसरीन, उल्फत, आयेशा, सारा आणि साराची अम्मा आपल्या आजूबाजूलाच तर आहेत. त्यांच्यासारख्या स्त्रियांनीच तर मुस्लीम समुदाय बांधून, धरून ठेवलाय आतून. त्या आपल्या डोक्यातल्या ‘दयनीय’ अवस्थेत असत्या तर समाज टिकलाच नसता. पण त्या आहेत, प्रचंड ताकदीनं, चिवटपणे तग धरून आनंदानं उभ्या आहेत. समाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या प्रतिमांना आपापल्या परीनं सुरुंग लावत, त्यावर काट मारत, प्रसंगी त्या प्रतिमांची राखरांगोळी करत उमलून येताहेत. बरं त्या कधीही एकटय़ा उमलत नाहीत. स्वत:सह सभोवतालच्या स्त्री- पुरुषांनाही सोबत घेत फुलतात. फक्त आपल्याला त्यांच्या जागी उभं राहून अनबायस्ड पद्धतीनं पाहावं लागेल. त्यांच्या कळा सोसत त्यांचा प्रवास अनुभवावा लागेल. अनेकदा त्यांच्या जगण्या-वागण्यात विरोधाभास दिसेल, पण लगेच शिक्के नाही मारायचे.
सुरैय्याला आरोग्यासाठी बुरखासुद्धा सोडता येत नाही का? म्हणून चिडचिड नाही करायची. म्हातारपणी तिच्यासाठी बुरखा काढणं म्हणजे स्वत:ला ‘एक्स्पोज’ करण्यासारखंच आहे. पण ती अडेलपणा न करता ऊन खाण्यासाठी बागेत येते, हे खुल्या डोळय़ानं बघायचं. नसरीनचं न कमावता कर्ती असणं, साराच्या अम्माचं कमवती कर्ती असणं, आयेशा आणि उल्फतचं हिजाब घालणं न घालणं, साराचा खेळ आणि प्रेम हे सगळं एकाच भिंगातून नाही बघायचं. मुळात तसं बघताच येत नाही. कुणीही सामान्य नसतं. जो तो आपापल्या वाटेची असामान्य लढाई लढत असतं.
खरं तर आपापल्या वाटा धुंडाळणाऱ्या, यशस्वी होणाऱ्या, नाव कमावणाऱ्या मुस्लीम स्त्रियांची वाटदेखील सोपी नसते, मात्र त्यांच्याकडे ‘अपवादात्मक’ म्हणून बघितलं जातं. त्यांना संधी मिळाली, त्यांनी बंड केलं, त्यांना कौटुंबिक आधार लाभला म्हणून यश मिळालं असं सुलभीकरण केलं जातं, तेही चूकच. बोलती औरतें भी तो चुभती ही हैं!
मुस्लीम महिलांबाबतचं एक भिंग, एक चौकट, एकच प्रश्न आणि मग त्याचं एकच उत्तर ही साखळी मोडावी लागणार आहे. ती साखळी समाजाच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी मोडावी लागेल. तसा अवकाश मुस्लीम स्त्रियांना मिळेल याची जिम्मेदारी जाणत्या कळत्या प्रत्येकाला घेता यावी, याच जागतिक महिला दिनाच्या सर्वाना शुभेच्छा!
लेखिका मुक्त पत्रकार असून आरोग्य संज्ञापन क्षेत्रात कार्यरत आहेत.