एक काळा झेंडा, त्यावर कवटी, दोन हाडं आणि गवताची टोपी… भारत, नेपाळ, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, इंडोनेशिया, फिलिपिन्स जगाच्या कानाकोपर्यांत जिथे जिथे ‘जेन-झी’ रस्त्यावर उतरते तिथे तिथे हा झेंडा हमखास दिसतो. मध्यंतरी ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोराचे हेच चित्र असलेल्या टी-शर्टमधले फोटो व्हायरल झाले आणि ‘सत्ता उलथवून टाकण्याचा कट’, ‘देशाविरोधी कारस्थान’, ‘परकीय शक्ती’ वगैरे आरोपांना उधाण आलं. याला आधार एवढाच की असेच झेंडे नेपाळमधल्या आंदोलनातही दिसले होते आणि त्यानंतर तिथे सत्तांतर झालं. पण हा झेंडा केवळ नेपाळ आणि भारतातल्याच आंदोलनांत दिसलेला नाही. त्याआधी आणि त्यानंतरही जगभरातल्या अनेक जेन-झी आंदोलनांत तो दिसला. तरुणांच्या असंतोषाचा ‘आवाज’ ठरला. या झेंड्याला म्हणतात ‘जॉली रॉजर फ्लॅग’ आणि तो आला आहे ‘वन पीस’ या जेन-झीमध्ये तुफान लोकप्रिय असलेल्या जपानी ‘ॲनिमे’मधून!
जपानमधल्या कॉमिक बुक्सना ‘मांगा’ म्हटलं जातं आणि तो जगभर प्रचंड वाचला जाणारा साहित्यप्रकार आहे. बहुतेक सर्व ॲनिमे (जपानी ॲनिमेशन पट, मालिका) मांगावर बेतलेले असतात. ‘वन पीस’चं विश्व निर्माण केलं लेखक इचिरो ओडा यांनी. या मालिकेतलं पहिलं मांगा प्रसिद्ध झालं १९९७ मध्ये आणि आता तीन दशकं संपत आली तरी अद्याप मालिका संपलेली नाही. थोडक्यात जेन-झी बरोबरंच या कथेचा जन्म झाला आणि त्यांच्याबरोबरच ती वाढत गेली. आजवर या मांगाची तब्बल ११५ पुस्तकं प्रकाशित आणि विविध भाषांत भाषांतरित झाली आहेत. जगभरात त्यांच्या सुमारे ६० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यावर आधारित ॲनिमेचे तब्बल ३६ ‘आर्क्स’ म्हणजेच ‘सिझन्स’ मिळून एक हजार १८० ‘एपिसोड्स’ प्रदर्शित झाले आहेत.
वरवर पाहता ही केवळ लहान मुलांसाठीची ‘पायरेट्स’ म्हणजेच समुद्री चाच्यांवरची कथा. साहस, जिद्द वगैरेची शिकवण देणारी. पण मुलं मोठी होत गेली तसं त्यांच्या लक्षात येऊ लागलं की हे तर अनिर्बंध जुलमी सत्ता, सत्तेचं केंद्रीकरण, तिचं भ्रष्ट होणं, गुलामगिरी, शोषण, पर्यावरणाचा र्हास, अमली पदार्थांच व्यापार अशा खर्या जगातल्या समस्यांचंच प्रतिबिंब आहे. कथेचा नायक आहे किशोरवयीन पायरेट मंकी डी लुफी. समुद्री चाचे हे तसं एरवी नकारात्मक, खलनायकी पात्र. पण ‘वन-पीस’मध्ये हे चाचेच जगाला वाचवण्यासाठी धडपडताना आणि ‘वर्ल्ड ऑर्डर’शी लढताना दाखवले आहेत. कथेत जगाचा कारभार सुरळीत ठेवण्याची, जग सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या व्यवस्थाच भ्रष्ट झाल्या आहेत. तरुण पायरेट्स आपल्याकडच्या मर्यादित क्षमतांनिशी त्यांच्याशी झुंज देत आहेत. लुफी जेन-झीच्या आदर्शांमध्ये समाविष्ट झाला आणि त्याचा ध्वज त्यांचं प्रेरणास्थान ठरलं, ते त्यामुळेच हा ‘जॉली रॉजर फ्लॅग’ सर्वांत आधी दिसला तो २०२३ मध्ये इंडोनेशियात झालेल्या आंदोलनांत. पॅलेस्टाइनमधील वंशसंहाराविरोधात ऑक्टोबर २०२३ मध्ये योग्याकार्ता येथे झालेल्या निदर्शनांत तो फडकवला गेला. पण त्याकडे लक्ष वेधलं गेलं ते गतवर्षी ऑगस्टमध्ये त्याच देशात झालेल्या निदर्शनांमुळे. इंडोनेशियाचा स्वातंत्र्यदिन जवळ आला होता. एकीकडे अन्न आणि शिक्षणावरचा खर्च गगनाला भिडू लागला होता आणि त्याच वेळी खासदारांच्या भत्त्यांमध्ये मात्र वाढ करण्यात आली. त्यामुळे देशभर असंतोषाचं वातावरण होतं. त्यातच राष्ट्राध्यक्षांनी स्वातंत्र्यदिनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावेत, असं आवाहन केलं. या आवाहनानंतर काही तासांत देशातल्या अनेक कपडे विक्रेत्यांकडे ‘जॉली रॉजर’ झेंड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली जाऊ लागली.
स्वातंत्र्यदिनी अनेकांनी आपली घरं, वाहनांवर राष्ट्रध्वजाऐवजी ‘वन पीस’चा हा झेंडा फडकवला. राष्ट्रवाद वगैरे उत्तमच पण जमिनीवरच्या असंतोषाकडे लक्ष कधी देणार आहात, असा प्रश्न या प्रतीकाद्वारे केला गेला. तिथेही सत्ताधीशांनी प्रश्न सोडवण्याऐवजी ‘दुफळी माजवण्याचा प्रयत्न’ वगैरे म्हटलं आणि विरोधकांनी हिंसेपेक्षा झेंडा फडकवून निषेध करणं बरं म्हणत तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. हे सारं घडलं ऑगस्ट २०२५मध्ये आणि सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळ सरकारने समाजमाध्यमांवर बंदी लादली. ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. नेत्यांचा भ्रष्टाचार, त्यांच्या मुलांची उधळी जीवनशैली आणि गरिबीत पिचलेले बेरोजगार सर्वसामान्य तरुण या विरोधाभासाविषयीच्या असंतोषाचा भडका उडाला. तिथल्या तरुणांनीही आपल्या आंदोलनात ‘जॉली रॉजर’ हाती घेतला होता. या आंदोलनाने तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओलींची सत्ता उलथवून टाकली. पाठोपाठ ऑक्टोबर २०२५ मध्ये मादागास्करमध्ये नागरिकांनी पाणी आणि विजेच्या तुटवड्याविरोधात बंड पुकारलं. लष्कराला पाचारण करण्यात आलं, मात्र लष्कर सामान्य तरुणांच्या बाजूने उभं राहिलं. राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालविण्यात आला आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं. अमेरिकेतलं ‘नो किंग्ज’ आंदोलन असो वा ‘आइस’च्या अत्याचारांविरोधातला असंतोष तिथेही वारंवार हे झेंडे दिसले. आपल्याकडे जंतरमंतरवरच्या आंदोलनात हा झेंडा विद्यार्थी आणि पोलिसांतील वादाचं कारण ठरला. फ्रान्समध्ये ‘पेटलेल्या’ आंदोलनांतही आंदोलकांनी हे झेंडे हाती घेतले. ब्रिटन, पेरू, सर्बिया, फिलिपिन्स, मोरोक्को, मेक्सिको अशा जगातल्या अनेक देशांत असंतोषाचं प्रतीक म्हणून हा झेंडा फडकला. देश वेगळे, त्यांची आर्थिक-राजकीय-सामाजिक गणितं वेगळी, पण तरीही या पिढीसमोरच्या समस्या जगभर साधारण सारख्याच आहेत. प्रस्थापितांविरोधात खदखदणारा रोष आहे, तो व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ‘पॉप्युलर कल्चर’मधलं हे एक प्रतीक स्वीकारलं आहे.
