ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयापर्यंत गेल्या चार वर्षांत अनेकदा हल्लेखोर पोहोचणे, हिंदू मंदिरावरही हल्ला, यावर कारवाईच हवी..
विजय चौथाईवाले, भाजपच्या परराष्ट्र-व्यवहार विभागाचे प्रमुख
लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर १९ मार्च रोजी दोघा खलिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. ते ‘खलिस्तान झिंदाबाद’ ओरडत तसेच आणखीही भारतविरोधी घोषणा देत होते. तिरंगा ध्वज त्यांनी खाली खेचला आणि त्या जागी खलिस्तानचा कथित झेंडा फडकावला.
हा प्रकार अश्लाघ्य आणि अघटित खराच, पण तो फार अनपेक्षित म्हणता येणार नाही. ब्रिटनमध्ये गेल्या कैक दशकांत भारतविरोधी अतिरेकी गटांनी सुखेनैव आश्रय घेतलेला आहे. सन १९८४ मध्ये तरुण (वय ४८) भारतीय राजनैतिक अधिकारी रवीन्द्र म्हात्रे यांचे अपहरण करून ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ने त्यांची हत्या केली. गेल्या काही वर्षांत भारतीय आणि हिंदू संस्थांवर अनेक हल्ले जिहादी वा खलिस्तानी गटांनी- किंवा दोन्ही प्रकारच्या अतिरेक्यांनी संगनमताने- केलेले आहेत. त्यापैकी हे काही पाहा ९ मार्च २०१९ : लंडनमधील काही भारतीय रहिवासी तेथील भारतीय उच्चायुक्तालयानजीक खलिस्तानविरोधात शांततामय निदर्शनांसाठी जमले असताना त्यांच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आला. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.
१५ ऑगस्ट २०१९ : स्थळ तेच- लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी त्या आवारात जमलेल्या भारतीय लोकांवर पाकिस्तानी, खलिस्तानवादी आणि काश्मिरी फुटिरतावादी चाल करून गेले. भारतीयांवर बाटल्या, अंडी, चप्पलबूट यांचा मारा करण्यात आला. भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांनी भारतविरोधी घोषणा सुरूच ठेवल्या. अखेर राजनैतिक कर्मचाऱ्यांनीच भारतीय लोकांना आवारातून आत इमारतीमध्ये आणून पाणी, खाद्यपदार्थ दिले आणि मागल्या दाराने सगळय़ांना सुरक्षित बाहेर काढले. ही काही उदाहरणे, तथाकथित निदर्शक भारतीय उच्चायुक्तलयाच्या अगदी जवळ पोहोचले किंवा हिंसक घोषणा त्यांनी दिल्या, तेव्हाचीच फक्त आहेत.
याला महिनाही झाला नसताना, ३ सप्टेंबर २०१९ रोजी पुन्हा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयापुढे दहा हजार ब्रिटनवासी पाकिस्तान्यांचा जमाव जमला. जम्मू-काश्मीर या भारतीय राज्याला ‘अनुच्छेद ३७०’ने दिलेल्या सवलती काढून घेतल्याबद्दल या जमावाची निदर्शने हिंसकपणे चालू होती. त्यात भारतीय उच्चायुक्तालय इमारतीचे नुकसान झाले, खिडक्यांच्या अनेक काचांचा चक्काचूर झाला. मग १८ सप्टेंबर २०२२ रोजी, लंडनच्याच लायसेस्टर परिसरातील हिंदू मंदिराची विटंबना आणि तेथील भगवा ध्वज खाली खेचण्याचा प्रकार घडला. सर्व घटनांतील हल्लेखोर हे योजनापूर्वकच आलेले होते, ताकद दाखवण्याचा, भारतीयांना घाबरवण्याचा, भारतीय उच्चायुक्तालयाच्या मालमत्तेची मोडतोड करण्याचा आणि हिंदू धर्मातील प्रतीकांचा किंवा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणजे हल्ल्यांमध्ये साम्य आहेच. पण या सर्व प्रकारांना ब्रिटनचे सरकार, लंडनचे मेट्रोपोलिटन पोलीस आणि लायसेस्टरचे पोलीस यांनी दिलेल्या प्रतिसादात कमालीचे साम्य दिसेल. पोलिसांचा प्रतिसाद अगदीच केविलवाणा म्हणावा लागेल असा होता.
तेथील पोलिसांची मूलभूत चूक ही की, त्यांनी लंडनमधील भारतीय दूतावासाच्या आवारात निदर्शकांना इतक्या जवळ येऊच कसे दिले. दूतावास अथवा उच्चायुक्तालये ही जीनिव्हा करारानुसार संरक्षित मालमत्ता असते. १५ ऑगस्ट २०१९ च्या हल्ल्याच्या वेळी तर, तेथे असलेल्या अनेक भयभीत भारतीयांनी प्रस्तुत लेखकाशीही (मोबाइल संदेशाद्वारे) संपर्क साधला होता. आम्ही वेढय़ात अडकलो आहोत, असे ते सांगत होते. तेथे असलेल्या एकाचे म्हणणे असे की, ‘मेट्रोपोलिटन पोलीस’ तब्बल अडीच तासांनी उच्चायुक्तालय आवारात आले. इतकीच धक्कादायक घटना सप्टेंबर २०१९ मधील मंदिरहल्ल्याची. तीनच आठवडय़ांपूर्वी भारतीय उच्चायुक्तालयापुढे झालेला गोंधळ ताजा असूनही पोलिसांनी मंदिराच्या अगदी जवळ काही हजारांचा जमाव जमू दिला. ब्रिटनमध्ये घडलेल्या या हल्ल्यांबाबत तेथील राजकीय क्षेत्रातील प्रतिक्रिया संमिश्रच होत्या. हुजूर व मजूर पक्षांचे ब्रिटिश खासदार व काही उमराव (हाउस ऑफ लॉर्डसचे सदस्य) यांनी या हल्ल्यांचा- ताज्या हल्ल्याचाही- निषेध केला असला, तरी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन- ज्यांच्यावर त्यांच्या देशातील साऱ्याच राष्ट्रकुलेतर राष्ट्रांचे दूतावास वा राष्ट्रकुल सदस्यराष्ट्रांची उच्चायुक्तालये सुरक्षित राखण्याची पददत्त जबाबदारी आहे- यांच्यासारखे काहीजण अद्याप तरी काहीच बोललेले नाहीत. मात्र दुसरीकडे, पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये आलेल्या लॉर्ड अहमद यांनी असल्या अनेक हल्ल्यांचे नियोजन केल्याचे सर्वश्रुत आहे (सांगण्यासारखी नसूनही सर्वश्रुत अशी या ‘लॉर्ड’ अहमदबद्दलची बाब म्हणजे, गेल्याच वर्षी ते बाललैंगिक शोषणाबद्दल दोषी ठरलेले आहेत) .
ब्रिटनमधून झालेली निषेधाची वक्तव्ये केवळ औपचारिक ठरताहेत, असे खेदाने म्हणावे लागते. भारतविरोधी विषयांचा चघळून चोथा करण्यासाठी नेहमीच उत्सुक दिसणारे ब्रिटिश पार्लमेन्ट-सदस्य या हल्ल्यांची चर्चा हाउस ऑफ कॉमन्स अथवा हाउस ऑफ लॉर्डसमध्ये करताना मात्र क्वचितच आढळतात. याचे एक कारण असेही असेल की, त्यांना भारतविरोधी गोटाशी संबंधितांकडूनच निधी मिळतो आणि दुसरे कारण असे असावे की, या ब्रिटिश खासदारांच्या मतदारसंघांमध्येही त्या गोटाशी संबंधितांचाच भरणा अधिक असतो.
लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलिसांची भूमिका तर शोचनीयच म्हणावी लागेल. कुठे एकेकाळची त्या ‘स्कॉटलंड यार्ड’ची, ब्रिटिशांसाठी अभिमानिबदू असलेली आणि चित्रपटांमधून अनेक देशांतील आबालवृद्धांपर्यंत गेलेली कीर्ती.. आणि कुठे हे ‘मेट’ म्हणून स्थानिकांकडून ओळखले जाणारे पोलीस. यांच्यात कार्यक्षमतेचा, व्यावसायिकतेचा आणि जलद प्रतिसादाचा संपूर्ण अभावच दिसतो. प्रत्येक हल्ल्यांनंतर तेथील राजकारणी आणि हे मेट पोलीस सांगतात की, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात यापुढे कुणाला अशा प्रकारे फिरकू दिले जाणार नाही. पण खरोखरच फिरकू न देण्याचे धैर्य या मेट पोलिसांकडे दिसत नाही.
‘मेट पोलिसां’च्या अशा स्थितीमागची कारणे अधिकच गंभीर आहेत. सन २०२१ मध्ये मेटमधील एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या एका महिला सहकाऱ्याचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला ठार मारले. या प्रकरणाच्या चौकशीचा लुईस कॅसी यांनी दिलेला अहवाल अलीकडेचा आला. ‘‘मेट्रोपोलिटन पोलीस दल किडले आणि खिळखिळे झाले आहे. लोकांचा या दलावरील विश्वास ओसरू लागला असून या दलात वंशभेदाचे संस्थात्मीकरण, महिलांविषयी अनुदार दृष्टिकोन आणि समिलगींविषयी घृणा हे सारे वाढते आहे,’’ असे त्या अहवालात नमूद असल्याचे ‘द गार्डियन’चे (२१ मार्च) वृत्त आहे. याच अहवालात असाही तपशील आहे की, मेट पोलिसांतील १२ टक्के महिला अधिकाऱ्यांना पुरुष सहकाऱ्यांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ सोसावा लागला आहे आणि लिंगभेदकारक वर्तणुकीचा अनुभव तर एकतृतीयांश जणींना घ्यावा लागला आहे.
अशा परिस्थितीत मेट पोलिसांकडून भारतीय सरकारच्या ब्रिटनमधील मालमत्तांचे तसेच तेथील हिंदूंच्या पूजास्थळांचे संरक्षण होण्याविषयी किती अपेक्षा धराव्यात याला मर्यादाच आहेत. पण ब्रिटनच्या सरकारला मात्र याची आठवण करून दिलीच पाहिजे की, या असल्या घटनांना ब्रिटिश आस्थापना ज्या निर्मनस्कपणे खपवून घेतात त्यातून उभय राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. आज भारतात लंडनमधील अथवा ब्रिटनमधील त्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल अतोनात संतापाची भावना आहे. तेव्हा ब्रिटनच्या सरकारने प्रत्येक हल्ल्यानंतर निव्वळ तोंडदेखला प्रतिसाद देण्यावर न थांबता या गुन्ह्यांमागील सूत्रधारांवर खटले भरून त्यांना शिक्षेपर्यंत न्यावे आणि प्रामाणिकपणा सिद्ध करावा. भारताविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना असे वागवले गेले, तरच भारताचा विश्वास कमावता येईल.