scorecardresearch

पहिली बाजू : तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आरोग्यकक्ष

काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने मुंबईतील जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष सुरू केला.

bogus doctor caught Lohgaon
(संग्रहित छायाचित्र)

तृतीयपंथीय सरकारी रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा त्यांना महिला कक्षात दाखल करावे, की पुरुषांच्या कक्षात, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर उत्तर म्हणून आता जीटी रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने मुंबईतील जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष सुरू केला. येत्या काळात प्रत्येक शासकीय रुग्णालयात हा कक्ष स्थापन करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

तृतीयपंथीय हादेखील समाजाचा एक घटक आहे आणि या घटकालाही चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबईतील जी. टी. रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तृतीयपंथीयांना उपचार घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून जी. टी. रुग्णालयात ३० खाटांचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयांना पुरुष कक्षात दाखल करावे की महिला कक्षात, हा प्रश्न निर्माण होत असे, मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

या विशेष कक्षात अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.  व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयूची सुविधा देण्यात आली असून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. लवकरच सर ज. जी. समूहाच्या सेंट जॉर्ज, जे. जे. रुग्णालय आणि कामा रुग्णालयातही विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. भविष्यात प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. आजवर राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करताना ‘केस पेपर’वर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असत. आता तृतीयपंथीय हा नवीन रकानासुद्धा असणार आहे.

‘ट्रान्सजेंडर पर्सन्स रुल २०२०’नुसार तृतीयपंथीयांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार, राज्यातील तृतीयपंथीयांसाठीचा पहिला विशेष कक्ष जी. टी. रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. तृतीपंथीयांच्या आरोग्यविषयक समस्या आपल्यासारख्याच आहेत, पण त्याच आजारांसाठी त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक मात्र वेगळी असते. त्यामुळे या व्यक्ती उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांत दाखल होणे टाळतात. त्यांना दाखल करण्यात आल्यास अन्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नाराज होतात, तक्रार करतात, त्यामुळे रुग्णालय प्रशासनसुद्धा संभ्रमात पडते. या नवीन विशेष कक्षाने या सर्व अडचणींवर मात करण्यास हातभार लागणार आहे. यामुळे तृतीयपंथीयांना मूळ प्रवाहात आणणे शक्य होईल.

गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील तज्ज्ञांच्या चमूने यासंदर्भात मानक मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे, जेणेकरून एखादी तृतीयपंथी व्यक्ती उपचार घेण्यासाठी आल्यास त्यांना कसे समजून आणि सामावून घ्यायचे हे कर्मचारी व अधिकारी यांना कळेल. ‘केस रेकॉर्ड फॉर्म’ मध्ये स्त्री, पुरुष आणि इतर असे पर्याय असणार आहेत. इतर हा पर्याय निवडल्यावर जन्मजात लिंग, सध्याची लैंगिक ओळख, कशा प्रकारे ओळखले/ संबोधले जावे तो/ ती/ ते असे उपपर्यायही आहेत. ज्या तृतीयपंथीय व्यक्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र नसेल त्यांनी स्वत: नमुना अर्ज भरून नोंदणी विभागात किंवा अपघात विभागात द्यायचा आहे. ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे त्यांना टीजी वॉर्डमध्ये (ट्रान्स जेंडर वॉर्ड) दाखल करण्यात येईल. दाखल होताना काही रक्त चाचण्या केल्या जातील व मानसिक आरोग्यविषयक प्रश्नही विचारण्यात येतील. रुग्णाची स्थिती नाजूक किंवा गंभीर असल्यास त्यांच्यावर जनरल आयसीयूमध्ये उपचार करण्यात येतील. क्षयरुग्णांमुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना केवळ क्षयरुग्ण कक्षात दाखल केले जाईल.

रुग्णांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ अथवा ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ अशा शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. या कक्षाला समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ नियमित भेटी देतील. तृतीयपंथीयांसाठी काम करण्याचा अनुभव असलेल्या नामवंत व्यक्ती- अ‍ॅड. उषा अंदेवार, समुपदेशक हेमांगी म्हाप्रळकर, राष्ट्रीय तृतीयपंथीय समितीच्या सदस्य झैनाब पटेल या सल्लागार म्हणून मोलाचा हातभार लावतील. सर्वागीण निरोगी आरोग्य आणि विकास असा या सल्लागार समिताचा उद्देश आहे. कक्षात लिंगभेदविरहित स्वच्छतागृहे आहेत. तपासणी कक्ष, ड्रेसिंग रूम वेगळय़ा ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून रुग्णांची गोपनीयता आणि सन्मान याची जपणूक होईल.

अन्य कोणत्याही रुग्णालयाप्रमाणे येथेही काही सर्वसामान्य नियम आहेत. उदाहरणार्थ अभ्यागतांनी भेटण्याची वेळ निश्चित करण्यात आली असून तिचे पालन करावे लागेल. एका वेळी एकच नातेवाईक किंवा मित्र रुग्णाला भेटू शकेल. रुग्ण आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तीला तंबाखू, मद्य वा अमली पदार्थाचे सेवन करता येणार नाही. रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी तृतीयपंथीयांच्या प्रश्नांविषयी संवेनशील असावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वैद्यकीय सेवांचा विस्तार

जगभरात कोविडची साथ पसरली होती त्या काळात, परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी  वैद्यकीय शिक्षण विभागाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कोविड- १९ बाबत आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले. कोविडसाथीमुळे राज्यातील आरोग्य सेवांत सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली. त्यामुळे पुढील काळात राज्यात वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय सेवांचा विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन, रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स या साधनसामग्रीची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागासाठी आवश्यक असणारी पदभरती करण्यात येत आहे. याशिवाय वर्ग चारची आवश्यक पदे बाह्यस्रोताद्वारे संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत भरण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येत्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येत आहे.

याशिवाय अस्तित्वात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तिथे विविध तपासणीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०३० पर्यंतचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येत आहे. २०३० पर्यंत सर्वाना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ते साध्य करताना वैद्यकीय सेवा क्षेत्राचे खासगीकरण न करता सार्वजनिक-खासगी भागीदारीने राज्यातील वैद्यकीय सेवा बळकट करण्यात येणार आहेत. त्यासाठी पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) धोरण राबविण्यात येणार असून, त्याचा राज्यातील सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 00:02 IST