डेव्हिड हॉकनी हे चित्रकार. पण गुरुवारी त्यांचे निधन झाल्यानंतर जगभरच्या माध्यमांत आकड्यांचा पाऊस पडतो आहे… जन्मसाल, पहिले चित्र गाजल्याचे वा पदव्युत्तर शिक्षण सुरू झाल्याचे वर्ष, (१९३७, १९५७, १९५९) अशा सनावळ्या ठीक; पण लिलाव-किमतीचा विक्रम (१९७२ सालच्या चित्राला २०१८ मध्ये, नऊ कोटी तीन लाख डॉलरची (तेव्हाच्या दराने किमान ६१७ कोटी रुपये) बोली)…त्याच वर्षी पिकासो आदींना मिळालेल्या किमती… वगैरे आकडेही चवीने चघळले जाताहेत. पण हॉकनींना एवढा मान (आणि किंमतही) मिळण्याचे कारण काय, त्यांनी चित्रकलेत काय मोठे केले आहे, याकडे खरे तर लक्ष जायला हवे. एका वाक्यात सांगायचे तर, सामान्यरूपांमधले सौंदर्य शोधणारी हॉकनी यांची शैली होती. ‘पॉप आर्ट’ ही १९६० च्या दशकातली अमेरिकी चळवळ याचसाठी प्रसिद्ध आणि हॉकनींनाही ‘पॉप’ चित्रकार म्हटले जाई. पण अमेरिकी पॉप आर्टचा प्रभाव हॉकनींवर तरुणपणी पडल्याचे मान्य केले तरी, हॉकनी यांचा कलाप्रवास कितीतरी लांब पल्ल्याचा होता.
‘ही पाहा रोजची वस्तू- म्हणा तिला सुंदर’ असा वॉरहॉलादी अमेरिकी पॉप चित्रकारांना शोभणारा धटिंगणपणा हॉकनींकडे नव्हता. शिवाय, चित्रकलेचा ‘लांबचा पल्ला’ त्यांना लंडनच्या रॉयल अकॅडमीतल्या शिक्षणामुळे आपसूक उमगला असावा. हॉकनींनीही ‘जुनाट कलाशिक्षणा’विरुद्ध बंड केले; पण बंड ज्याविरुद्ध केले, त्याचा पुढे अभ्यासही केला. म्हणजे, युरोपीय प्रबोधनानंतर सामान्यजनांची चित्रे काढली जाऊ लागली, त्याची आठवण देणारी आधुनिक व्यक्तिचित्रणे हॉकनी यांनी केली-पण हे करताना, ‘क्युबिझम’ आणि ‘फोटोरिॲलिझम’ या समकाळात दबदबा असणार्या शैलींचीही सांगड त्यांनी घातली. मध्ययुगीन (लिओनार्दो, मायकेलँजेलोच्या आधीच्या) युरोपीय चित्रांसारखा सपाटपणा त्यांनी मानवाकृतींत जपला आणि ‘पॉप आर्ट’च्या रंगांनी तो साजराही केला. हॉकनींकडून आपले व्यक्तिचित्र काढले जायला हवे असे इंग्लंडच्या राणीसह अनेक लब्धप्रतिष्ठितांना वाटे. पण हॉकनी नकार देत. स्वत:ला भावलेला भूप्रदेश (उदा.- ग्रॅण्ड कॅनियन) चितारावा, त्याच भावनेतून त्यांनी आधीच्या वर्षांत स्वत:ला आवडलेल्या व्यक्तींची चित्रे केली होती.
ब्रिटनमध्ये १९६७ पर्यंत समलिंगी संबंध हा गुन्हा मानला जाई, तर सन २००० पर्यंत समलिंगी विवाह कायद्यास अमान्य होते. अशा काळातही ‘मला भिन्नलिंगी आकर्षण वाटत नाही’ ही भूमिका चित्रांमधून सूचित करण्याचे धैर्य दाखवून हॉकनी अधिक मोकळ्या अमेरिकेत स्थायिक झाले. तरुण अमेरिकी चित्रकार पीटर शेसिंगर यांच्या प्रेमात पडून जी चित्रे हॉकनी यांनी केली, त्यापैकी ‘स्प्लॅश’ मालिका गाजली. तरण तलावात कोणीतरी सूर मारल्यानंतर उडणारे पांढरे तुषार एवढेच दृश्य- पण त्यातून जोडीदार नाहीसा होण्याच्या भीतीपासून, फवार्याच्या क्षणिक सुखापर्यंत अनेक सूचक अन्वय लागले.
हॉकनी हे ‘प्रभावी’ चित्रकार ठरतात, याचे कारण त्यांच्या शैली-समन्वयात, रंग/ प्रकाशयोजनेत, सपाटपणाला त्यांनी दिलेल्या प्रतिष्ठेत आहेच. शिवाय मनस्वी आणि व्यवहारीपणाची उत्तम सांगड घालणारे म्हणूनही हॉकनी आदर्श ठरले. अतुल दोडिया व दिवंगत भूपेन खक्कर या भारतीय चित्रकारांनी ‘हॉकनींचे देणे’ सहज मान्य केले आहे.
