सकाळी समाजमाध्यमांवरची ती बातमी वाचल्यापासून तात्या कमालीचे अस्वस्थ होते. मन रमावे म्हणून त्यांनी टीव्ही सुरू केला. इंधनटंचाईच्या बातम्या बघून त्यांना आणखी अस्वस्थ वाटू लागले. या देशातल्या लोकांना दीर्घकालीन संकटाचा विचारच करता येत नाही, असे उद्वेगाने म्हणत त्यांनी तो बंद केला. मग त्यांचे मन पुन्हा त्याच बातमीवर स्थिरावले. म्हटले तर टिकलीएवढा हा शेजारचा पाकिस्तान. तिथल्या चौक व रस्त्यांना हिंदू नावे देऊन भारताला आव्हान देतो. तेही अप्रत्यक्षपणे. कुठलीही प्रतिक्रिया न देता. तरीही ‘राष्ट्र प्रथम’ अशी शपथ घेणार्या भारतीयांचे रक्त खवळत नाही. कुणी त्यावर साधी प्रतिक्रियाही देत नाही. यामागचा संभाव्य धोका यांच्या लक्षात कसा येत नाही या प्रश्नांनी तात्यांच्या मनात काहूर माजवलेले.
तेवढ्यात काकूंनी नाश्ता आणला पण तो खाण्याची इच्छाच त्यांना होईना! २०१४ ला सत्तेचे स्वप्न साकार झाल्यावर गुलामीची मानसिकता दर्शवणार्या मुस्लीम शासकांची प्रत्येक खूण पुसण्यासाठी घेतलेला पुढाकार त्यांना आठवला. वय झाल्याने भलेही आपण सक्रिय सहभाग नोंदवू शकलो नाही पण कोणत्या रस्त्याला, शहराला, चौकाला कुठले नाव द्यायचे हे अगदी वरिष्ठांपर्यंत सुचवले. सांगितलेली पर्यायी नावे काही ठिकाणी दिलीही गेलीत. त्याबद्दल परिवाराकडून कौतुकाचे पत्रही आले. आता याच्या पुढची पायरी म्हणजे अखंड भारताचे स्वप्न साकार करणे. त्यासाठी वेगवेगळ्या ग्रुपवर प्रबोधन, उद्बोधनाचे काम सुरू असताना पाकिस्तानने ही खेळी केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याऐवजी सारे शांत बसलेत. अरे, उद्या त्यांनी अखंड पाकिस्तानची मागणी केली तर काय? या प्रश्नासरशी ते थबकले.
मग त्यांनी वरिष्ठांना थेट फोन लावायला सुरुवात केली. एकदोघांचे ‘बघू’ हे उत्तर वगळता कुणीही त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले नाही. अमेरिका-इराण युद्धात मध्यस्थी केल्यापासून तशीही पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलीच आहे. या निर्णयामुळे आम्ही अल्पसंख्याक हिंदूंचे हित जपतो, असे ते जगाला आणखी ओरडून सांगतील. इंग्रजांच्या राजवटीखाली सारेच होते मग अखंड भारतच का पाकिस्तान का नाही असा युक्तिवाद त्यांनी केला तर काय? त्यांचा हा दावा किती तकलादू आहे. मूळ देश भारतच कसा होता, इतिहासात तसे दाखले कसे नोंदवले गेले आहेत, भारतातून फुटून निघालेल्या भागाला अखंड म्हणण्याचा अधिकारच कसा नाही याची उत्तरे आतापासूनच तयार करायला हवी. मात्र कुणी मनावर घ्यायलाच तयार नाही.
विचार करता करता तात्यांची तगमग आणखी वाढली. दुपारी कसेबसे दोन घास पोटात ढकलल्यावर ते घरासमोर शतपावली करू लागले. तेवढ्यात शेजारचे पुरोगामी नाना बाहेर आले व पाकिस्तानमधील नामकरणाची बातमी वाचली की नाही असे छद्मीपणे म्हणत तात्यांच्या जखमेवर मीठ चोळून गेले. तात्यांनी लगेच घरात येत दार घट्ट बंद करून घेतले. पाकिस्तानचा एकदाच सोक्षमोक्ष लावूनच टाकायला हवा. ‘ना रहेगा बास, न बजेगी बांसुरी’. त्यांची ही अस्वस्थता बघून शेवटी काकूंना राहावले नाही. काय झाले म्हणून त्यांनी विचारलेच. तात्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. त्यावर काकू म्हणाल्या. ‘अहो, त्यात काय एवढे? लग्नानंतर तुम्हीही माझे नाव बदललेच की. तरीही अनेक जण मला आजही जुन्याच नावाने हाक मारतात.’ हे ऐकून तात्यांना हसावे की रडावे हेच समजेना!
